लोककलांचे जतन, प्रचार व प्रसार करणे; हे सांस्कृतिक केंद्राचे आद्य कर्तव्य

मुंबई:- लोककला, हस्तकला, लोकनृत्य ही भारतीय संस्कृतीची अमूल्य ठेव आहे. लोककलांचे जतन करणे, प्रचार व प्रसार करणे आणि भावी पिढीपर्यंत कलेला पोहोचवणे, हे सांस्कृतिक केंद्राचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमाचे वेळापत्रक करुन प्राधान्याने सादर करावे, असे आदेश या केंद्राचे अध्यक्ष राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची वार्षिक बैठक आज राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव यांच्यासह केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे सचिव आणि केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल यावेळी म्हणाले, केंद्रामार्फत दरवर्षी एक बैठक घेणे आवश्यक असून केंद्रामार्फत विविध महोत्सवासाठी झालेल्या खर्चाचे विवरण वेळोवेळी सदस्यांना सादर करणे आवश्यक आहे. पुढील आर्थिक वर्षाचे नियोजन करीत असताना लोककलेचे जागतिक पातळीवर कौतुक होण्याकरिता काय करता येईल याचा विचार करुन वेगळे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे.

दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र हे १९८६ मध्ये स्थापित झालेल्या ७ विभागीय सांस्कृतिक क्षेत्रांमधून एक आहे. नागपूर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ, गोवा आणि तेलंगणा या भारतातील सात राज्यांतील लोककलांचे रंग मिळून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या प्रत्येक राज्यामध्ये लोक, आदिवासी, ललित कला आणि शिल्पकलांची समृद्ध परंपरा आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रामार्फत विविध कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येत असतात.

या परंपरेला समृद्ध करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी हे केंद्र विविध क्रियाकलापांद्वारे प्रयत्न करण्यासाठी यापुढील काळात केंद्राने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *