४९ वर्षांपूर्वी… देव तारी त्याला कोण मारी?

८ जुलै १९७२ हा दिवस आमच्यासाठी काळा दिवस! कारण ह्याच दिवशी आम्ही राहत असलेली `शिंदेवाडी इमारत क्र. १’ (दादर मेन रोड हे जुने नाव आणि दादासाहेब फाळके रोड नवीन नाव.)  पहाटे कोसळली होती. त्या घटनेला ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच हा लिखाण प्रपंच!

शिंदेवाडी इमारत म्हणजे मिनी कोकण! बहुसंख्य रहिवासी हे कोकणातील, विशेषतः सिंधुदुर्गातील! प्रत्येक घरातील एक किंवा दोन व्यक्ती मिल कामगार! त्याचप्रमाणे त्याकाळी प्रत्येक कुटुंबात चारचार पाचपाच मुले असायची. कमी जागेत मोठा परिवार! कोकण, मिल कामगार आणि मोठे कुटुंब असे त्रिविध वैशिष्ट्ये असणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने कष्टकरी! तसेच आर्थिक सुबत्ता नसणारी! तरीही एकमेकांबद्दल आपुलकी होती, प्रेमाची भावना होती.

आजही ती तारीख आठवतेय; त्यावेळचा प्रसंग डोळ्यासमोर चलचित्राप्रमाणे सुरु होतो.

८ जुलै १९७२ हा दिवस आमच्यासाठी काळा दिवस! कारण ह्याच दिवशी आम्ही राहत असलेली `शिंदेवाडी इमारत क्र. १’ (दादर मेन रोड हे जुने नाव आणि दादासाहेब फाळके रोड नवीन नाव.)  पहाटे कोसळली होती. त्या घटनेला ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच हा लिखाण प्रपंच!

आमच्या ह्या इमारतीत सुमारे २५० कुटुंबे होती. इमारतीचे वय नव्वद शंभर वर्षाचे असेल. तशी ती इमारत जीर्ण झाली होती म्हणून ठेकेदाराने काम सुरु केले. चौथ्या मजल्यावरून पाणी झिरपत ते खालच्या मजल्यावर येत असल्याने त्या ठेकेदाराने इमारतीला टेकू देऊन प्रथम गच्चीवरचे काम करण्यास सुरुवात केली. पावसाळ्यापूर्वी वरील काम झाले की इमारतीमधील काम नंतर करता येईल; ह्या उद्देशाने त्याने चौथ्या मजल्यावर सिमेंट काँक्रीटीकरण सुरु केले असावे; परंतु `आधी कळस मग पाया’ असा प्रकार झाल्याने सगळा भार पेलणे इमारतीला शक्य नव्हते आणि इमारत पडण्याची चिन्हे दिसू लागली. शुक्रवार ७ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात रात्री दहाच्या सुमारास भिंतीला तडे जाऊ लागले, भिंतीचे प्लॅस्टर भिंतीपासून वेगळे होऊ लागले, सिलिंगचे प्लॅस्टर धडाधड कोसळू लागले. इमारतीचा बाथरूमचा आणि मैदानाकडचा भाग खचू लागल्याचे दिसू लागले. ह्या सगळ्या भौतिक क्रिया होताना मात्र मनात ज्या भावनांचा कल्लोळ सुरु होता, त्याला रोखणे अधिक कठीण होते.

इमारतीतील सगळेचजण घाबरले होते, भांबावले होते. कोणालाच काय करावे? हे सुचत नव्हते. इमारतीतील युवकांनी तत्कालीन स्थानिक नेते माननिय मोहन नाईक यांना कल्पना दिली. त्यांच्या समवेत इमारतीची-परिसराची पाहणी करण्यात आली. तोपर्यंत सर्वांना कल्पना आलीच होती की, आता इमारत सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अचानक वर्षानुवर्षे राहत असलेली इमारत सोडणे- निवासी जागा सोडणे; ह्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. त्यातच जाणत्या लोकांनी पुढाकार घेतला होता आणि त्वरित इमारत खाली करण्याचे आवाहन केले. त्याचवेळेला अग्निशमन दलाला- पोलिसांना कळविण्यात आले होते. वेळ जसजशी पुढे जात होती तसतसा भावनांचा उद्रेक वाढत होता. मात्र इमारतीमधील वर्षानुवर्षांचा कौटुंबिक जिव्हाळा जपला जात होता. स्वतःच्या कुटुंबियांसमवेत प्रत्येकजण दुसऱ्याची काळजी घेत होता. इमारत कोसळणार होती हे पक्के होते; पण दुसऱ्या बाजूला माणुसकीचा पाया मजबूत होत होता.

अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी आणि पोलिसांनी रहिवाशांना जाहीररीत्या आवाहन केले की, आता इमारत खाली करा. उद्या सकाळी म्हाडाचे, महानगरपालिकेचे  अधिकारी, अभियंते प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येतील आणि तुम्हाला इमारतीमध्ये पाठविण्यात येईल.” पुरुष, महिला, तरुण, तरुणी, वृद्ध, बालक सर्वजण बाहेर पडले होते. त्यांच्याकडे फक्त अंगावरच्या कपडे होते. बाकी काही नाही. परिस्थिती अतिशय बिकट होती. तोपर्यंत रात्रीचे बारा वाजले होते. स्थानिक आमदार विलास सावंत, मोहन नाईक यांनी पुढाकार घेऊन महानगरपालिकेची शाळा उघडून दिली. `बुडत्याला काठीचा आधार’ ह्या म्हणीनुसार त्या रात्री शाळेचा आधार मिळाला खरा पण उद्या काय? ह्या प्रश्नाने मात्र सगळेचजण गळून पडले होते. चेहऱ्यावर नाराजी होती-चीड होती, घसा कोरडा पडला होता, हात-पाय थरथरत होते, न रडताही डोळ्यांमधून गंगा यमुना वाहत होत्या. छाती धडधडत होती आणि तो आवाज स्पष्टपणे जाणवत होता. नियतीने झोप उडवलेलीच होती; झोप लागण्याचा प्रश्नच नव्हता! एकमेकांशी बोलून प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या; पण प्रत्ययेकजण आवंढा गिळून गप्प बसला होता.

तेवढ्यात पाच साडेपाच वाजले होते. इमारतीचा थोडा थोडा भाग कोसळू लागला होता. अचानक खूप मोठा आवाज झाला. पहाटेच्या काळोखात धुळाचे लोट पसरला. झालं… संपलं…. मैदानाकडील इमारतीचा मधला भाग पूर्णतः जमीनदोस्त झाला होता. अनेक वर्षांचा संसार मातीमोल झाला होता. प्रत्येकजण फक्त फक्त आक्रोश करीत होता. कोणाला चक्कर आली, कोण बेशुद्ध पडले, कोणी स्तब्ध झाले. कोणी कोणाचे सांत्वन करावे? कोणी कोणाला धीर द्यावा? तरीही जीवित हानी झाली नाही; हा एक खूप मोठा जमेचा भाग होता.

ह्या जमेच्या बाजूवर आजही जेव्हा मी विचार करतो तेव्हा मात्र एक गोष्ट इथे निश्चितपणे नमूद करावीच लागेल.

आमच्या इमारतीसमोर गोल्डमोहर मिल आहे. तिथे मारूतीचे जागृत मंदिर सदर मिलच्या स्थापनेपासून आहे. आम्ही सर्व रहिवाशी इमारतीमध्ये प्रवेश करताना प्रथम मारुतीला नमस्कार करायचो. ही आमची श्रद्धा होती, आमचा विश्वास होता आणि मारुतीरायाचा आशीर्वाद होता; त्यामुळेच जीवित हानीचे दुःख त्यावेळी आले नाही. म्हणूनच `देव तारी त्याला कोण मारी?’ असं शीर्षक लिहिलं आहे.

अंगावरच्या वस्त्राशिवाय कोणतीही वस्तू नसताना जेवायचं कुठे आणि कसं? मात्र समोरच्या गुरुद्वारामध्ये तिथल्या व्यवस्थापनाने सर्वांना जेऊ घातले. अशा कठीण प्रसंगी अनेक सामाजिक संस्थांनी, राजकीय पक्षांनी सर्वतोपरी सहकार्य केले.

अपघात होण्यापूर्वी पशु पक्षांना समजतात आणि ते तसे संकेत देतात; हे आपणासर्वांना माहिती आहेच. त्यावेळीसुद्धा अशीच एक घटना घडली. वृद्ध असणारी दळवी मावशी एकटी इमारतीत राहायची. तिला मुलबाळ नव्हतं. इमारतीच्या खाली फुटपाथवर केळी, शेंगा विकून ती आपला उदरनिर्वाह करीत असे. तिच्याकडे एक पाळलेला पोपट होता. त्या पोपटावर ती पुत्रवत प्रेम करायची! त्याचा सांभाळ करायची. तो पोपट ती घरी आली की तिच्याशी नेहमी बोलायचा. इमारत पडण्याच्या चार दिवस आधीपासून तो मावशीला सांगायचा, “इथून बाहेर जाऊयात – इथून बाहेर जाऊयात!” पण मावशीला त्याचा अर्थ समजला नाही. शेवटी इमारत कोसळली आणि तो पोपट पिंजऱ्यासह ढिगाऱ्याखाली गाढला गेला. ढिगारा उपसताना तिसऱ्या दिवशी तो पोपट पिंजऱ्यासह जिवंत सापडला. तोपर्यंत दळवी मावशी ढिगाऱ्याकडे एकटक लावून तीन दिवस तहान भूक विसरून डोळे पुसत पुसत बसली होती. तिला तिच्या संसारापेक्षा पुत्रवत असणारा पोपट हवा होता, तिला त्याचा खूप मोठा आधार वाटत होता!  त्यावेळी इमारतीच्या बातमी सोबत दळवी मावशी हीचा फोटो पोपट पिंजरा​सह वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता.

हा आधारच मनुष्याला घडवितो; मनुष्याचे भविष्य सुरक्षित करतो. मुलांचे आईबाप आधार असतात; नंतर आईबापांचे आधार मुलं होतात. ह्या भौतिक आधाराबरोबर त्या मारुतीरायाचा आधार म्हणजेच आध्यात्मिक आधार खूप महत्वाचा असतो आणि त्या आधारावरच आलेल्या सर्व प्रसंगावर मात करून आमची इमारत आजही दिमाखात उभी आहे आणि आम्ही सुद्धा आमच्या जीवनात यशस्वी झालो आहोत. १९७६ साली नवीन इमारतीमध्ये आम्ही पुन्हा राहायला गेलो; पण ४९ वर्षांपूर्वीची ती रात्र आजही आठवली की घाम फुटतो.

आता नवीन पिढी आली. त्या वेदना ज्यांनी सोसल्या, त्यांचा त्याग आपल्याला विसरून चालणार नाही. तो प्रसंग पाहणारे काहीजण स्वर्गवासी झाले असतील; परंतु आजही आमच्यासारखी मंडळी आहे, ज्यांनी ह्या यातना सहन केल्या आहेत. त्यांनी आपले अनुभव पुढच्या पिढीसाठी सांगितले पाहिजेत. म्हणूनच मी माझा अनुभव सर्वांना शेअर करीत आहे. त्यावर आपल्या साधकबाधक प्रतिक्रियांच्या मी प्रतिक्षेत आहे. आपल्या प्रतिक्रिया लिहून पाठवा, व्हिडीओ बनवून पाठवा, माझ्याशी संवाद साधा!

https://mazishindewadi1.blogspot.com/

अजून काही आठवलं तर पुन्हा ह्यासंदर्भात लिखाण करण्याचा मानस आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे.

आपला सर्वांचा- मोहन सावंत