महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार!
मुंबई- महाराष्ट्रातील सत्तापेच कायम असून सर्वोच्च न्यायालयात पुन्हा उद्या सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. काल `रामप्रहरी’ अतिशय नाट्यमयरित्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर संपूर्ण राज्यात-देशात अतिशय तीव्र पडसाद उमटले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना जबर धक्का बसला. त्यातूनच अजित पवारांच्या बंडाला राष्ट्रवादी पक्षाकडून प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविरुद्ध ठामपणे भूमिका घेत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासह महाविकास आघाडी कायम असल्याचे जाहीर केले.
अजित पवारांनी राज्यपालांना दिलेले पत्र, त्या पत्रावर राज्यपालांनी घेतलेला निर्णय, राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्याचा निर्णय, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आणि कोणालाही सुगावा न लावता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची दिलेली शपथ; त्याचप्रमाणे ३० नोव्हेंबरपर्यंत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची मुदत याविरोधात काल रात्री सर्वोच्च न्यायालयात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी रिट दाखल केले. त्याची सुनावणी आज सकाळी साडेअकरा वाजता झाली. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्यावतीने विश्वासदर्शक ठरावास मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच सामोरे जावे; अशी मागणी न्यायालयात करण्यात आली. यावेळी तिन्ही पक्षाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली तर भाजपकडून मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली.
दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून सर्वोच्च न्यायालयाने उद्या सकाळी साडेदहा वाजता केंद्र सरकार, राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार वगैरेंना यांना आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे. त्याचप्रमाणे काही आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा सत्ता पेच अजूनही कायम असून उद्या त्याची सुनावणी होणार आहे.