अॅड. सुभाष सुर्वे (LL.M.) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आदर्श कर्तृत्वाला सलाम!
रोखठोक आणि स्पष्टपणे बोलणारे अॅड. सुभाष सुर्वे यांचे भारदस्त व्यक्तिमत्व नेहमीच आमच्याच नाहीतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या मनावर छाप पाडून जाते. कायद्याच्या सखोल ज्ञानाचा सदुपयोग ते नेहमीच उचित गोष्टींसाठीच करीत असतात; ही त्यांची खासियत आम्ही अनेक वर्षे पहिली-अनुभवली. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, व्यासंगाचा, अभ्यासूवृत्तीचा उपयोग त्यांची सामाजिक बांधिलकी सदृढ होण्यास होतो; त्यामुळेच त्यांचा आम्हा मित्रपरिवाराला अभिमान वाटतो. म्हणूनच अॅड. सुभाष सुर्वे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या छोट्याशा लेखाद्वारे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत आहोत. त्यांनी आमच्या शुभेच्छा स्वीकाराव्यात आणि भविष्यात त्यांची उत्तोरोत्तर प्रगती करावी; ही आदिमातेचरणी प्रार्थना!
अॅड. सुभाष सुर्वे यांनी आपल्या वडिलांच्या आदर्शाचे छोटेसे रोप महावृक्षात रूपांतरित केले. त्यांचे वडिल मुंबईच्या शासकीय मुद्राणालयात नोकरी करायचे. लालबागसारख्या गिरणी कामगारांच्यावस्तीत १० फूट बाय १० फूट घरात राहून आपला संसार सांभाळत होते; पण गावातून येणाऱ्यांनाही मार्गदर्शन करीत होते, त्यांना नोकरीला ठेवत होते, त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देत होते, त्यांची विवाह करून देत होते. असा त्यांचा संसार स्वतःच्या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता तर तो व्यापक झाला होता आणि त्यात गावातील शेतकरी, कष्टकरी, होतकरू युवक-युवती, जवळचे-दूरचे नातेवाईक होते. त्यातून अनेकांचे संसार उभे राहिले. तुंटपुज्या पगारातही त्यांनी इतरांसाठी केलेले काम खऱ्याअर्थाने आदर्शवत होते आणि आपल्या वडिलांचा तो आदर्श अॅड. सुभाष सुर्वे यांनी जपला. आजही अॅड. सुभाष सुर्वे यांच्या वडिलांना कोकणात राहत असलेल्या त्यांच्या गावात मान आहे.
गिरण गावात शिकत असताना आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना अॅड. सुभाष सुर्वे यांनी आपले शिक्षण घेत घेत – नोकरी करीत करीत सामाजिक सभानता जोपासली. सुरुवातीला विक्रीकर विभागात लिपिक म्हणून काम सुरु केले. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि मुंबई पोलीस दलात त्यांना मानाची नोकरी मिळाली. नंतरच्या काळात लाचलुचपत प्रतिबंधित विभागात, सीबीआयमध्ये त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आणि भूषणावह होते. आजही मुंबई पोलीस दलात त्यांचे कौतुक केले जाते; कारण त्यांनी केलेले कार्य अभिमानास्पद होते. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी सहाय्य्क पोलीस आयुक्त ह्या पदावर काम करीत असताना स्वेच्छा निवृत्ती घेतली. कारण त्यांना वकिलीचे व्रत जोपासायचे होते.
अॅड. सुभाष सुर्वे आजही अनेक मोठ्या स्वयंसेवी सामाजिक संस्थांना कायदेशीर सल्ला देत आहेत. अनेक संस्थांवर ते क्रियाशील पदाधिकारी म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या अनुभव संपन्न ज्ञानामुळे सर्व संस्थांना सामर्थ्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या पत्नी स्त्रीरोगतज्ञ असून त्यांचे स्वतःचे रुग्णालय आहे. त्यांच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत. असा हा अॅड. सुभाष सुर्वे यांचा परिवार सदैव सुखात, आनंदात, ऐश्वर्यात राहू दे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून समाजाची सेवा घडत राहो; ही परमात्म्याचरणी प्रार्थना! अॅड. सुभाष सुर्वे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लाख लाख शुभेच्छा! अॅड. सुभाष सुर्वे यांच्या आदर्श कर्तृत्वाला आमचा सलाम!
🙏 शुभेच्छूक:- 🙏
संपादक:- नरेंद्र हडकर
सहसंपादक- मोहन सावंत
(पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवार)