संपादकीय- देशाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करणारा ऋषी हरपला!
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचा श्वास घेतला आणि भारतातील एक उत्तुंग अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. देशाचा सर्वांगिण विकास हेच त्यांचं सर्वोच्च ध्येय होतं. ह्या ध्येयासाठीच त्यांनी आपल्या जीवनातील सर्व पैलू उपयोगात आणले. स्वतःचा सर्वांगिण विकास साधताना त्यांनी कशाचीही अपेक्षा न करता निस्वार्थीपणे देशासाठी केलेले कार्य अजर अमर आहे. त्यांच्या आदर्श जीवनाचे अनेक पैलू पाहताना त्यांच्या व्यक्तिमत्वाची कल्पना येते, परंतु आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व्हावा; ही त्यांची धारणा भारतीयांच्या नित्य स्मरणात राहील.
एखाद्याचा जीवन प्रवासाचा वेध घ्यायचा म्हटल्यास त्याचे बालपण पाहावे लागते. कारण हा बालपणाचा काळ मनावर खरे संस्कार दृढ करीत असतो. अटलजींचे बालपण बटेश्वर ह्या खेडेगावात गेले. उत्तर प्रदेशातील आग्र्याजवळचा हा खेडेगाव. बटेश्वर खेडेगाव असले तरी या ठिकाणी मराठ्यांचे उत्तरेकडील ठाणे होते. अटलजींचे आजोबा श्यामलाल गावात पंडित म्हणून सुपरिचित होते. रामायण, महाभारत, वेद, पुराणे, गीता, भागवत, रामचरितमानस या विषयांवर प्रवचने देणारे श्यामलाल भारतीय अध्यात्म आणि भक्ती मार्गाचे माहात्म्य प्रसाराचे कार्य करीत होते. त्यांचा सहवासही अटलजींना लाभला. आजोबांचा वारसा अटलजींचे पिताजी कृष्णबिहारी यांना मिळाला. त्यांनी लिहिलेली प्रार्थना ग्वाल्हेरमधील शाळांत म्हटली जायची. ते कविताही करत. आध्यात्मिक संस्कारांचे बालपण सुदैवाने अटलजींना प्राप्त झाले आणि तेव्हाच सर्वांगिण विकासाची बीजं अंकुरली होती. अटलजी बटेश्वरला सात-आठ वर्षांपर्यंत होते.
अटलजींचे वडील कृष्णबिहारी ग्वाल्हेरला शिक्षकाची नोकरी करण्यासाठी गेले. तेथे ते शाळेचे मुख्याध्यापकही झाले. अटलजीही हायस्कूलसाठी बटेश्वरहून ग्वाल्हेरला आले आणि ‘आर्य समाजा’च्या ‘आर्यकुमार सभे’त दाखल झाले. काही दिवसांनी ते संघाच्या शाखेत गेले. देशभक्ती व देशसेवा करण्याची दृढता त्यांच्यात निर्माण झाली! गांधीजींनी १९४२ चे ‘चलेजाव आंदोलन’ छेडले. त्यावेळेस अटलजी मॅट्रिकला होते. अटलजींना स्वातंत्र्याच्या प्रयत्नांना साहाय्य केले. अटलजी त्यावेळी तेवीस दिवस कारागृहात होते.
अटलजी ग्वाल्हेरला आले, मॅट्रिक उत्तीर्ण होऊन व्हिक्टोरिया कॉलेजमधे गेले. त्या काळात ‘स्टुडण्ट फेडरेशन ऑफ इंडिया’ ही कम्युनिस्ट पार्टीची एकमेव संघटना कॉलेजमध्ये होती. अटलजींचा संबंध तिच्याशी थोडा फार आला होता. त्यावरून ते कम्युनिस्ट असल्याचा आरोप पुढे त्यांच्यावर झाला. अटलजी राज्यशास्त्र घेऊन एम.ए. होण्यासाठी ग्वाल्हेरहून कानपूरला गेले. ते एमएची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. तेथून ते पीएचडी करण्यासाठी लखनौला गेले. पण त्यांची जवळीक त्या काळात दीनदयाळ उपाध्याय यांच्याशी वाढली. गुरूजींनी संघाने वर्तमानपत्र काढावे असे सांगताच उपाध्याय यांनी ‘राष्ट्रधर्म’ हे मासिक ३१ ऑगस्ट १९४७ ला काढले व अटलजी त्या वर्तमानपत्राचे संपादक झाले. नंतर ‘पांचजन्य’ साप्ताहिक निघाले. त्याचेही तेच संपादक होते. काही दिवसांनी (१९५०) अटलजीजींच्या संपादनाखाली ‘दैनिक वीरार्जुन’ सुरू झाले. ते एका दैनिकाचे संपादक झाले; याचा वडील कृष्णबिहारींना अभिमान वाटला. दुर्दैवाने ‘वीरार्जुन’ लौकरच बंद झाले आणि अटलजींची संपादकीय कारकीर्द संपली.
संघाचे सर्वोच्च प्रचारक म्हणून कार्य करता करता त्यांची राजकीय कारकीर्द पूर्णत्वास गेली. खासदार, पक्षाचे अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, पंतप्रधान असा त्यांचा आलेख चढता राहीला. २०१५ साली त्यांना `भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रात २००४ मध्ये पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्यास सुरुवात केली. नंतरच्या काळात त्यांना आजारपणाने गाठलं. शेवटी त्यांनी मृत्यूवर `विजय’ मिळविला.
कवी, पत्रकार, राजकारणी, संघाचे स्वयंसेवक, पक्षाचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, केंद्रीय मंत्री, पंतप्रधान अशी सर्व पदं त्यांनी भूषवली; परंतु हे सर्व कार्य करताना त्यांनी देशाच्या सर्वांगिण विकासाकडे लक्ष ठेवले. देशातील सर्वसामान्य जनता ह्यांना केंद्रबिंदु मानून आपला `जीवनयज्ञ’ संपन्न केला. त्यांना श्रद्धांजली वाहताना `देशाचा एक निस्वार्थी प्रामाणिक सेवक आणि देशाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करणारा ऋषी हरपला!’ असे म्हणावे लागते.