श्रमिक किसान सेवा समितीचे उपाध्यक्ष जनार्दनजी सुर्वे यांना श्रद्धांजली!
रत्नागिरी- तालुक्यातील शिवार आंबेरे येथे श्रमिक किसान सेवा समिती संचालित श्रमिक विद्यालय, सावित्रीमाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल व लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमिक किसान सेवा समितीचे उपाध्यक्ष जनार्दनजी सुर्वे साहेब ऊर्फ जनुभाऊ सुर्वे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमात बोलताना विद्यार्थी प्रतिनिधी कु. प्रतीक्षा घाटकर हिने भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. प्रा.नितेश केळकर यांनी एक भावलेले व्यक्तिमत्त्व म्हणून सुर्वे साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. श्रमिक किसान सेवा समितीचे सचिव व लोकनेते शामरावजी पेजे कनिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरेचे प्राचार्य सन्मा. मधुकर थूळ यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांचा संस्था उभारणीत सिंहाचा वाटा असून सतत संस्थेच्या प्रगतशील वाटचालीत मनोधैर्य उंचवणारे जनुभाऊ आज आपल्यात नाहीत ही न भरून निघणारी पोकळी आहे, असे उद्गार काढले.
वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री.राकेश आंबेकर यांनी प्राध्यापक वर्गाविषयी असणारी आस्था व्यक्त करून,एक सच्चा शिक्षण प्रेमी, उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली. श्रमिक किसान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष, श्री. नंदकुमारजी मोहिते यांनी संस्थेच्या पायाभरणीपासून ते कालपर्यंत सहकार्य देणारे निष्ठावंत कार्यकर्ते, एक सच्चा दिलदार माणूस, शिक्षणप्रेमी, सतत मानसिक पाठबळ देणारा सहकारी हरपल्याची भावना व्यक्त करून अशी रत्ने निर्माण झाली तर हे विद्यासंकुल प्रगतीपथावर पोहचेल. आजी, माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे कार्य समजून घ्यायला पाहिजे. हे ज्ञानसंकुल त्याचे कार्य सदैव स्मरण करेल, अशा भावपूर्ण शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांनी संस्थेचा ५ दिवसांचा दुखवटा जाहीर केला.