विशेष संपादकीय- `देश माझा मी देशाचा’ ही भावना दृढ व्हायला हवी!

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
`देश माझा मी देशाचा’ ही भावना दृढ व्हायला हवी!

आज आपण भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने भारताच्या संविधानाचे उद्देश नेमके कोणते? हे संविधानाच्या आणि आता आपण विद्यार्थ्यांच्या क्रमिक पुस्तकाच्या प्रथम पृष्ठावर वाचतो.

भारताचे संविधान
उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत.

संविधानाची उद्देशिका आम्हाला संविधानाचे अधिष्ठान कोणत्या गोष्टींवर आधारित आहे? ते समजून सांगते.
आम्ही भारताचे…..
इथे `मी’ एकटा नाही. आम्ही सर्व देशाचे नागरिक मिळून ही एकसंघाची भावना त्यातून स्पष्टपणे जाणवते. आम्ही सर्व भारतीय मिळून काय करणार आहोत किंवा काय करायचे आहे? तर…

सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा निर्धार करायचा आहे.

सार्वभौम- सर्वोच्च अधिकार असलेले.

समाजवादी- देशाची सत्ता व देशाला मिळणारे सर्व फायदे समाजाच्या मालकीचे असावेत अशी विचारधारणा.

लोकशाही- लोकांच्या सत्तेखाली लोकांच्या संमत्तीने चालणारी व लोकांच्याच हिताची अशी राज्यपद्धती.

गणराज्य- वैशिष्ट्यपूर्ण लोकांचा समूह असणारे राज्य.

देशातील सर्व नागरिकांचा सत्तेवर समानपणे अधिकार असतो. देशातील सर्व नागरिक देशाचे समानपणे मालक असते. जेव्हा आम्ही एका गोष्टीचे-वस्तूचे मालक असतो तेव्हा त्या गोष्टींची-वस्तूची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावरच येते; ही जाणीव होण्यासाठी संविधानाचा प्रयास दिसतो.

सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय-

सामाजिक जीवनामध्ये कोणालाही कुठल्याही वैशिष्ट्यानुसार असमानता वागणूक देता येणार नाही. प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य लाभावे आणि राजनैतिक क्षेत्रातही प्रत्येकाला समान हक्क मिळावा म्हणजेच सामाजिक, आर्थिक व राजनैतिक अन्याय देशातील कुठल्याही नागरिकावर होता कामा नये; हे सविधान स्पष्टपणे सांगते

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य देताना स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे, इथे ही गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे. मी माझे विचार ठामपणे मांडू शकतो, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला माझ्या श्रद्धास्थानावर विश्वास व श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आहे, मी मला आवडणारी उपासना करू शकतो! याची जाणीव देशातील प्रत्येक नागरिकास असते. पण ही जाणीव प्रकट करताना त्याला कशाचेही भय वाटू नये; याची खबरदारी लोकशाही राज्यपद्धतीतील सत्ताधीशांनी घ्यायची असते.

वरील सर्व गोष्टी देशावरील शुद्ध प्रेम भावनेतूनच निर्माण होते व १) व्यक्तीची प्रतिष्ठा २) राष्ट्राची एकता ३) एकात्मता; उभारली जाऊ शकते. संविधानाची उद्देशिका भारताला खऱ्या अर्थाने सार्वभौमत्व प्रदान करू शकते; परंतु देशातील प्रत्येक घटकांने – प्रत्येक व्यक्तीने हा `देश माझा आहे आणि मी ह्या देशाचा!’ हे अंत:करणापासून मानलं पाहिजे. तरच भारताचे प्रजासत्ताक खऱ्या अर्थाने आम्ही साजरा केला; असं म्हणायला हरकत नाही.

संपादकीय- स्वातंत्र्याचा खरा अर्थ!

संपादकीय… अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याची नवी विधायक व्यवस्था निर्मितीची आवश्यकता!

संपादकीय…. ‘लोकशाही’च्या ज्ञानोत्सवाची दीपावली आवश्यक!