उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२१

सोमवार दिनांक ९ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- १८
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण शुक्ल पक्ष प्रतिपदा सायंकाळी १८ वाजून ५६ मिनिटापर्यंत आहे.
नक्षत्र- आश्लेषा सकाळी ०९ वाजून ४९ मिनिटापर्यंत
योग- वरियान रात्री २२ वाजून १३ मिनिटापर्यंत
करण १- किंस्तुघ्न सकाळी ०७ वाजून ११ मिनिटापर्यंत
करण २- बव सायंकाळी १८ वाजून ५६ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- कर्क सकाळी ०९ वाजून ४९ मिनिटापर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २० मिनिटांनी होईल.
सूर्यास्त- सायंकाळी १९ वाजून ०८ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- पहाटे ०६ वाजून ४५ मिनिटांनी होईल.
चंद्रास्त- सायंकाळी २० वाजून ०५ मिनिटांनी होईल.

भरती- रात्री १२ वाजता आणि दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी होईल.
ओहोटी- सकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी आणि सायंकाळी १८ वाजून ५५ मिनिटांनी होईल.

दिनविशेष:-
कैलासराणा शिव चंद्रमौळी।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥

आज आहे श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि श्रावण सोमवार!
सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो.
श्रावण महिन्यात श्रवण भक्तीचे विशेष महत्व आहे. परमात्म्याच्या गुणसंकीर्तनाचे श्रवण ह्या महिन्यात केल्यास श्रद्धावानाची आध्यात्मिक प्रगती होते, जी जीवन सर्वांगिण सुंदर बनविते.

आता दिनविशेष मध्ये ऐतिहासिक घटना पाहणार आहोत.

आजच्या दिवशी १९४५ साली जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ९० हजार व्यक्ती काही क्षणांत ठार झाले. लाखो लोक जखमी झाले. परमाणू बॉम्बच्या दुष्परिणामांमुळे पुढील काही वर्षात लाखो लोक आजाराने मृत्युमुखी पडले. असा बेचिराख झालेला जपान आज मोठ्या सामर्थ्याने उभा आहे. त्या देशातील नागरिकांना सलाम!

आज आहे क्रांतिदिन…
इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन!

सन १९४२ ला अखेरचा लढा देण्याचे महात्मा गांधींनी ठरविले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर अर्थात आताचे ऑगस्ट क्रांती मैदान येथे झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला चले जावचा इशारा दिला. ‘लढेंगे या मरेंगे’ची घोषणा झाली आणि बघता बघता सारा देश पेटून उठला. त्याच रात्री गांधींजींसह सर्व मोठ्या नेत्यांना अटक झाली. हजारो, लाखो तरुणांनी यात भाग घेतला आणि सारा देशच तुरुंग बनला. अनेक कार्यकर्ते भूमिगतही झाले. पण दुस-या दिवशी ९ ऑगस्टला मुंबईसह अनेक ठिकाणी जनक्षोभ उसळला.

ब्रिटिशांच्या जुलामाला न जुमानता अरुणा असफअली या तरुणीने अखेर गोवालिया टँकवर तिरंगा फडकावला. अधिवेशनात गांधीजींनी दिलेला ‘चले जाव’चा नारा स्वातंत्र्याचा मंत्र ठरला. मुंबईतून सुरू झालेल्या या आंदोलानाचे पडसाद देशभर उमटू लागले. निशस्र आंदोलकांवर ब्रिटिश सोजिरांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हा स्मृतिस्तंभ तेव्हाच्या गोवालिया टँकवर म्हणजेच आताच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर त्या लढ्याच्या स्मृती जागवत उभा आहे.

अशीच एक क्रांती आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी ९ ऑगस्ट १९२५ रोजी घडवून आणली. लखनौ जवळ काकोरी येथे रेल्वेगाडीची थांबवून क्रांतिकारकांनी सरकारी खजिना लुटला आणि त्यातून इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र खरेदी केली. हा ऐतिहासिक काकोरी कट खूपच प्रसिद्ध आहे.

सशस्त्र संघर्षासाठी पैशाची चणचण या क्रांतिकारांना भासत होती. तेव्हा क्रांतिकारकांनी लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौपासून आठ मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली व पूर्ण केली. या घटनेलाच ‘काकोरी कट’ असे म्हणतात.

काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल १९२७ पर्यंत चालले. यामधील रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशीची, चौघांना आजन्म हद्दपारीची व अन्य क्रांतिकारकांना तुरुंगवासाची शिक्षा फर्मावण्यात आली. कटातील मुख्य आरोपी व अनेक सरकारविरोधी कारस्थानांमध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन भूमिगत राहिले. पण अखेर चंद्रशेखर आझाद २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबाद येथे आल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रजांनी अटक करण्यापूर्वी स्वत:वर गोळी झाडून शहीद झाले.

You cannot copy content of this page