`अनिरुद्ध पहाट-६’ ममत्वाची व स्वामित्वाची भावना पूर्णतः त्यागून जावे सद्गुरुला शरण!
।। हरि ॐ।।
सद्गुरुंचे नामस्मरण, गुसंकिर्तन करताना श्री गुरुगीतेमध्ये साक्षात पार्वतीमातेला शिवशंकर पुढे म्हणतात की,
गुकारस्त्वन्धकारश्च, रुकारस्तेज उच्यते। अज्ञानग्रासकं ब्रह्म, गुरुरेव न संशयः॥२३॥
गु शब्दाचा अर्थ अज्ञानांधःकार होय. आणि रु शब्दाचा अर्थ ज्ञानप्रकाश, तेज होय. अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रह्म गुरुच होत ह्यात मुळीच संशय नाही.
गुकारः प्रथमो वर्णो, मायादिगुणभासकः। रुकारो द्वितीयो ब्रह्म, मायाभ्रान्तिविनाशनम्॥२४॥
गुकार हा पहिला वर्ण मायादि गुण प्रगट करणारा आहे. दुसरा जो रुकार तो ब्रह्माचे द्योतक असून मायानिर्मित भ्रमनिरसन करणारा होय.
एवं गुरुपदं श्रेष्ठं, देवानामपि दुर्लभम्। हाहाहूहूगणैश्चैव, गन्धर्वैश्च प्रपूज्यते॥२५॥
अशा प्रकारे गुरुचरण श्रेष्ठ होत. देवांनाही ते दुर्लभ आहेत. हाहाहूहू नावाच्या प्रमुख गंधर्वाकडून हे गुरुचरण, गुरूपद एकनिष्ठेने पूजिले जाते.
ध्रुवं तेषां च सर्वेषां, नास्ति तत्त्वं गुरोः परम्। आसनं शयनं वस्त्रं, भूषणं वाहनादिकम्॥२६॥
साधकेन प्रदातव्यं, गुरुसंतोषकारकम्। गुरोराराधनं कार्यं, स्वजीवित्वं निवेदयेत्॥२७॥
खरोखर शाश्वत, सर्वात, सर्वदाही गुरुहून श्रेष्ठ दुसरे तत्त्व नाही. म्हणून जेणेकरून गुरू संतुष्ट होईल असे आसन, शयन, वस्त्र, भूषण, वाहन इ. गुरूला अर्पण करावीत.
श्रीगुरुची आराधना करावी. आपले सर्व जीवितच गुरूला समर्पण करावे. साधकाने गुरुकार्यासाठी आपले तनमनधनासहित संपूर्ण जीवितच समर्पण करावे.
कर्मणा मनसा वाचा, नित्यमाराधयेद्गुरुम्। दीर्घदण्डं नमस्कृत्य, निर्लज्जो गुरुसन्निधौ॥२८॥
आचरणाने, मनाने, वाणीने सदैव गुरूची आराधना करावी. गुरूच्या समोर सर्व लाजलज्जा, लोकेषपणा बाजूला ठेवून दीर्घ साष्टांग दंडवत, प्रणाम करावा.
शरीरमिन्द्रियं प्राणं, सद्गुरुभ्यो निवेदयेत्। आत्मदारादिकं सर्वं, सद्गुरुभ्यो निवेदयत्॥२९॥
शरीर, इंद्रिये, प्राण ही सद्गुरुला अर्पण करावीत. ममत्वाची आणि स्वामित्वाची भावना संपूर्णपणे त्यागावी आणि गुरूला शरण जावे.
कृमिकीटकभस्मविष्ठा – दुर्गंधिमलमूत्रकम्। श्लेष्म-रक्तं त्वचा मांसं वंचयेन्न वरानने॥३०॥
हे सुंदरी, आपले शरीर म्हणजे जरी कृमि, कीटक, भस्म, विष्ठा, दुर्गन्ध, मलमूत्र, श्लेष्म, रक्त, त्वचा, मांस आदींनी युक्त आहे तरीही त्यासकट गुरुचरणी स्वतःला समर्पित होण्यात वंचित होऊ नये.
संसारवृक्षमारूढाः पतन्तो नरकार्णवे। येन चैवोद्धृताः सर्वे, तस्मै श्रीगुरवे नमः॥३१॥
संसारवृक्षावर आरूढ होऊन नरकार्णवांत पतन झालेल्या सर्वांचा ज्याने उद्धार केला, त्या श्रीगुरुला नमस्कार असो.
सद्गुरु तत्वाला समर्पित झाल्यावर जे काही घडते ते सद्गुरू तत्वाच्या इच्छेनुसार असते. त्यासाठी संसाराचा त्याग करावा लागत नाही. तर परमात्मा सद्गुरू आहेच, तो ब्रह्माडांच्या प्रत्येक अणूरेणूत आहे, तसा तो माझ्या हृदयातही स्थिर आहे. माझ्या प्रत्येक कृती तो जाणतो. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना ज्या घडतात त्या माझ्यासाठी उचितच आहेत. माझ्यासाठी जे उचित असेल तेच सद्गुरु घडवून आणणार आहे. ह्याची जाणीव असणे म्हणजेच सद्गुरु तत्वाला समर्पित होणे होय!
-`स्टार वृत्त’ ०५०५२०२५











