प्रारब्धाशी लढण्याची युद्धकला शिकविण्याचा छंद असणारा योद्धा म्हणजेच परमपूज्य अनिरुद्ध बापू!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक आठवा

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

माझिया भक्तांचे कुठलेही प्रारब्ध।
बदलीन, तोडीन वा घालीन बांध॥

प्रारब्ध म्हणजे काय ? त्याचे भोग अटळ आहेत का ? ते बदलता येते का ? कसे ? असे विविध प्रश्न सामान्य माणसाला पडत असतात. त्यांची त्रिविक्रम अनिरुद्धांनी दिलेली उत्तरेच हे वचन समजण्यासाठी पहायला हवीत.

• माझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी, या माझ्या पूर्व जन्मातील किंवा या जन्मातील चुकांमुळेच असतात, हे निर्विवाद सत्य आहे.
मला माझे प्रारब्ध बदलायचे असेल, तर त्यासाठी ते प्रारब्ध ज्या रूपात माझ्या ह्या जन्मात काम करीत आहे, ते रूप बदलायला हवे.
आणि ते रूप म्हणजे माझे स्वतःचेच मन. प्रारब्ध बदलण्यासाठी मनच बदलावे लागते.  (- सत्यप्रवेश चरण ४)

• ‘मनः’ हा च्या विरुद्ध ‘नमः’ हा शब्द आहे. नमस्कार करणे म्हणजे नुसते हात जोडणे नाही, तर मन चुकीच्या दिशेकडून उचित दिशेला वळविणे. ‘मन’ आणि ‘नम’ या दोन शब्दांमध्ये उभा असतो तो ‘नाम’ हा शब्द. मनाला उचित दिशा देणारा उत्प्रेरक म्हणजे नाम, तर अनुचित दिशा देणारा उत्प्रेरक म्हणजे ‘मान’ ( अहंकार ). (- सत्यप्रवेश चरण ५)

एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा
हरिकृपे त्याचा नाश आहे

ही हरिकृपा नामाचे वाहन करून माझ्यापर्यंत येऊन पोहोचते, हे मात्र विसरू नका. (-सत्यप्रवेश चरण ६)

• तो अनंत करुणामयी परमेश्वर सज्जनांना त्यांचे प्रारब्धभोग अश्या वेळी भोगावयास लावतो, जेव्हा ते अडचणींवर मात करावयास तसेच वेदना सहन करावयास समर्थ असतात.  (- सत्यप्रवेश चरण २१)

• शेवटी माझ्या प्रारब्धात आहे तसेच घडणार, असे म्हणून निष्क्रिय बनणे हे पाप आहे. (- सत्यप्रवेश चरण ३९)

• एकनाथांनी वर्णिलेली ‘हरिकृपा’ म्हणजेच परमेश्वराच्या भक्तीचा आश्रय करून व उचित पुरुषार्थ करून जमविलेला व परमेश्वराच्या अकारण कारुण्यामुळे वाढणारा सत्वगुणाचा साठाच होय.
….आणि म्हणूनच प्रारब्धापेक्षाही भक्तीशील पुरुषार्थच ( भक्ती व उचित परिश्रम ) अनंत पटीने श्रेष्ठ व ताकदवान आहे, हे निर्विवाद सत्य आहे.
(- सत्यप्रवेश पृ. १७४)

श्रीसाईसच्चरितात आपण बघतो – साईनाथ भिमाजी पाटलांचे प्रारब्ध बदलतात. त्यांच्या प्रारब्धात असणारे असह्य भोग स्वप्नात भोगून घेतात आणि त्यांचा रोग बरा होतो. दामूअण्णा कासार यांच्या प्रारब्धात संततीसौख्य नसते. बाबा हे प्रारब्ध तोडतात आणि आंब्याचा प्रसाद देऊन दामूअण्णांना संततीसौख्य बहाल करतात. डॉक्टर पिल्ल्यांना बरेच दिवस भोगाव्या लागणाऱ्या नारुच्या वेदनांना बाबा बांध घालतात आणि द्वारकामाईत अब्दुलचा पाय पिल्ल्यांच्या नारूग्रस्त पायावर पाडून बाबा त्यांना लवकर बरे करतात.

माझ्या आयुष्यात श्रीत्रिविक्रमाचे हे वचन उतरण्यासाठी मला भक्तीभावचैतन्यात असायला हवे. भक्ती आणि माझे प्रयत्न ( पुरुषार्थ ) दोन्ही करायला हवे. मी भक्ती करतो म्हणून त्रिविक्रम कृपा करणार असे नाही. तो प्रेमळच आहे. ती कृपा मला स्वीकारता यावी यासाठी भक्ती आवश्यक. भक्त बनण्याचा राजमार्ग म्हणजे सद्गुरुंवर विश्वास आणि जमेल तितके जास्तीत जास्त नामस्मरण. मग आमच्या प्रारब्धाचे जे काही करायचे ते तो त्रिविक्रम करेलच.

• मी योद्धा आहे आणि ज्यांना ज्यांना म्हणून आपल्या प्रारब्धाशी लढायचे आहे त्यांना युद्धकला शिकवणे हा माझा छंद आहे. (-सत्यप्रवेश पृ. २९७)

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

(क्रमशः)
-डाॅ आनंदसिंह बर्वे

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सातवा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सहावा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पाचवा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक चौथा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक तिसरा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दुसरा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पहिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *