गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

आज आपल्या घरी श्री गणेशाचे आगमन झालेले आहे. ह्या श्री गणेशाला आम्ही अनेक नामांनी संबोधतो. साक्षात परमशिवाने `गणपती’, पार्वतीने `ब्रह्मणस्पती’ व कार्तिकेयाने `हेरंब’ असे नामकरण केले तरीही शिवगणांनी मात्र प्रेमाने, लाडाने, कौतुकाने `गणेश’ नावाने त्याला स्वीकारले. हाच श्री गणेश आमच्या घरी परमशिवाचा व पार्वतीचा पुत्र म्हणून येतो आणि आमच्यावर निरंतर कृपा करतो.

आदिमाता अनसूया श्री गणेशाला मानवाच्या विकासासाठी-सर्वांगीण प्रगतीसाठी दिक्षा देते. अनसूयामाता `मोदक’ रूपाने लाभेविन प्रिती अर्थात निःस्वार्थ प्रेम देताच श्री गणेश तृप्त होतो आणि त्याचक्षणी परमशिवाची एकवीस पटींनी तृप्ती होते; जो परमशिव मानवाच्या स्वार्थाला-षडरिपुंना जाळतो. हा दिवस होता भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा! दुसऱ्या दिवशी अत्रि ऋषी स्वतः पौराहित्य करून श्री गणेशाचे उपनयन करतात आणि अनसूयामाता श्री गणेशाला चार हातात मोदक, पाश, परशु व दन्त ही चार साधने व झोळीत एकवीस मोदक देते. अशारितीने सिद्ध होताच श्री गणेश `विघ्नहर्ता’ व `मंगलमूर्ती’ म्हणून कार्यास आरंभ करतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि पंचमी दिवशी घडलेल्या विश्वातील अत्यंत महन्मंगल घटनेमुळे सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये प्रज्ञावंत ऋषीमुनींनी गणेशोत्सवास आरंभ केला.

श्री गणेश मानवाच्या विकासाची गती अखंडपणे सुरु ठेवण्यासाठी कार्य करतो. सामान्य मानवाची बुद्धी त्याच्याच मनापुढे असमर्थ-अबला ठरते. त्या मनावर विजय मिळविण्याचा मार्ग म्हणजे बुद्धीची देवता असणाऱ्या श्री गणेशाचे आगमन आमच्या जीवनात व्हायला हवे.

कोरोनाचे सावट…

जानेवारी २०२० पासून जगावर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. ह्या विषाणूने आपला प्रभाव अगदी ग्रामीण भागातही दाखविला. त्यामुळे जगाबरोबर भारतातही त्याचे भयंकर दुष्परिणाम दिसले. जगात लाखो लोक मृत्युमुखी पडले. व्यवहार ठप्प झाले. देशातील कोट्यवधी जनतेच्या नोकऱ्या गेल्या. सामान्य जनतेची -शेतकऱ्यांची आर्थिक घडी बिघडली नव्हे तर उध्वस्त झाली. रोजंदारीवर जगणाऱ्या गरीब-कष्टकरी जनतेची दैनावस्था झाली. तर प्रत्येकाचे मानसिक संतुलन बिघडून गेले आहे. ह्या सर्व घटना अतिशय त्रासदायक, दुर्दैवी असल्यातरी त्यातून स्वतः पुढाकार घेऊन मार्ग काढण्याशिवाय पर्याय नाही आणि प्रत्येक मानवाला गंभीर संकटाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य श्री गणेश देईल. तोच आमची, आमच्या कुटुंबाची `विघ्ने’ दूर करून खऱ्या अर्थाने `सुख’ देऊ शकतो.

श्री गणेशाला गाऱ्हाणे…

श्री गणेशा `महोत्कट विनायक’ हे नाव धारण करून नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केलास.
श्री गणेशा `मयूरेश्वर’ हे नाव धारण करून सिंधू नामक दैत्याचा वध केलास.
श्री गणेशा `गजानन’ हे नाव धारण करून सिंदूर नामक दैत्याच्या वध केलास.
श्री गणेशा `वक्रतुण्ड’ हे नाव धारण करून मात्सर्यासुराचा अर्थात मत्सराचा वध केलास.
श्री गणेशा `एकदन्त’ हे नाव धारण करून मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध केलास.
श्री गणेशा `महोदर’ हे नाव धारण करून मोहासुराचा अर्थात मोहाचा वध केलास.
श्री गणेशा `गजवक्त्र’ हे नाव धारण करून लोभासुराचा अर्थात लोभाचा वध केलास.
श्री गणेशा `लम्बोदर’ हे नाव धारण करून क्रोधासुराचा वध केलास.
श्री गणेशा `विकट’ हे नाव धारण करून कामासुराचा वध केला.
श्री गणेशा `विघ्नराज’ हे नाव धारण करून ममासुराचा अर्थात अहंकाराचा वध केलास.
श्री गणेशा `धूम्रवर्ण’ हे नाव धारण करून अभिमानासुराचा नाश केलास.
श्री गणेशा `धूम्रकेतु’ हे नाव धारण करून कलियुगाच्या शेवटी तू अवतीर्ण होशील व अनेक दैत्यांचा नाश करशील.

परंतु आता संपूर्ण जगाला कोरोनासुराच्या विळख्यातून सोडाव! सर्वांच्या दुःखाचे हरण कर आणि सुख, समाधान, आनंद, सौख्य, शांती, तृप्ती, किर्ती, यश, सदृढ आरोग्य दे! आमच्याकडून कळत-नकळत झालेल्या चुकांना-पापांना क्षमा कर आणि तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे! तुझी भक्ती आमच्या जीवनात निरंतर राहू दे!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…