राष्ट्रपतींनी चरखा चालवण्यासोबतच महात्मा गांधींच्या स्मृतींना दिला उजाळा

राष्ट्रपतींनी बापू कुटीत घालवला पाऊण तास

आश्रमात केली चंदन वृक्षाची लागवड, पैसे देऊन खरेदी केले खादीचे कापड

वर्धा:- भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल सेवाग्राम आश्रमामध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी आश्रमातील आदिनीवास, बा व बापू कुटी, महादेवभाई देसाई कुटीची पाहणी करून महात्मा गांधींच्या येथील वास्तव्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी अंबर चरख्यावर सूत कताईचा अनुभव घेण्यासोबतच आश्रमात खादीचे कापड सुद्धा खरेदी केले. त्यांनी पाऊण तास म्हणजेच त्यांच्या निश्चित कालावधीपेक्षा १५ मिनिटे अधिक वेळ आश्रमात दिला.

आज सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी राष्ट्रपती राम नाथ कोविंद वर्धा येथे आले होते. यावेळी त्यांनी बापूकुटीला भेट दिली. त्यांच्यासमवेत श्रीमती सविता राम नाथ कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, राष्ट्रपती यांच्या कन्या स्वाती, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू उपस्थित होते.

आश्रमाचे अध्यक्ष श्री प्रभू, मुकुंद म्हस्के आणि शोभाताई आश्रमवासीयांनी राष्ट्रपतींचे स्वागत करून आश्रमाची माहिती दिली. आश्रमात उभारण्यात आलेल्या सर्वात पहिल्या कुटीची माहिती दिली. कुटी पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसत होते. यावेळी अंबर चरख्यावर राष्ट्रपती श्री.कोविंद आणि त्यांची पत्नी श्रीमती सविता कोविंद यांनी सूत कताई सुद्धा केली. बापू कुटी येथे प्रार्थना करून महादेवभाई देसाई कुटीमध्ये सुरू असलेल्या कापूस ते कापड प्रकल्पाची तेथील महिला विणकारांकडून माहिती घेतली. तसेच आश्रमात चंदन वृक्षाची लागवड करून त्यांनी तब्बल पाऊण तास आश्रमात घालवला.

राष्ट्रपती श्री.कोविंद यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाच्या वतीने प्रकाशित ‘महात्मा गांधी लाईफ थ्रू लेन्सेस’ हे इंग्रजी आणि ‘महात्मा गांधी चित्रमय जीवन गाथा’ हे महात्मा गांधीजींच्या दुर्मिळ छायाचित्रांवर आधारित हिंदीतील कॉफीटेबल बुक सेवाग्राम आश्रमाला भेट दिले.

You cannot copy content of this page