रणकर्कश होण्यापूर्वी श्रीरामाच्या रघुनंदन-भरताग्रज रूपाला शरण गेलं पाहिजे!
देशासाठी, मातृभूमीसाठी, धर्मासाठी, स्वतःसाठी, आप्तांसाठी
`श्रीराम राम रणकर्कश राम राम’ हा मंत्र पठण करा!
गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी पितृवचन होण्यापूर्वी परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या आप्तांसाठी `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ हा मंत्र श्रद्धावानांना पठण करावयास लावला आणि दररोज किमान पाच वेळा म्हणण्यास सांगितले. ज्यातून अतिशय समर्थ रणगंभीर स्पंदनं तयार होतील ती आमच्यासाठी उपयुक्त असतील! श्रीरामरक्षा स्तोत्र आणि मंत्रातील `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ ह्या चरणावर परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी ८ फेब्रुवारी २००७ रोजी अत्यंत महत्वाचे प्रवचन केले होते. त्याचा संदर्भ घेत खालील लेख लिहिला आहे. |
रणकर्कश होण्यापूर्वी श्रीरामाच्या रघुनंदन-भरताग्रज रूपाला शरण गेलं पाहिजे!
श्रीराम राम रणकर्कश राम राम
(भाग दोन) … २००७ सालापासून राम रघुनंदनही असेल, भरताग्रज असेल आणि रणकर्कश होण्यासाठी उत्सुक झालेला असेल. रणकर्कश कधी होईल? हे रामावर अवलंबून नाही तर ह्या जगातल्या नीच लोकांवर अवलंबून आहे. अनितीमान लोकांवर अवलंबून आहे. ते किती प्रमाणात रामाला पेटवतात, किती प्रमाणामध्ये ते मारुतीच्या शेपटीला पेटवतात. मारूतीची शेपटी जाळायला निघाले की राम पेटून निघतो! त्यामुळे राम रणकर्कश कधी बनणार ह्याचा मुहूर्त राम ठरविणार नसून रावण आणि रावणाचे सैनिक ठरविणार आहेत. मात्र रावणाची सगळी हालचाल बघून, रावण सैनिकांची सगळी हालचाल बघून! ती वेळ काही खूप लांब नाही, हे नक्कीच!
श्रीराम राम रणकर्कश राम राम।
हा मंत्र जो कोणी म्हणेल त्याच्या आयुष्यामध्ये राम रणकर्कश बनून कधीही येणार नाही. तर राम भरताग्रज बनून येईल, मोठा भाऊ म्हणून येईल. मोठा भाऊ म्हणजे पैशाचा हिस्सा मागणारा मोठा भाऊ बनून नाही तर स्वत:कडचं सगळं धाकट्या भावाला देणारा म्हणून, कृपाळू मोठा भाऊ म्हणून येईल, तुमच्या कुळाचा कुलपती म्हणून येईल, तुमच्या गोत्राचा गोत्रपती म्हणून येईल. पण कधी? राम रणकर्कश बनायला सिध्द झालेला आहे; हे जाणून आधीच आम्ही त्या भरताप्रमाणे रामाची भक्ती करायला लागू तेव्हाच!
एक इंग्रजीमध्ये खूप सुदंर म्हण आहे; सर्व लोकांना काही काळ फसविता येते, काही लोकांना सर्व काळ फसविता येते; परंतु सर्व लोकांना सर्व काळ कधी फसविता येत नाही आणि त्याच्या पेक्षा महत्वाची गोष्ट भगवंताला एक पळही फसविता येत नाही.
आम्ही स्वत:ला फसवू शकतो, जवळच्या नातेवाईकांसमोर आम्ही किती चांगले आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करू शकतो. पण भगवंताला मात्र तुमची खरी कुरघोडी माहीत असतात आणि म्हणून लोकांच्या समोर तुम्ही किती नितीमान ठरलात, तुमच्या नातेवाईकांनी किती उदोउदो केला तरी तुमच्या अटळ प्रारब्धानुसार जो तडाखा बसवायचा तो भगवंत देतच राहतो.
मग आम्ही देवाच्या नावाने शंख करीत फिरतो. पण आम्हाला माहीत नाही की, तो शंख करीत फिरताना आम्ही त्या रामाला ललकारतो की, `ये आणि लढ माझ्याशी’ म्हणून आणि रामाला ये आणि लढ म्हटल्यावर काय परिस्थिती होते ती रावणाच्याच बाबतीत नाही तर आम्ही खराचेही चौदा सेनापती बघितले. तेव्हा आपण बघितले की, रामाला `ये म्हणायचं’ की `लढ माझ्याशी’ म्हणायचं. म्हणजे सर्वस्वी घातच. आणि नुसत्या एका आयुष्याचं नाही तर पुढच्या अनेक आयुष्याचा घात निश्चितपणे! .
त्या रामाला अशा मंडळींची जराही दया येत नाही आणि येणारही नाही!
अकारण कारुण्य म्हणजे वाट्टेल त्याच्यावर करुणा करीत सुटणं नव्हे, अनितीवर पांघरून घालणं नव्हे, चुकीच्या गोष्टींना लपवून ठेवणं नव्हे. एकशे आठ टक्के नाही. अकारण कारुण्य म्हणजे जे आता आपण बघितलं ते माणसांचं कारुण्य.
दिवाळीमध्ये आम्ही छोटा अॅटमबॉम्ब लावतो. तो जर हातात पुâटला तर तो हात किती भाजतो मला सांगा आणि जेव्हा तो अॅटमबॉम्ब नागासकी हिरोशिमावर पडला तेव्हा अख्खीच्या अख्खी शहराची शहरी जळली. तो त्याचा गुणधर्म आहे म्हणून. त्याचप्रमाणे भगवंताचं अकारण जसं मोठं आहे तसं तो जर कोपला तर त्यातून निर्माण होणारी संहारक शक्ती तेवढीच मोठी आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून आम्हाला त्याची रणकर्कशता जाणून घ्यावी लागते आणि मग त्यानुसार आमचा मार्ग बदलायचा हा निश्चय करावा लागतो.
जो रामाचा नाही त्याच्यापुडे राम कुठच्या स्वरूपामध्ये येऊन उभा राहतो आणि त्याचा एक थेंब जरी आमच्या आयुष्यामध्ये आला तरी मोठे स्फोट घडवून आणले जाऊ शकतात.
रामाचं रणकर्कश रूप सुध्दा उपकारीच आहे. कारण हा राम रणकर्कश वारंवार बनत नाही. हा राम सदैव रघुनंदन आणि भरताग्रज ह्या रूपामध्येच विराजमान झालेला असतो. मात्र हा रणकर्कश बनतो ते रामराज्याच्या स्थापनेसाठी आणि रावण राज्याच्या विनाशासाठी. त्यामुळे आम्हाला माहित पाहिजे की, ह्याचं रणकर्कश रूप ही वारंवार घडणारी घटना नव्हे. हे त्याचं रणकर्कश रूप, हे त्याचं नित्य रूप नव्हे. तर ह्याने स्वीकारलेलं स्वरूप असतं फक्त त्या क्षणापुरतं. मात्र त्या क्षणाला तो पूर्णपणे रणकर्कश असतो. ज्या क्षणाला तो रणकर्कश बनायचं ठरवतो त्यासाठी तो फक्त रणकर्कश असतो.
जे चांगले आहेत त्याचं काय? त्यांच्यासाठी तो सदैव भरताग्रजच आहे!
हे रघुनंदन रामा, हे भरताग्रज रामा, हे भक्तांच्या रक्षणकर्त्या रामा आम्हाला तुझं रणकर्कश स्वरूपाची माहिती आहे म्हणूनच आम्ही तुला शरण आलो आहोत. तू आमचं रक्षण कर म्हणजे रणकर्कशतेचा एक अंशही आमच्या जीवनात कधी येऊ देऊ नकोस आम्हाला तुझं सदैव रघुनंदन रूप बघायला मिळू दे. आम्हाला सदैव तू भरताग्रज रूपामध्ये आमच्या जीवनामध्ये राहायला हवास आणि त्यासाठी आमची सर्वांची भरताच्या मार्गावरून, हनुमंताच्या मार्गावरून चालायची तयारी हवी!
।। हरि ॐ ।।