कणकवली रेल्वे स्टेशनवर समस्या दूर करून प्रवाशांची गैरसोय थांबवा!
रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागीच लावा! सरकता जीना त्वरित सुरु करा! रेल्वे स्थानक हद्दीतील खड्डेमय रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा!
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
कणकवली: – येथील रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाश्यांच्या सोईसाठी रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट फलाट क्रमांक १ वरती पूर्वीच्या जागीच लावा; सरकता जीना त्वरित सुरु करा आणि रेल्वे स्थानक हद्दीतील खड्डेमय रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा; अशी मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट फलाट क्रमांक १ वरती लावण्यात येत होता; परंतु त्याची जागा बदलल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून पूर्वीप्रमाणे पहिल्याच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून तशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
गेली कित्येक वर्षे रेल्वे बोगीची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट हा रेल्वेच्या फलाट क्रमांक १ वरती लावण्यात येत होता. परंतु ती जागा बदलून सध्या तो फलक व चार्ट रेल्वे बुकिंग खिडकी जवळ खाली तळमजल्यावरती ठेवण्यात येत आहे. गेली कित्येक वर्षे ही सेवा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने प्रवाशांना देखील ती गोष्ट अंगवळणी पडली आहे. मात्र सध्या प्रवाशांना नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्मवरती गेल्यावरती ती सुविधा इतरत्र ठिकाणी हलविण्यात आल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे वृध्द, अपंग व महिला वर्गाची प्रचंड तारांबळ उडते आणि ते पाहण्यासाठी पुन्हा प्लॅटफॉर्मवरून खाली तळमजल्यावरती फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे प्रवाशी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गेले कित्येक महिने सरकता जीना देखील बंद असल्याने प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत.
सदर सरकता जीना त्वरित सुरु करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात यावी आणि रेल्वे स्थानक हद्दीतील रस्त्यावरती खड्डे पडून रस्त्याची पार दुर्दशा झालेली आहे. सदर रस्ता पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्त करण्यात यावा; अशा मागण्यांचे निवेदन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी कणकवली स्टेशन मास्तर प्रशांत सावंत यांच्याकडे देण्यात आले.
त्यानंतर याविषयी रत्नागिरीचे वरिष्ठ अधिकारी आर. एम. कावळे यांच्याशी संतोष नाईक यांनी फोनवरती संपर्क साधून याबाबत लक्ष वेधले असता त्यांनी रिजर्वेशन चार्ट व बोगी पोझिशन बोर्ड बाबत सकारात्मक उत्तर दिले. याप्रसंगी निवेदन देताना जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरसकर, कणकवली तालुका सचिव मनोजकुमार यारे, कणकवली तालुका संघटक ऋषिकेश कोरडे उपस्थित होते.