भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे निधन- सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली:- भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे निधन सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी झाले. त्यामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

कवी, पत्रकार, अजातशत्रू, तपस्वी राजकारणी, युग प्रवर्तक, देशभक्त, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानिमित्त केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या सात दिवसात होणारे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. उद्या शुक्रवारी त्यांचं पार्थिव ६ ते ९ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत भाजप मुख्यालयात त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल. दुपारी एक नंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल. सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली:- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. वाजपेयी यांना सध्या लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले आहे. किडनी संसर्गामुळे ११ जून २०१८ रोजी पासून वाजपेयींवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. काल सायंकाळीपासून त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. पंतप्रधान मोदी गेल्या सोळा तासात दोनदा एम्समध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ‘एम्स’ रुग्णालयात बडे राजकीय नेते उपस्थित आहेत. वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून देशभरात परमात्म्याची प्रार्थना केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *