जोगेश्वरी पश्चिम रिलीफ रोडवरील हवेच्या प्रचंड प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?
प्रशासनाने बिल्डर लॉबीच्या अर्थपूर्ण संबंधातून (?) डोळे बंद करून घेतल्याने हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण सुरूच!
मुंबई (प्रतिनिधी):- `मुंबईकराचा श्वास कोंडण्यास जरी पायाभूत प्रकल्प कारणीभूत ठरत असतील, तर मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी ते बंद करण्याचे आदेश देण्यासही मागेपुढे पाहणार नाही!’ असा सज्जड इशारा उच्च न्यायालयाने राज्य सरकार, महापालिका आणि अन्य प्राधिकरणांना कालच दिला. तरीही प्रशासन बिल्डर लॉबीच्या अर्थपूर्ण संबंधातून डोळे बंद करून घेत आहे आणि हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण सुरूच आहे. अशी अनेक उदाहरणे मुंबईत असून त्यापैकी एक उदाहरण म्हणजे जोगेश्वरी पश्चिम येथील न्यू लिंक रोड आणि एसव्ही रोड यांना जोडणारा रिलीफ रोड होय. गेले तीन महिने येथे हवेतील धुळीचे लोट का थांबत नाहीत? असा प्रश्न तेथील स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनताही करीत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासन, महानगरपालिका करोडो रुपये खर्च करीत आहे. पण प्रत्यक्षात करोडो रुपये खर्च होऊनही हवेची गुणवत्ता सुधारत नाही. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालय सुद्धा गंभीर असून कालच `मुंबईकराचा श्वास कोंडण्यास जरी पायाभूत प्रकल्प कारणीभूत ठरत असतील, तर मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी ते बंद करण्याचे आदेश देण्यासही मागेपुढे पाहणार नाही!’ असा सज्जड इशारा दिला.
एकीकडे असा प्रकार सुरु असताना दुसरीकडे मात्र प्रशासन कामचुकारपणा करीत आहे; असे निदर्शनास येत आहे. अनेक उदाहरणांपैकी जोगेश्वरी पश्चिम येथील न्यू लिंक रोड आणि एसव्ही रोड यांना जोडणाऱ्या रिलीफ रोडचे उदाहरण घेतल्यास हा गंभीर प्रकार लक्षात येईल. येथे राममंदिर वरून येणाऱ्या उड्डाण पुलाचे संथगतीने काम सुरु आहे. त्याहीपेक्षा हिंदू स्मशान भूमीसमोर मोठ्या इमारती बांधण्याच्या खाजगी प्रकल्पही सुरु आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून येथील हवेत धुळीचे प्रमाण प्रचंड असते. याबाबत महानगरपालिकेचे प्रशासन कोणतीही ठोस भूमिका का घेत नाही? असा प्रश्न तेथील स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनताही करीत आहे.
ह्या रिलीफ रोडवर एचके शैक्षणिक संकुल, महानगरपालिकेची पब्लिक स्कुल, केएचएमडब्लू महाविद्यालय असून हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत आहेत. पाटलीपुत्र नगर येथे निवासी इमारती तर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात निवासी वस्ती आहे. येथे लाखो लोक राहतात. ह्या सर्वांना हवेच्या प्रदूषणाचा प्रचंड मोठा त्रास होतो आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आहे. अनेकांना श्वासाचे आजार झालेले आहेत. दिवसभर ह्या रस्त्यावरती धुळीचे लोट दिसतात. असे असतानाही प्रशासन गप्प राहते, प्रशासन कोणतीही उपाययोजना करीत नाही ह्याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला कळून येतो.
जर ह्या रस्त्यावरील हवेचे प्रदूषण त्वरित थांबविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही केली नाही तर हा गंभीर प्रश्न उच्च न्यायालयासमोर मांडावा लागेल; अशी तीव्र प्रतिक्रिया येथील जनतेने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.