`गेटवे ऑफ इंडिया’तून मिळतोय एक्सेसेबल इंडियाचा संदेश
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- बहुचार्चित काळाघोडा फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. येथे मुख्य प्रवेश द्वारावर असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या प्रतिकृतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रवेशद्वारातून एक्सेसेबल इंडियाचा सामाजिक संदेश देण्यात आला आहे. कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारली आहे.
अडथळाविरहित वातावरण निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. देशाच्या एकुण लोकसंख्येपैकी ३ टक्के व्यक्ती दिव्यांग आहेत. शारीरिक आणि मानसिक अंपगत्व असणारे लोक, जेष्ठ नागरिक, लहान मुले , गरोदर महिला, अॅसीड पिडीत तसेच तृतीयपंथी अशा सर्व व्यक्तींना वैयक्तिक आणि सार्वजनिक ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास खऱ्या अर्थाने भारत सुगम्य आणि सुसज्ज होईल. काळाघोडा येथील ‘गेटवे ऑफ इंडिया’ची प्रतिकृती हाच संदेश देत आहे.
शाळा, दवाखाने, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी स्वयंचलित रॅम्स तसेच सहज वावरता यावे यासाठीच्या सोयी, रस्त्यावर दिव्यांग विशेषतः दृष्टीबाधित व्यक्तींना सिग्नल कळावा यासाठी स्वयंचलित सिग्नल, इमारती फुटपाथ, उतार, वळणे या सर्व ठिकाणी सुयोग्य रॅम्प्स, रेलिंग, आधारासाठी कठडे किंवा आधार यासाठीचे उपाय ही काळाची गरज असल्याचे सुमित पाटील सांगतात.
सुलभ व सहज प्रवास व संपर्क केवळ अपंगाचीच नव्हे तर सर्वाची गरज आहे. शाळा, हॉटेल्स, सिनेमागृह, सार्वजनिक उद्याने, वैद्यकीय उपचार केंद्र, औषधविक्रीची दुकाने (औषधांचे पॅकेट) मॉल्स अशा सर्वच ठिकाणी दिव्यांगांसह सर्व व्यक्तींना सुलभ भाणि सुगम्य वातावरण निर्मिती हे प्रगतीशील भारताची नांदी ठरेल अशी प्रतिक्रिया सुमित पाटील यांनी दिली.