अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रमात कार्यक्रम संपन्न

नागरिकांना सुदृढ जीवन जगण्याचा विचार गोपुरी आश्रमाने द्यायला हवा! -विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री

कणकवली (प्रतिनिधी):- “नागरिकांना स्वयंपूर्ण आणि सुदृढ जगण्याचा विचार देण्यासाठी कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी ७३ वर्षापूर्वी गोपुरी आश्रम उभारला. हाच विचार आपण सर्व समाजाने मिळून आबादीत ठेवायला हवा. गोपुरी आश्रम सक्षम झाला तर कोकणचा सांस्कृतिक ठेवा अबाधित राहण्यासाठी चांगली मदत होऊ शकेल!” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री यांनी कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रमात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात बोलताना केले.

 

गोपुरी आश्रमाने काजू प्रक्रियेचा स्वयंरोजगाराचा प्रयोग गेल्या वीस वर्षापासून सुरू केला. या व्यवसायातील जे अडथळे होते त्यावर सातत्याने अभ्यास आणि कृती करून ते अडथळे दूर करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात काजू प्रक्रियेच्या स्वयंरोजगाराला चालना मिळाली. गोपुरी ही ग्रामीण विकासाची प्रयोगशाळा होती, तशीच पुढे उभारी घ्यायला हवी; याकरिता आम्ही स्वतः काम करायला सुरुवात केली आहेच पण युवावर्गाने, समाजाने यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करायला हवा.

कणकवलीतील नगर वाचनालयाचे धाकू तानवडे यावेळी विचार मांडताना म्हणाले की, अप्पासाहेब पटवर्धन यांनी आश्रम सुरू करण्याचा करण्याच्या अगोदर नागरिकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कणकवलीत नगर वाचनालय सुरू केले. आज ‘अ’ वर्ग असलेले हे कणकवली तालुक्यातील वाचनालय आहे. गोपुरी आश्रमाने युवकांच्यात वाचनाची आवड जोपासण्यासाठी ‘वाचन संस्कृती उपक्रम सुरू केला’ कोरोना महामारीमुळे त्यात खंड पडला असला तरी या उपक्रमामुळे असंख्य युवकांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी खूप चांगले प्रयत्न झाले. गोपुरी आश्रम हे जनआंदोलन व्हायला हवे. कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः समाजातील जाणकार मंडळींनी गोपुरी आश्रमाला सहकार्याचा हात द्यायला हवा. अप्पांची जयंती विचारांची जयंती व्हायला हवी.

या कार्यक्रमात युवाईच्यावतीने श्रद्धा पाटकर आणि कवी शैलेश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रेयस शिंदे म्हणाले की, मी विशेषत: साहित्यिक म्हणून माझ्या जीवनात वाटचाल करत आहे, त्याचा पाया गोपुरी आश्रमाने रोवला. श्रद्धा पाटकर म्हणाली अप्पासाहेबांचे विचार युवकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. युवकांच्यात वैचारिक आणि सामाजिक सक्षमता येण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे.

गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या आठवणी सांगितल्‍या. अप्पासाहेब पटवर्धन यांनी गांधीजींनी मांडलेले माणसाच्या विकासाचे विचार तंतोतंत कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. गोपुरी आश्रमाच्या कामाला युवाईने आणि समाजाने जोडून घ्यायला हवे.

गोपुरी आश्रमात अत्यंत साधेपणाने अप्पासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला गोपुरी आश्रमाचे सचिव मंगेश नेवगे, संचालक अर्पिता मुंबरकर, अमोल भोगले, सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटकर, गोपुरी आश्रमाचे बाळकृष्ण सावंत, सदाशिव राणे, नितीन जावळे आदी मान्यवरांसहित गोपुरी आश्रम परिवारातील सदस्य तसेच कणकवलीतील नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आभार सदाशिव राणे यांनी मानले.