डॉ. अनिल नेरूरकर प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे आयोजित जिल्हास्तरीय किल्ले स्पर्धा संपन्न

आधुनिक जीवनाशी किल्ल्यांची सांगड घालून जीवन समृद्ध बनवा! -गटविकास अधिकारी जयप्रकाश परब

तळेरे (प्रतिनिधी)- “फटाके वाजवून प्रदुषण करण्यापेक्षा बाजारात रस्त्याच्या बाजूला दुकान मांडून बसलेल्या आपल्या माणसांकडून पणती विकत घ्या. त्यामुळे त्यांचीही दिवाळी गोड होऊ द्या, पणती बनवणार्‍यांच्याही घरात पणती लागू द्या.” असे सांगतानाच इतिहास हा गड किल्ल्यांवरुन समजतो, त्यामुळे आधुनिक जीवनाशी किल्ल्यांची सांगड घालून जीवन समृध्द बनवा; अशी भावनिक साद वैभववाडीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी विद्यार्थ्यांना दिली.

डॉ. अनिल नेरूरकर प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे आयोजित किल्ले बांधणी स्पर्धा २०२० तसेच मेधांश व श्रावणी कंप्युटर आणि अक्षरोत्सव परिवार आयोजित जिल्हास्तरीय हस्ताक्षर या दोन्ही स्पर्धेचा संयुक्तिक बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी परब बोलत होते.

तळेरे येथील तंबाखु प्रतिबंध अभियानच्यावतीने आयोजित आकाश कंदिल आणि पणत्या प्रदर्शनात मान्यवरांना माहिती देताना अभियानच्या प्रमुख सौ. श्रावणी मदभावे

या कार्यक्रमास ग्राहक संरक्षण चळवळीचे सदस्य प्रा. एस. एन. पाटील, कासार्डे विकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे नुतन अध्यक्ष विनय पावसकर, अध्यक्ष अशोक मुद्राळे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया पाताडे, विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालयाचे प्रा. हेमंत महाडिक, कवी व अभिनेते प्रमोद कोयंडे, मोटीवेशनल स्पिकर सदाशिव पांचाळ, वारगाव हायस्कुलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, वामनराव महाडिक विद्यालय तळेरेचे मुख्याध्यापक एस्. जी. नलगे, जेष्ठ शिक्षक विजयानंद गायकवाड, जिल्हा परिषद केंद्रशाळा गवाणे मुख्याध्यापक अरुण पवार, जितेंद्र पेडणेकर, शासकिय रुग्णालय प्राध्यापिका सौ. अनिता मदभावे, मुख्याध्यापिका सौ. रंजना नारकर, तंबाखू प्रतिबंध अभियान कुडाळचे सदानंद गावडे, परशुराम परब, पत्रकार गुरुप्रसाद सावंत, संजय भोसले, उदय दुदवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त हस्ताक्षर संग्राहक निकेत पावसकर यांचे अक्षरोत्सव परिवार आणि मेधांश व श्रावणी कंप्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्वराज्याचे पुन्हा सुराज्य व्हावे; मोबाईल फोनच्या व्यस्त युगात इतिहासाशी, मातीशी नाते जुळावे आणि आपल्या सिंधुदुर्गात उद्योजकता निर्माण होत प्रत्येक रिकाम्या हाताला काम मिळावे; अशी श्रावणी मदभावे यांच्या विविधांगी संकल्पनेने कलेला वाव देणाऱ्या किल्ले बांधणी स्पर्धेचे आठवे वर्ष होते. या स्पर्धेचे बक्षिस वितरण यावेळी करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमात किल्ले बांधणी स्पर्धेमधील उद्योजकता विषयाला अनुसरून छोट्या छोट्या स्पर्धकांनी बनवलेल्या लघुउद्योगाचा नमुना प्रकल्पांचे देखील प्रदर्शन ठेवण्यात आले. तसेच दिवाळीनिमित्त पणती आणि आकाशकंदील प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रावणी मदभावे यांनी, प्रणाली मांजरेकर यांनी सुत्रसंचालन तर रीना दुदवडकर यांनी आभार मानले.