निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी घेतली हॉटेल व लॉज मालकांची बैठक
सिंधुदुर्गनगरी, दि.01 (जि.मा.का): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील हॉटेल व लॉज मालकांची बैठक घेतली. बैठकीत पोलीस अधीक्षकांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या.
हॉटेल, लॉज, निवासी व न्याहरी योजनेअंतर्गत निवासस्थाने, भाडे तत्वावरील निवासस्थाने इत्यादी व्यवसायिकांनी त्यांच्याकडे राहण्यास आलेल्या सर्व व्यक्तीचे पूर्ण नाव, पत्ता, ओळखपत्र, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांच्याकडील वाहनाचा प्रकार व क्रमांक, ग्राहक आल्याची व गेल्याची तारीख व वेळ अशा सविस्तर नोंदी ग्राहक नोंदणी रजिस्टर मध्ये घ्याव्यात, एका पेक्षा अधिक व्यक्ती राहण्यास आल्यानंतर फक्त एकाच व्यक्तीची त्रोटक स्वरुपातील नोंद व त्यासोबत अधिक उर्वरीत व्यक्तीची फक्त संख्या लिहिण्यात येते. तसेच एकाच रुममध्ये एक्स्ट्रा बेड घेवून राहणाऱ्या व्यक्तींची नोंद घेतली जात नाही ती घेण्यात यावी,
हॉटेल, लॉज व इतर व्यापारी निवासस्थाने इत्यादी ठिकाणी योग्य क्षमतेचे सुस्थितीतील सीसीटिव्ही कॅमेरे लावणे व त्यामधील रेकॉर्डींगची तारीख व वेळ योग्य आहे का याची पडताळणी करावी व तो डाटा सुरक्षित जतन करुन ठेवावा,
राहण्यास आलेल्या ग्राहकांचे फोटो, ओळखपत्र (आधारकार्ड व अन्य दुय्यम ओळखपत्र) यांच्या प्रती रेकॉर्डला घेवून ठेवाव्यात. राहण्यास आलेल्या ग्राहक हा कोठून आलेला आहे? कोणत्या प्रयोजनासाठी आलेला आहे? किती दिवस राहणार आहे ? याबाबतची नोंदही ग्राहक रजिस्टरी घेण्यात यावी, अल्पवयीन मुले मुली राहण्यास आल्यास, किंवा इतर ग्राहक व्यक्ती व त्यांच्याकडील वाहने संशयास्पद दिसून आल्यास त्याबाबत तात्काळ गोपनीयरित्या नजिकचे पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग येथील दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८२०० / २२८६१४ किया पोलीस हेल्पलाईन क्र. ११२ यावर संपर्क करुन माहिती द्यावी, एका व्यक्ती रुम बुकींगच्या नोंदिवर जर दुसराच व्यक्ती राहत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत संबंधित आस्थापनेवर योग्य ती कायदेशीर कारवाई पारीत करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी, राहण्यास आलेले व्यक्ती बेकायदेशीरपणे मद्य किंवा अंमली पदार्थ सेवन करणार नाहीत अगर सोबत बाळगणार नाहीत याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, राहण्यास आलेला ग्राहक त्याच्या सोबत घातक शस्त्रे, अग्नीशस्त्रे तसेच स्फोटक पदार्थ बाळगणार नाहीत याची दक्षता घ्यावी, होटेल, लॉग इत्यांदीमधील एखादा स्टाफ कर्मचारी हॉटेल मालक अथवा मॅनेजर यांच्या परवानगीशिवाय परस्पर ग्राहकास रूम उपलब्ध करुन देणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी उपस्थित हॉटेल, लॉज व इतर व्यापारी निवासस्थाने असलेल्या व्यवसायिकांनी सर्व सूचनांचे पालन करण्याचे, पोलीस यंत्रणेस तसेच इतर प्रशासकीय विभागांना सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.