घरबसल्या माहितीचा अधिकार वापरा! महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम!
सिंधुदुर्ग (हेमलता हडकर):- महाराष्ट्र शासनाने ई-गव्हर्नंन्सला नेहमीच महत्व दिले आहे. इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे माहिती मिळविण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती व नागरिकांकडून आलेले अर्ज स्वीकारण्यासाठी व संबंधित माहिती देण्यासाठी शासनाने www.rtionline.maharashtra.gov.in या नावाचे पोर्टल चार वर्षांपूर्वी सुरु केले आहे. त्यामुळे घरबसल्या माहितीचा अधिकार वापरता येतो. महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना उपयुक्त ठरला आहे. माहितीचा अधिकार वापरून आवश्यक ती माहिती मिळविण्यासाठी प्रत्येक कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज पडत नाही.
भारतीय नागरिक माहितीच्या अधिकारांतर्गत ऑनलाईन माहिती अधिकाराचा अर्ज तसेच प्रथम अपील अर्ज दाखल करण्यासाठी या पोर्टलचा वापर करू शकतील. तसेच यासाठी लागणारे विहित शुल्क या पोर्टलच्या साहाय्याने भरता येईल. सद्यस्थितीत माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत माहिती मिळवू इच्छिणारे नागरिक या पोर्टलच्या साहाय्याने महाराष्ट्र शासनाच्या खालील विभागांकडे माहिती अधिकाराचा अर्ज दाखल करू शकतात. सद्यस्थितीत ऑनलाईन माहिती अधिकाराचा अर्ज दाखल करण्याची सुविधा केवळ मंत्रालयीन विभागांकरीता उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंत्रालयाबाहेरील विभागांचा समावेश पुढील टप्प्यात करण्यात येईल.
ऑनलाईन माहिती अधिकार पोर्टलद्वारे भरण्यात आलेला अर्ज संबंधित विभागांच्या जन माहिती अधिकाऱ्याकडे न जाता संबंधित विभागाच्या नोडल अधिकाऱ्याकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पोहोचेल. सदर नोडल अधिकारी हा आरटीआय अर्ज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जन माहिती अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करेल. माहिती पुरविण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरणा आवश्यक असल्यास जन माहिती अधिकारी या पोर्टलद्वारे अर्जदाराला तसे सूचित करेल. अर्जदार ऑनलाईन माहितीचा अधिकार पोर्टलच्या “सद्यस्थिती पाहा” या पर्यायावर क्लिक करून हे पाहू शकेल तसेच त्याला/तिला ई-मेल द्वारे सूचित केले जाईल.
अधिक माहितीसाठी…
https://rtionline.maharashtra.gov.in/RTI%20Website%20FAQ%20Marathi.pdf