सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ
येत्या काळात नाईट लँडिंग सुविधा निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
पूर परिस्थितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
सोलापूर:- नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल, पर्यटन क्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण हेातील. येत्या काळात सोलापूरला नाईट लँडिंग सुविधा आणि बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजी आमदार नरसिंग मेंगजी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्र आयजी सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्टार एअरचे संजय घोडावत, एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते.
सोलापूरकरिता अत्यंत महत्वाचा दिवस असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहराचा विकास, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी हवाई सेवा महत्वाची आहे. उद्योजक हवाई सेवेची उपलब्धता पाहून गुंतवणुकीचा निर्णय करतात. जगाच्या बाजाराशी जोडले जात असताना विमानसेवा असणे महत्वाचे आहे. सोलापूरमध्ये विमानतळ असूनही विमानसेवा सुरू होत नव्हती. सोलापूर परिसरात कोणतेही विमानतळ नसल्याने पर्यटनाच्या दृष्टीने या महत्वाच्या जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले.विमानसेवेचे महत्व लक्षात घेवून केंद्र सरकारने ‘आरसीएस’सारखी योजना सुरू केली. राज्य सरकारने सोलापूरसाठी या योजनेअंतर्गत विमानसेवेतील तूट भरून काढण्याचे मान्य केले. ‘आरसीएस’च्या माध्यमातून गॅप फंडिंग म्हणून १८ कोटींची रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर ही विमानसेवा सुरू होत आहे. सोलापूरचे विमानतळ कार्यान्वित झाल्याने लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारण्यात येईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून जलवितरण वाहिनीसाठी एक हजार कोटीचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल. सोलापूर हे दक्षिण भारताकडे जाण्याचे गेट-वे आहे. पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर ही धार्मिकस्थळे विमानसेवेमुळे मुंबईशी जोडली गेल्याने भाविकांची संख्या तिप्पट वाढून रोजगारही वाढेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
जिल्ह्यात नवीन पोलीस ठाण्याच्या इमारती उभ्या रहात आहेत. पोलिसांच्या निवासस्थानासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. असेही मुख्यमंत्री म्हणाले. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीत चांगले काम केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर आणि धारशिवचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. संकटकाळी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे ३२ हजार कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी देण्यात आले असून लवकरच ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, सोलापूर-मुंबई विमानसेवेची नागरिकांची मागणी पूर्ण होत आहे, ही सोलापूरकरांना दिवाळीची भेट आहे. सोलापूर राज्यातील दक्षिण-पश्चिमेकडील महत्वाचा जिल्हा आहे. देवभूमी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे.
वस्त्रोद्योगासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर देशाच्या आर्थिक राजधानीला जोडले जात असल्याने उद्योग-शेती विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ‘उडान’ योजनेअंतर्गत ६५ कोटी रुपये खर्च करून विमानतळ टर्मिनल इमारत उभारण्यात आली आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेसाठी आर्थिक तूट भरून काढण्यासाठी राज्य शासनाने हमी घेतल्याने ही विमानसेवा सुरू होत आहे.
येत्या काळात हैद्राबाद आणि तिरुपतीसारख्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विमानतळ कार्यान्वित असून राज्यातील विमानसेवेचा विस्तार करण्यासाठी आवश्यक सुविधांचा विकास करण्यात येत असल्याचेही मोहोळ म्हणाले. देशातील पहिले समुद्रातील विमानतळ पालघर येथे उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पालकमंत्री पालकमंत्री गोरे म्हणाले, सोलापूरचे नागरिक मुंबई विमानसेवेसाठी अनेक वर्षापासून प्रतिक्षा करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे या विमानसेवेला प्रारंभ होत आहे. नुकत्याच झालेल्या महापुराच्या संकटावेळी प्रशासनाने चांगली कामगिरी करून जिवीतहानी होऊ दिली नाही. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामुळे शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरी दिवाळी साजरी होण्यासाठी आवश्यक साहित्य देण्यात येत आहे. ८७२ कोटी रुपयाचे शहराच्या अंतर्गत जलवाहिनीचे काम होणार आहे, असेही गोरे म्हणाले. सोलापूर-तिरुपती विमानसेवा लवकर सुरू करावी आणि शहर विकास आराखड्याचे काम लवकर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरात होत असलेल्या सुधारणांमुळे औद्योगिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश सुपूर्द
यावेळी बालाजी आमाईन्सच्या वतीने एक कोटीचा धनादेश, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने २५ लाख आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यातर्फे २१ लाख, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, कुर्डुवाडी, पांगरी, वैराग जिल्हा सोलापूर आणि मोहोळ येथील नूतन पोलीस स्थानकाच्या इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी सोलापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या विमानातील पहिले प्रवासी बसव गायकवाड यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला.
सोलापूर विमानतळ प्राधिकरणच्या सहव्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. जून २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेली सोलापूर ते गोवा विमान सेवा चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना संपूर्ण अन्नधान्य व दिवाळी किट मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळ परिसरात करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानाला झेंडा दाखवून सोलापूर ते मुंबई विमान सेवेचा शुभारंभ
सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते मुंबई या विमानसेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते स्टार एअरलाईनच्या विमानाला झेंडा दाखवून करण्यात आला.











