अभ्यासपूर्वक आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास शेती-मत्स क्षेत्रात अर्थाजन करण्याची सुवर्णसंधी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज खरं म्हणजे सर्वात प्रथम मनापासून सलाम करायचा असेल तर तो शेतकऱ्यांना करायला हवा. भारताची लोकसंख्या १३५ कोटीहून जास्त आहे. अपवाद सोडल्यास गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ या सर्वांच्या ताटात दोन वेळा जे दोन घास पडतात ते शेतकऱ्यांच्या श्रमाचे फळ आहे. फळफळावर उपलब्ध असण्याचे श्रेय शेतकऱ्यांच्या कष्टाचे आहे. कुक्कुटपालन, शेळीपालन आदी व्यवसायातून मांसही आपल्या ताटात मिळत आहे. समुद्रात मत्सोत्पादन घटले असेल तरी आज देशपातळीवर अनेक भागात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मत्सोत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे देशभर टाळेबंदी असली तरी पैसेवाल्यांच्या जीभेचे चोचले पुरविले जात आहेत.
कोरोनाची महामारी आज ना उद्या संपणारच आहे. मात्र जगातील ६५० कोटी लोकसंख्येची भुक मात्र कधीच संपणारी नाही. त्यामुळे अन्नधान्य, फळे-भाजीपाला, मांस, मत्स आदी जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा या अनंत काळापर्यंत चालू रहाणार आहेत. त्यामुळे या क्षेत्राला कधीच अंत नाही.
शेतकर्यांच्या आत्महत्या हा गेली अनेक वर्षें भारतातील एक परवलीचा शब्द झाला आहे. कोरोनाच्या या कालखंडात देशातील शेतकऱ्यांना मागणी आणि पुरवठ्याअभावी आपल्या शेतातील उभ्या पिकांवर टँक्टर फिरवावा लागला, अशा बातम्या आम्ही पाहिल्या, ऐकल्या. पण आश्चर्य म्हणजे या कालखंडात देशात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे पहाण्यात अथवा ऐकण्यात आले नाही. खरं म्हणजे आता त्यासाठी एक अभ्यास समिती नेमण्याची गरज आहे.
आज कोरोनाच्या टाळेबंदी (लाँकडाऊन) नंतर आपण एकीकडे अर्थचक्र बदलत असताना प्रत्येक टप्प्यात नाण्याच्या दोन बाजू असतात हे पहातो. देश पातळीवरील ट्रक चालक असोसिएशनने यावर्षी एकही ट्रकही खरेदी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. याचाच अर्थ यापुढे वाहन उद्योगावर कुऱ्हाड कोसळणार आहे. चैनीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक उत्पादनांवर मर्यादा येणार आहेत. मात्र शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर आदी अवजारांना सुगीचे दिवस येणार आहेत. मात्र त्यासाठी आता आजच्या पिढीतील तरुणांची मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. मागच्या पिढीची उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी अशी मानसिकता होती. मात्र जागतिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञान, आभासी सुखसोयी आदीमुळे ही मानसिकता उलटी झाली होती. मात्र कोरोना महामारीमुळे जगातील सर्वच चक्रे आता उलटी फिरायला लागली आहेत. गावात परतलेला चाकरमानी वर्ग `गड्या आपला गावच बरा’ असे म्हणायला लागला आहे. आपापल्या राज्यात परतलेल्या मजूर वर्गांची आता हीच मानसिकता तयार झाली आहे. मात्र आता या मानसिकतेला चालना देण्याची खरी कसोटी केंद्र आणि राज्याराज्यांमध्ये सत्तेवर आणि विरोधी पक्षांत असणाऱ्या लोकप्रतिनिधींची लागणार आहे.
भारत स्वातंत्र्य झाल्यापासून सत्तेवर आलेल्या सत्ताधीशांनी कायमच भांडवलशाहीच्या बाजूने अधिकांश योजना राबविल्या. आपल्या देशातील ७० टक्के शेतकरी वर्ग असलेल्या घटकाकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही. स्वामीनाथन समितीच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक चांगल्या योजनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र केंद्रात २०१४ पासून भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यावर शेतीसह शेतीपूरक उद्योग, मत्सोत्पादन या घटकांवर विशेष लक्ष पुरविण्यास सुरुवात केली आहे. किंबहूना देश वाचवायला असेल, महासत्ता बनवायचा असेल तर शेती क्षेत्राला पर्याय नाही, असे राजकारण्यांना प्रकर्षाने पटू लागले आहे. आयुष मंत्रालय निर्माण करून वनौषधी लागवडीकडे विशेष लक्ष दिले जात आहे, मत्सोत्पादन क्षेत्रामध्ये निळी क्रांती घडविण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र शासनाचा २०२२ पर्यंत शेती आणि मत्स क्षेत्राची दुप्पट वाढ करण्याचा मनोदय आहे. त्यादृष्टीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही वर्षात शेती-मत्स क्षेत्रांमध्ये पारंपारिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नैसर्गिकरित्या सेंद्रीय आणि जैविकरित्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ होण्याच्या दृष्टीने अनेक यशस्वी प्रयोग करण्यात आले. सामुदायिक शेती, शेतकरी कंपनी आदीद्धारे प्रोत्साहन दिले जात आहे. मत्स क्षेत्रामध्येही नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. कोरोना महामारीच्या या संकटात आज बेरोजगारीच्या खाईत लोटल्या गेलेल्या तरूणांपुढे या दोन्ही क्षेत्रांमध्ये सन्मानाने उत्पन्नाचे चांगले स्त्रोत मिळण्याच्या अनेक सुवर्णसंधी आहेत. आज कोकणासह राज्यात, देशपातळीवर अनेक संस्था या क्षेत्रात येणार्यासाठी कार्यरत आहेत. कोकण विकास आघाडीसारख्या अनेक संस्था मार्गदर्शनासाठी पुढे आल्या आहेत. मात्र आजच्या पिढीतील तरूणांनी मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल करण्यासह अभ्यासपूर्वक आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास, कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास शेती आणि मत्स क्षेत्रात त्यांच्या पुढे अनेक सुवर्णसंधी आहेत.