‘व्हीजेटीआय’मधील तीन विद्यार्थिनींची यशाला गवसणी!

मुंबई:- माटुंगा येथील सुप्रसिद्ध वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेतील (व्हीजेटीआय) विद्यार्थिनींनी ‘ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन’मध्ये (जीआरई) दमदार कामगिरी करीत यशाला गवसणी घातली आहे.

साराह अब्देअली बस्तावाला आणि केतकी देशमुख ‘जीआरई’ परीक्षेत यशस्वी!

नुकत्याच पार पडलेल्या ‘जीआरई’ परीक्षेत संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान शाखेतून साराह अब्देअली बस्तावाला हिने ३४० पैकी ३४० आणि केतकी देशमुख हिने ३४० पैकी ३३८ गुण प्राप्त केले. ( ‘जीआरई’ परीक्षेत यश संपादन केल्यांनतर पाश्चात देशातील नामांकित विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी (मास्टर ऑफ सायन्स) सहज प्रवेश मिळतो.)

सिद्धी उपाध्याय भारतात प्रथम!

दरम्यान, ‘व्हीजेटीआय’मधील इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलीकम्युनिकेशन शाखेतील (एम.टेक.) प्रथम वर्षाच्या सिद्धी उपाध्याय या विद्यार्थिनीने गूगल हॅकाथॉन गर्ल्स स्पर्धेत विजय मिळवत भारतात प्रथम येण्याचा मान पटकावला. या स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करून कंप्युटर कोडिंग करायचे असते. निवड चाचणी झाल्यानंतर अंतिम ४५ उमेदवारांची निवड करण्यात आली आणि इफिचिप: नेक्स्ट जनरेशन चिप या विषयाअंतर्गत सिद्धीला हार्डवेअर अभियांत्रिकीमध्ये देशभरातून प्रथम विजेते घोषित करून रोख पुरस्कार दिला गेला, अशी माहिती ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. नितीन गुल्हाने यांनी दिली. तर ‘व्हीजेटीआय’चे संचालक प्रा. डॉ. सचिन कोरे यांनी या यशाबद्दल तिन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ह्या तीनही विद्यार्थिनींचे कौतुक सर्व थरातून होत आहे.