संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय येथे जेष्ठ नागरिक दिन साजरा

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.):- वृध्दत्व ही समस्या नाही तर एक अवस्था आहे. वृध्दत्वामध्ये आपल्या एकटे वाटू शकते. वृद्धत्वाच्या अवस्थेत ज्येष्ठांनी छंद जोपासून जीवनाचा मनमुराद आनंद लुटावा, असे प्रतिपादन कणकवली येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रद्धा कदम यांनी केले.

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अणाव येथील संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय येथे जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत जेष्ठ नागरिकाची आरोग्य शिबिर, कायदेविषयक मार्गदर्शन, गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी आनंदाश्रयाचे अध्यक्ष बबन परब, सविता परब, अॅङ मीनाक्षी नाईक, आरोग्य सेविका एस. बी. शिंगाडे, आरोग्यसेवक एम. एस. मुसळे, समुदाय आरोग्य अधिकारी रेश्मा जंगले, समाजकल्याण विभागाच्या कार्यालयीन अधिक्षक चित्रांगी तोरस्कर, सुनील बागुल, संतोष परूळेकर, रविंद्र जाधव, आनंद कर्पे, सृष्टी रेवाळे, आरती सावंत, नैतिक बाघाटे, विकी सावंत, संग्राम कासले, विजय कदम, सुजीत जाधव, सुहास मोचेमाडकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रद्धा कदम म्हणाल्या, वृद्धत्वामध्ये एकटेपणामुळे ताणतणाव येतो. ताणतणाव दूर करण्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विविध छंद जोपासणे गरजेचे आहे. दिवसभरात सहकाऱ्यांसोबत एखादे गीत गुणगुणावे जेणेकरून ताणतणाव कमी होईल. छंद जोपासून उर्वरित आयुष्य आनंदामय वातावरणात जगू शकतो. याप्रसंगी श्रद्धा कदम यांनी विविध गीते सादर केली. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनीही गीत सादरीकरणामध्ये सहभाग घेतला. यावेळी अॅङ मीनाक्षी नाईक यांनी विधी सेवा प्राधिकरणामर्फत वृद्धांसाठी असणाऱ्या मोफत विधी सेवेबाबत माहिती दिली. त्याचबरोबर वृद्धांसाठी असणारे विविध कायद्यांची माहिती दिली. यावेळी विजय कदम, संग्राम कासले यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आनदाश्रयातील रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आनंदाश्रयचे बबन परब व सविता परब यांचा सत्कार करण्यात आला. श्री.परब म्हणाले, आनंदाश्रमध्ये येणाऱ्या वृद्धांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्यांना औषधउपचारासोबत मानसिक आधाराची देखील गरज असते. हा मानसिक आधार देण्याचा आपला प्रयत्न असतो. ज्येष्ठ नागरिक दिनासारख्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व आनंदाश्रय येथे आलात. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्येष्ठांना एक प्रकारचा मानसिक आधार मिळाला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सिंधदुर्ग जिल्ह्याचे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन आनंद कर्पे यांनी केले.