तिसऱ्या महायुद्धाच्या डाकीणीपासून श्रद्धावानांचे संरक्षण स्वयंभगवान त्रिविक्रम करणार आहे!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक तिसरा

धरू नका जराही संशय याबाबत।
न होऊ देईन तुमचा मी घात॥

तिसऱ्या वचनात स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध सांगतात की, ‘धरु नका जराही संशय याबाबत.’ श्रद्धा आणि संशय या एकमेकांशी पूर्ण विरुद्ध असणाऱ्या गोष्टी आहेत. त्रिविक्रमाविषयी संशय वाटला याचा अर्थच श्रद्धा नाही. ‘हा’ आमचा घात होऊ देणार नाही यावर एकशे आठ टक्के विश्वास हवा. 

स्वयंभगवान त्रिविक्रम आमचा घात होऊ देणार नाहीत. पण आमचा घात का होतो ? याआधी हे पाहायला पाहिजे. आमची धारणा कशामुळे होते ?

धारणाद्धर्ममित्याहुः धर्मो धारयति प्रजाः ।
– महाभारत, कर्णपर्व, अध्याय ४९, श्लोक ५०

अर्थ : प्रजेचे, पर्यायाने समाजाचे धारण करतो, तो धर्म होय.

‘धर्म’ आमचे धारण करतो. धर्माधिष्ठित अर्थ मिळवून त्याचा विनियोग धर्मासाठी, यशप्राप्तीसाठी, स्वजनांच्या इच्छापूर्तीसाठी, समाजकार्यासाठी करावा असे श्रीमद् भागवतात भगवंतांनी सांगितले आहे. धर्माचरण सोडून अर्थाचा आणि कामाचा विनियोग झाल्यास त्यातून समाजाचा घात होतो.

“प्रगतीचा हाच वेग मानवाच्या मुळावर येण्याची शक्यता असून गेल्या काही शतकात मानवाने आत्मसात केलेले विज्ञान व तंत्रज्ञान भस्‍मासुरासारखे मानवाची राखरांगोळी करण्याचा धोका आहे” – डॉ. स्टीफन हॉकिंग.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे नवनवे अविष्कार जगाला स्तिमित करीत आहेत. पण या सगळ्या भोगवादी, युद्धखोर, अशांती निर्माण करणाऱ्या, माणसाला माणसापासून दूर नेणार्‍या वैज्ञानिक क्रांतीला धर्माचे अधिष्ठान नाही. त्यामुळेच ‘तिसरे महायुद्ध’ सुरू झाले आहे. हा घातही परमात्मा त्रिविक्रमाने आधीच सांगितला आहे आणि त्यातून श्रद्धावानांचे रक्षण ‘तो’च करणार आहे.

वैयक्तिक आयुष्यात ‘घात’ होऊ नये म्हणून आम्ही काय करायचे ? धर्माला आमच्या आयुष्यात कसा आणायचा ? याचे उत्तर श्रीसाईसच्चरितात काका दिक्षितांनी दिले आहे.

आम्ही नेणूं दुजा धर्म । आम्हां नाहीं लाज शरम । गुरुवचनपालन हेंच वर्म । हाचि आगम आम्हांतें ॥२३/१७१

आमच्यासाठी सद्गुरुंचा शब्द म्हणजे श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज. तोच धर्म !

धर्मो मद्भकि्तकृत्प्रोक्तः ।
श्रीमद्भागवत, स्कन्ध ११, अध्याय १९, श्लोक २७

अर्थ : माझी (भगवंताची) भक्ती करणे म्हणजेच धर्म.

परमपूज्य सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी सांगितले आहे की, घात अंधारात होतो. अंधार म्हणजे अज्ञान. आमचे धर्माविषयीचे अज्ञान, परमात्म्याच्या नियमांविषयीचे अज्ञान, आदिमातेच्या क्षमेविषयीचे अज्ञान, प्रारब्धाविषयीचे अज्ञान, आरोग्याविषयीचे अज्ञान, भक्तीविषयीचे अज्ञान! हे सगळे दूर करून आमचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी हा त्रिविक्रम अहोरात्र परिश्रम करतो.

परमात्मा आमचा घात होऊ देत नाही, हे श्रीसाईसच्चरितातही पाहायला मिळते.

घात होण्यापूर्वीच परमात्म्याची मदत-
मिरीकरांना होणारा सर्पदंश टाळण्यासाठी आधीच माधवरावांना त्यांच्यासोबत पाठविण्याची योजना.

घातक परिस्थितीत ईश्वरी मदत-
धुनीत हात घालून लोहारणीच्या भट्टीत पडलेल्या मुलीला वाचवणे.

घात झालेल्या परिस्थितीतून पार झाल्यावर पुनर्वसन-
परिस्थितीने गांजून आमडेकर आत्महत्येच्या निर्णयापर्यंत येतात. त्यापासून त्यांना अडवून सामुद्रिकाच्या अभ्यासातून स्थिरस्थावर केले.

श्रीमद्भगवद्गीता सांगते,
अज्ञश्चाश्रध्दानश्च संशयात्मा विनश्यति।

अज्ञानी आणि अश्रद्धावान अशा संशयी लोकांचा नाश होतो. म्हणजेच अज्ञानी व अश्रद्धावान आणि संशयात्मा हे सगळे एकाच वर्गातले लोक आहेत.

संशयस्यांते मनः संतुष्टिमावहेत् । महाभारत आदिपर्व

संशयाचा अंत झाल्यावरच मनाला संतुष्टी मिळते.

श्रेयान्नि:संशयोनरः । महाभारत उद्योगपर्व

संशयरहित माणूस श्रेष्ठ आहे.

बायबलमध्ये अल्पविश्वासाला ‘सहज गुंतवणारे पाप’ असे म्हणले आहे. इब्री १२:१

त्रिविक्रमाचेच वचन असल्याने याचे दोन्ही चरण एकमेकांत परमेश्वरी पद्धतीने गुंफलेले आहेत. ‘ न होऊ देईन तुमचा मी घात ‘ या वचनाचा अर्धा भाग आधी आहे. ‘ धरू नका जराही संशय याबाबत.’ खरेतर याच्या विषयी संशय हीच आमच्या घाताची पहिली पायरी असते. त्यामुळे आमचा घात होऊ नये अशी प्रार्थना करण्यापेक्षा त्याच्याकडे विकल्पहीन भक्तीच मागायला हवी. अशी प्रार्थना ‘या’लाच करायला हवी. भक्ती देणाराही ‘तोच’ आणि तिचे रक्षण करणाराही ‘तो’च!

तिसऱ्या महायुद्धाची डाकीण, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींची तिची पिलावळ, त्यामुळे होऊ घातलेला भयंकर संहार; या सगळ्या विचारांनी कधीकधी दचकून जाग येते. तेवढ्यात या सगळ्या गिधाडांना बंदिस्त केलेला ‘त्या’चा शृंखला धरलेला अभयहस्त दिसतो! ‘त्या’चे प्रेमाश्वासक रुप आठवत मी पुन्हा शांतपणे झोपून जातो.

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

(क्रमश:)

– डाॅ आनंदसिंह बर्वे

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक आठवा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सातवा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सहावा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पाचवा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक चौथा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दुसरा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पहिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *