ज्यू नागरिकांची पवित्र वास्तू शारे रासोन सिनेगॉगला १७५ वर्ष पूर्ण

भारतात ज्यू नागरिकांचे अमूल्य योगदान – राज्यपाल सी. विद्यासागर राव

मुंबई:- भारताच्या विकासात ज्यू नागरिकांनी अमूल्य योगदान दिले आहे. चित्रपट, व्यापार, शिक्षण, वैद्यकीय सेवा अशा अनेक क्षेत्रात या नागरिकांनी अमिट ठसा उमटविला आहे, असे गौरोवपूर्ण उद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले. बेणे इझ्रायली ज्यू समाजाच्या शारे रासोन सिनेगॉग या पवित्र वास्तूला १७५ वर्षांचे झाल्यानिमित्त जे जे रोड, भायखळा येथील मागन डेव्हिड सिनेगॉगला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यपाल म्हणाले, भारतात चार धाम यात्रा पूर्ण करण्याला धार्मिक महत्त्व आहे. मी यातील एकाही धामला अद्याप गेलेलो नाही, परंतू यापुर्वी मी ३ आणि आजची ही चौथी सिनेगॉगला भेट दिल्याने माझी ४ धाम यात्रा पूर्ण झाली असे मी मानतो. १८४३ मध्ये बांधण्यात आलेल्या शारे रासोन सिनेगॉग ही भारतातील दुसरी जुनी सिनेगॉग आहे.

महाराष्ट्र आणि मुंबईचा इतिहास हा ज्यु धर्मियांच्या अथक परिश्रमाशिवाय अपूर्ण आहे. बगदादी ज्यु कुटूंबातील डेविड ससून यांनी मोठ्या प्रमाणात समाजपयोगी कामे केली. यामध्ये मुंबईतील डेवीड ससून ग्रंथालय, फ्लोरा फाऊंटन, गेट वे ऑफ इंडिया, पुण्यातील ससून रूग्णालय आदींचा उल्लेख करता येईल.

भारतातील ज्यू नागरिकांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे याबद्दल खेद व्यक्त करून राज्यपाल यांनी ज्यु नागरिकांचे भारतातील योगदान हा विषय शालेयस्तरावरील पाठ्यपुस्तकात समावेश करावा अशी इच्छा व्यक्त केली. महाराष्ट्रात ज्यू नागरिकांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यामध्ये राज्यपाल महोदयांनी केलेल्या प्रयत्नांचाही यावेळी उल्लेख केला. तसेच ससून ट्रस्टचे सॅलोमन शोफर यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात शारे रासोन सिनेगॉगचे सदस्य जुडा पुगावकर, ससून ट्रस्ट चे सॅलोमन शोफर, न्यूयॉर्क येथील रब्बास याकोब मेनाशे यांच्यासह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *