संपादकीय…. ‘लोकशाही’च्या ज्ञानोत्सवाची दीपावली आवश्यक!

सर्व वाचकांना मित्रांना, हितचिंतकांना, तसेच काबाडकष्ट करून जीवन जगणाऱ्या मजुरांना- नोकर वर्गाला आणि अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच समस्त भारतीयांना दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा!

आम्ही व्यक्तिशः लाखो करोडो पणत्या नाही लावू शकत. तेवढे सामर्थ्य आमच्याकडे नसते. मात्र `मी’ एक जरी पणती लावून अंध:कारावर माझ्यापुरता का होईना; मात करू शकतो. ज्या समाजात- ज्या देशात मी राहतो; त्या समाजातील- देशातील अंधःकार जाण्यासाठी अनेकांनी पणत्या लावावे लागतील; तेव्हाच खऱ्या अर्थाने दिपोत्सव साजरा होईल आणि दीपोत्सवात माझा देश न्हाऊन निघेल. तेव्हा मला मिळणारा आनंद द्विगुणित करणारा असेल.

पण पणती कशाची? ही पणती म्हणजेच ज्ञान! ज्ञानाचा प्रकाश देणारी पणती! अज्ञानरूपी अंध:काराचा नाश करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश देणारी पणती प्रज्वलित करायला हवी. कशाचे ज्ञान? ज्ञानाच्या अनेक शाखा आहेत; असा प्रश्न सहजरीत्या उभा राहतो. पशुपक्षी आपल्या पिल्लांना सांभाळतात, त्यांचे पालन – पोषण करतात, घरटे बांधतात, एकत्रित राहतात. हे उपजत ज्ञान जसे पशु – पक्षांना आहे; तसंच उच्च पातळीवरील उपजत ज्ञान मानवाला आहे. परंतु आपल्या जीवनातील अनेक प्रसंग – घटना अशा असतात की तिथे जुजबी ज्ञान आपणास ठेवावेच लागते. भाजी विकत घ्यायची असो वा कपडे, कोणतीही वस्तू असो वा घरगुती यंत्र विकत घेताना आपण आपली बुद्धी वापरतो. जर ते ज्ञान आपल्याकडे नसेल तर ते त्या क्षेत्रातील विद्वान – अनुभवी व्यक्तीकडून घेतो. असे असताना भारतासारख्या लोकशाही देशात कुठल्याही निवडणुकीत जेव्हा उमेदवार निवडीची वेळ येते तेव्हा आपण ते वापरतो का? उमेदवार निवडीचे ज्ञान आपणास असते का? हा प्रश्न विचारून पाहिला पाहिजे.

जर मला घराचे प्लॅन करायचे असेल तर मी आर्किटेक्चरकडे जातो; मला कायदेशीर समस्या निर्माण झाली, तर मी वकिलाकडे जातो, आजारपणात डॉक्टरकडे जातो आणि त्यांचा त्यांचा सल्ला घेतो. ही गोष्ट आम्ही आमच्या जीवनात करतो. निवडणुकीतील उमेदवार निवडताना मात्र आमची सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवतो का? हा प्रश्न नेहमीच आपण जाणवीमध्ये ठेवला पाहिजे. हा एक भाग झाला; तर दुसरा भाग अतिशय महत्त्वाचा आणि लोकशाहीची मूल्ये समर्थ करणारा आहे.

देशामध्ये एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे मतदानचा हक्क वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर व्यक्ती हयात असेपर्यंत मिळतो. लोकशाहीमध्ये हा हक्क असायलाच पाहिजे; पण वयाच्या अठरा वर्षापर्यंत किंवा त्यानंतरही उमेदवार निवडीचे ज्ञान प्रत्येकजण प्राप्त करून घेतो का? तर उत्तर निश्चितपणे येईल, नाही. मग मतदारांनी निवडलेला उमेदवार सक्षम असेल असं आपणास कसं म्हणता येईल?

सोनार सोन्यात इतर धातूंची मिश्रण किती प्रमाणात आहे? हे स्पष्ट करू शकतो. म्हणजेच प्रत्येक पदासाठी काम करण्यासाठी एक पात्रता अंगी असावी लागते. तरच ती व्यक्ती ते काम करण्यास पात्र असते. त्याचप्रमाणे ज्याला भारतीय लोकशाही यंत्रणा – पंचायत राज व्यवस्था यातील प्राथमिक माहिती नसेल तर ती व्यक्ती मतदानातून योग्य व्यक्ती निवडून देईल; याची खात्री बाळगता येत नाही. जो लोकशाहीतील यंत्रणा व्यवस्थापनामध्ये विद्वान – अनुभवी असतो आणि ज्याला अजिबात माहिती नसते अशा दोघांच्याही मताला आम्ही समान मूल्य देतो. लोकशाहीतील व्यवस्थेबद्दल काहीही माहिती नसणारे ६० ते ७० टक्के मतदार जेव्हा आपला उमेदवार निवडतात तेव्हा लोकशाही सदृढ होईल; असे म्हणता येणार नाही. अठरा वर्षे पूर्ण झाल्याची अट पूर्ण करणारे व लोकशाहीबद्दल अज्ञानी असणारे मतदार निवडून देणारा उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करण्यास लायक असेल असे नाही; ही गोष्ट लक्षात घेतल्यास गल्लीपासून दिलीपर्यंत लोकशाहीमध्ये अप्रामाणिक, अकार्यक्षम माणसं निवडून का येतात? हे सहजपणे लक्षात येईल.

म्हणूनच १८ वर्षावरील व्यक्तीस मतदानास पात्र ठरविताना घटनाकारांची अशी अपेक्षा होती की, १८ वर्षापर्यंत भारतातील लोकशाहीची किमान प्राथमिक माहिती प्रत्येक व्यक्तीला होण्यापर्यंतचे शिक्षण सरकारने दिले पाहिजे; परंतु स्वातंत्र्याला पाऊनशे वर्षे झाली तरी अर्ध्यापेक्षा अधिक मतदारांसाठी लोकशाहीची प्रक्रिया समजून सांगणारी शिक्षण व्यवस्था उभीच राहिली नाही. म्हणूनच प्रत्येक मतदाराच्या मताचे त्याच्या शिक्षणावरून – अनुभवावरून मूल्य ठरवावे लागेल आणि दुसरीकडे लोकशाही प्रक्रिया समजून सांगण्यासाठी शिक्षण व्यवस्था उभी करावी लागेल. म्हणजेच लोकशाहीच्या सर्वांगीण ज्ञानाची दिपावाली साजरी झाली पाहिजे. लोकशाहीबद्दल अज्ञानाचा अंध:कार दूर करून लोकशाहीबद्दल ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पडला पाहिजे! अशा प्रकाशाच्या दीपावलीची आज आवश्यकता आहे. त्यातूनच भारत खऱ्या अर्थाने समर्थ होईल!

– नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page