कणकवलीत शैक्षणिक तज्ञ सल्लागार सदाशिव पांचाळ यांची विशेष कार्यशाळा संपन्न
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- “दशरथ मांजी, लता भगवान करे, अरूणिमा सिन्हा या लोकांनी आमच्या समोर उदाहरणे ठेवली आहेत. त्यांच्या अनुभवातून आपण सकारात्मक गोष्टी घेतल्या आणि त्याप्रमाणे प्रामाणिक काम केल्यास यश मिळवणे, सहज शक्य होईल!” असे प्रतिपादन एज्युकेशनल अॅडव्हायजर सदाशिव पांचाळ यांनी केले.
अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था, मुंबई संचालित बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली येथे एज्युकेशनल अॅडव्हायजर सदाशिव पांचाळ यांच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून सदाशिव पांचाळ बोलत होते. यावेळी संस्थेच्या सचिव सुलेखा राणे, प्रणाली सावंत, मुख्याध्यापिका भारती धुरी, मयूरी तांबे तसेच सर्व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
स्मरणशक्ती विकास, सुपरफास्ट मॅजिक मॅथ्स, ब्रेन पावर, माईंड पावर या विषयांवर मिळून सुमारे चार तास पेक्षा अधिक वेळ हा कार्यक्रम चालला. पण मुलांना मात्र खूप काही मिळाले. ज्या मुलांना ३० पर्यंतचेच पाढे येत होते, तीच मुलं तासाभराच्या सत्रातच चार अंकी पाढे करायला लागली. ज्या गणितांना एरव्ही तीन- चार मिनिटे लागतात, तीच गणिते अवघ्या काही सेकंदात सोडवायला लागली. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मुलांना टीप्स देऊन स्मरणशक्ती संदर्भातील प्रात्यक्षिके सादर करून मुलांना अक्षरशः सदाशिव पांचाळ यांनी तोंडांत बोटे घालायला लावली. त्यानंतरच्या सत्रात प्रेरणादायी विषय घेत विविध उदाहरणाचे दाखले देत मुलांना आणि उपस्थित शिक्षकांनाही भारावून टाकले.
या कार्यक्रमात शिकवलेल्या गोष्टी मला माझ्या शालेय जीवनात मिळाल्या असत्या तर आम्ही अजून पुढे गेलो असतो, असे मत शिक्षक म्हणून या कार्यशाळेत बसलेल्या शिक्षिका मयूरी तांबे यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी दिली. विद्यार्थी वर्गाने ही खूप छान प्रतिक्रिया दिल्या.
सदाशिव पांचाळ यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची प्रारंभ करण्यात आला. मुख्याध्यापिका भारती धुरी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रणाली सावंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शेवटी मयूरी तांबे यांनी आभार प्रदर्शन केले.