तळेरे – वैभववाडी मार्गावर मोठमोठ्या खड्यांचे साम्राज्य
कासार्डे आनंदनगर येथील अपघातस कारणीभूत ठरणारे खड्डे अखेर युवकांनी श्रमदानाने भरले!
तळेरे (संतोष नाईक) – वैभववाडी कोल्हापूर मार्गावरती जागोजागी मोठमोठ्या खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित रस्ते विभागाचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कासार्डे आनंदनगर येथील अपघातस कारणीभूत ठरणारे खड्डे अखेर युवकांनी श्रमदानाने भरले.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात देखील संबंधित रस्ते विभागाच्या नित्कृष्ट कामकाजाच्या दर्जामुळे तळेरे – वैभववाडी मार्गावर मोठमोठ्या खड्यांचे साम्राज्य बघायला व अनुभवायला मिळत आहे. त्यातीलच एक भाग असलेल्या कासार्डे आनंदनगर येथील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातास निमंत्रण व कारणीभूत ठरत आहे. या समस्येचे गांभीर्य सामाजिक भावनेतून समजून घेत येथील युवा वर्गाने आपल्या स्व-खर्चाने व स्व-श्रमदानातून सदरचे खड्डे दगड व मातीने बुजविले. ही बाब एकाअर्थी कौतुकाची आहे. “सदरच्या समस्येबाबत संबंधित रस्ते विभागाने गांभीर्यपूर्वक कार्यवाही वेळीच करणे आवश्यक होते. जर अशाप्रकारे सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरून आपल्या वैयक्तिक किंवा सामाजिक समस्येवर स्वतः कार्यवाही व उपाययोजना करावी लागत असेल तर शासन आणि प्रशासनाची सर्व सामान्य जनतेला गरजच काय? सर्वसामान्य जनतेने स्वतः आवाज उठविल्याशिवाय सुस्त व निद्रिस्त शासन आणि प्रशासनाला जाग येत नाही, यासारखे लोकशाही राज्यात दुसरे दुर्दैव नाही!” अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांनी दिली.