अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा अक्षरोत्सव परिवाराच्यावतीने सत्कार
तळेरे (प्रतिनिधी):- अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा तळेरे येथील अक्षरोत्सव परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. मल्लखांब या क्रिडा प्रकारातील योगदानाबद्दल तिला हा पुरस्कार मिळाला असून तिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मल्लखांब या क्रीडा प्रकारात गेली १५ वर्षे दिलेल्या योगदानाबद्दल हिमानी परब हिला अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते गौरविण्यात आले. विशेष असे की मल्लखांब या क्रिडा प्रकारात अर्जुन पुरस्कार मिळविणारी हिमानी पहिली खेळाडू ठरली आहे. तर २०१८-१९ला तिला महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तळेरे येथील अक्षरोत्सव परिवाराच्यावतीने संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हिमानीचे वडिल ऊत्तम परब, आई, चित्रकार अक्षय मेस्त्री उपस्थित होते.
यावेळी बोलताना हिमानी म्हणाली की, आपण आपल्या कामात सातत्य राखले पाहिजे. आणि ध्येय्य डोळ्यासमोर असेल तर आपल्याला यशापासून कोणीही दुरावू शकत नाही. यावेळी निकेत पावसकर यांच्या संदेश पत्र संग्रहासाठी हिमानी परब हिने भारतीय पोस्टकार्डवर संदेश दिला.