राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई:- काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने राज्यातील विविध समस्या व दुष्काळ संबंधित निवेदन राज्यपालांना सादर करून त्यावर राज्यपालांसोबत चर्चा केली. ह्या भेटीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणले की, सदर बैठकीत शेतकऱ्यांची आत्महत्त्या, ‘डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी खते, बियाणे, औषधे, इत्यांदीचा उपलब्ध नसणे, सरसकट कर्जमाफी, तसेच जनावरांसाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची सोय ह्या सर्व विषयांवर चर्चा झाली. तसेच यासर्वांचा विचार करून शिंदे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.

लोकसभा निडणुकीच्या काळात राज्यांत एकूण २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून अद्यापही आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी खते, बियाणे, औषधे अद्यापही देण्यात आलेली नाहीत. मात्र, शिंदे सरकार याकडे लक्ष्य द्यायला तयार नाही. त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली. या घटनेस विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले. राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना सरकार मंत्री सुट्टीवर गेले, तर काही मंत्री थेट परदेशात गेले. मंत्र्यांना परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे या मंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी कोणाची परवानगी घेतली होती, याचा खुलासा झाला पाहिजे, असे ते म्हणाले.

आज राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्याला आता आधाराची गरज आहे. तसेच राज्यातील जनता दुष्काळात होरपळत आहे. दुसरीकडे राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी. तसेच जनावरांसाठी चारा छावण्या तसेच पिण्याच्या पाण्याचीही सोय करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. मात्र, या मोदी सरकारने संसद परिसरातून या महारपुरुषांची पुतळे काढले आहेत. त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून याबाबत राष्ट्रपती महोदयांना आमच्या भावना कळवा, असंही ते म्हणाले.

You cannot copy content of this page