अक्षरोत्सव- पत्रकार निकेत पावसकर यांचा २० वर्षांचा ध्यास

एकाच छताखाली अनुभवा मराठी भाषेचे वैभव आणि अक्षरांचा नयनरम्य उत्सव!

पत्रांतून जपलेला जागतिक साहित्याचा आणि स्नेहाचा अनमोल ठेवा!

पत्रांच्या माध्यमातून जोडलेले जागतिक नाते!

२० वर्षांचा अविरत वारसा, अक्षरांच्या पाऊलखुणा जपणारा ‘अक्षरोत्सव’!

“मान्यवरांची शाबासकी आणि मुलांचे कुतूहल… हाच ‘अक्षरोत्सव’चा खरा ठेवा! अक्षरांच्या या अद्भुत जगाला २० वर्षे पूर्ण होत आहेत, हा मराठी भाषेचाच सन्मान आहे!”

डिजिटल क्रांतीच्या ओघात आजची पिढी कीबोर्ड आणि टचस्क्रीनच्या आहारी जात असताना, हाताने लिहिलेली सुंदर अक्षरे आणि साहित्याचा वारसा जपणे हे मोठे आव्हान बनले आहे. हेच आव्हान पेलले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार निकेत पावसकर यांनी. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी ‘अक्षरोत्सव’ या उपक्रमाच्या माध्यमातून अक्षरांची संस्कृती घराघरांत आणि मनामनांत पोहोचविण्याचे प्रयत्न करत आहेत.

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण भाषेचा अभिमान बाळगत असतानाच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे सारख्या ग्रामीण भागातून उभी राहिलेली एक विलक्षण चळवळ आज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ती चळवळ म्हणजे ‘अक्षरोत्सव’. तंत्रज्ञानाच्या युगात जिथे पत्रसंस्कृती लोप पावत आहे, तिथे केवळ एका पत्राच्या माध्यमातून जगभरातील दिग्गजांशी ‘पत्रमैत्री’ जुळवण्याचा चमत्कार या संग्रहाने करून दाखवला आहे. डिजिटल स्क्रीनच्या जमान्यात जेव्हा मुले लेखणीपासून दूर जात आहेत, अशा काळात ‘अक्षरोत्सव’ने अक्षरांच्या माध्यमातून संस्कृतीची गुंफण घातली आहे.

मराठी भाषेचा अभिमान आणि साहित्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हे केवळ कर्तव्य नसून ती काळाची गरज आहे. याच ध्येयाने झपाटलेली ‘अक्षरोत्सव’ ही चळवळ गेल्या २० वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अक्षरांचे बीज पेरत आहे. केवळ एक संग्रह म्हणून मर्यादित न राहता, या उपक्रमाने मुलांच्या मनात साहित्याची ओढ निर्माण करण्याचे मोठे काम सुरु केले आहे.

अफाट व्याप्ती : २००० दिग्गजांची साथ
या संग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांच्या पात्रापासून सुरु झालेल्या या संग्रहात देश-परदेशातील तब्बल २००० दिग्गज व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेशांचा समावेश आहे. केवळ स्वाक्षरी नाही, तर त्या व्यक्तींच्या भावना व्यक्त करणारी संदेश पत्रे हे या संग्रहाचे वैभव आहे. यामध्ये नोबेल विजेते, भारतरत्न, पद्म पुरस्कार सन्मानित व्यक्तींपासून ते ज्ञानपीठकार आणि साहित्य अकादमी विजेत्यांपर्यंतच्या मान्यवरांच्या अक्षरांचा ओलावा जपलेला आहे.

भाषा आणि लिपींचा संगम
मराठी भाषेचा अभिमान बाळगतानाच या संग्रहाने जागतिक दृष्टिकोन जपला आहे. यात प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पत्रे असली, तरी संस्कृत, कोकणी, मोडी, ब्राम्ही, चायनीज आणि अंधांसाठीची ब्रेल लिपी अशा विविध लिपींमधील संदेशांचा खजिना येथे पहायला मिळतो. हा संग्रह म्हणजे खऱ्या अर्थाने ‘अक्षर वाङ्मयाचा’ उत्सवच आहे.

संस्कृती आणि साहित्याचा संगम
अक्षरोत्सव म्हणजे केवळ कागदावरची अक्षरे नव्हेत, तर ती आपल्या लोककला, संस्कृती आणि समृद्ध साहित्याचा आरसा आहे. गेल्या दोन दशकांत या संग्रहाने राज्याच्या विविध भागांत प्रदर्शने भरवून मराठी भाषेचे वैभव जनसामान्यांपर्यंत, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहे.हा प्रवास पुढेही निरंतर सुरु राहणार आहे.

वैविध्यपूर्ण क्षेत्रांचा समावेश
या चळवळीने कोणत्याही एका क्षेत्रापुरते स्वतःला मर्यादित ठेवलेले नाही. यात साहित्य व कला (साहित्यिक, चित्रपट कलाकार, नाट्यकर्मी, चित्रकार), विज्ञान व प्रशासन (शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी), समाजकारण व राजकारण (स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, समाजसेवक), क्रीडा व इतर (खेळाडू, जागतिक विक्रमवीर, सुलेखन आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

प्रदर्शने : एक फिरते विद्यापीठ
अक्षरोत्सव संग्रहाची प्रदर्शने म्हणजे ज्ञानाचा खजिनाच असतो. राज्याच्या विविध जिल्ह्यांत, शाळा-महाविद्यालयांत भरलेली ही प्रदर्शने पाहून अनेक मान्यवरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ही प्रदर्शने केवळ पाहण्यासाठी नसून, त्यातून विद्यार्थ्यांना आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे, याची जाणीव करून दिली जाते.महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात अशी २५ प्रदर्शने भरविण्यात आलेली आहेत.

तळेरे ते जागतिक क्षितिज : एक जिद्दीचा प्रवास
एका बाजूला ५ हजारहून अधिक व्यक्तींना १० हजार वेळा पत्रे पाठवण्याचा संयम आणि दुसरीकडे त्यातून निर्माण झालेली ‘पत्रमैत्री’. ग्रामीण भागात राहूनही केवळ पत्रांच्या जोरावर जगभरातील नामवंतांशी संवाद साधता येतो, हे या चळवळीने सिद्ध केलेले आहे. या कार्याची दखल सह्याद्री वाहिनीने थेट प्रक्षेपण असलेल्या ‘नमस्कार मंडळी’ आणि ‘Beyond Thought’ या कार्यक्रमातून तसेच आकाशवाणीवर मुलाखतींमधून या प्रतिष्ठित माध्यमांनी वेळोवेळी घेतलेली आहे.

केवळ प्रदर्शन नाही, तर संस्कार!
‘अक्षरोत्सव’ हे केवळ प्रदर्शनापुरते मर्यादित राहिलेले नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध शाळांमध्ये प्रदर्शने भरवून त्यातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो. “छंद का जोपासावा आणि त्याचे आयुष्यातील महत्त्व” यावर मार्गदर्शन करून नवी पिढी घडवण्याचे कार्य या माध्यमातून सुरू आहे. ‘अक्षरोत्सव’च्या राज्यव्यापी प्रदर्शनांतून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी अनमोल विचार, साहित्य आणि अक्षरांचे सौंदर्य अनुभवले आहे. दुर्मिळ हस्तलिखिते, सुलेखनाची किमया आणि आपल्या मातीतील लोककलांचा हा खजिना पाहून अनेक मान्यवरांनीही थक्क होऊन या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

पत्रातील अक्षरे ही केवळ शाई नसते, तर ती त्या व्यक्तीच्या विचारांचे प्रतिबिंब असते. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने, ‘अक्षरोत्सव’ ही चळवळ आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुळाकडे, म्हणजेच ‘संवाद’ आणि ‘अक्षरांकडे’ घेऊन जाते. या अनोख्या छंदाला आणि त्यातून उभ्या राहिलेल्या या ज्ञानयज्ञाला सलाम!

निकेत पावसकर यांनी अत्यंत मेहनतीने ‘अक्षरोत्सव’ नावाचा आगळावेगळा संग्रह जमवला आहे. हा संग्रह केवळ स्वक्षर्यांचा नसून तर या संग्रहात हस्ताक्षरातील विचारांचे समृध्द दालन (दिग्गज साहित्यिक,कवी आणि विचारवंतांच्या हस्ताक्षरांचे दुर्मिळ नमुने, विचार), सुलेखन (Calligraphy)(अक्षरांना कलेचे रूप देणारे विविध सुलेखन प्रकार), सांस्कृतिक ठेवा (महाराष्ट्रातील लोककला, सण-उत्सव आणि ऐतिहासिक संदर्भांची माहिती देणारी साधने), दुर्मिळ हस्ताक्षरे आणि विचार (ज्यांच्या साहित्याने मराठी भाषा समृद्ध झाली, अशा अनेक मान्यवरांचा वैचारिक खजिना) अनुभवण्यास मिळतो.

“अक्षरोत्सव हा केवळ उपक्रम नसून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सुरू असलेला एक यज्ञ आहे. मुलांच्या हाताला अक्षराची गोडी लागणे, हेच भाषेचे खरे यश आहे.” असे गौरोदगार अनेक मान्यवरांनी काढलेले आहेत. तर गेली ४ वर्षे शालेय मुलांना लेखनाची आवड निर्माण व्हावी, त्यातूनच सामाजिकता जोपासली जावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली जाते. यात्साठी सामाजिक विषयावरील मजकूर विद्यार्थ्यांना लेखनासाठी देऊन दुहेरी हेतू साधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अक्षरघराला यांनी दिली भेट
तळेरे येथील अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, फुटबॉल खेळाडू जयेश राणे, प्रसिध्द नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, दिग्दर्शक दिपक कदम, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कान्बळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, कवी प्रा. प्रदिप पाटिल, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, लेखक रविप्रकाश कुलकर्णी, समीक्षक प्रसाद घाणेकर, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, इस्लामपुरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, चित्रकार राज शिंगे, सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे, पर्यावरण अभ्यासक- लेखक धीरज वाटेकर, घुंगुरकाठीचे संस्थापक सतिश आणि सौ. सई लळीत, माजी राज्यपालांचे सहसचिव प्रा. विनायक दळवी, हास्यसम्राट फेम अभिजित कोष्टी, उपविभागीय तथा प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे.

या परदेशी व्यक्तींची पत्रे संग्रहात
निकेतच्या या संग्रहामध्ये जागतिक किर्तिचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंड देशाचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कँरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिगेट बार्दोत (पॅरीस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमीयर मार्क मँकगोवन, सुप्रसिध्द टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) यासह अनेक परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे.

या मान्यवरांनी केले कौतुक
यापूर्वी बेळगाव, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, चिपळूणसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळा, वाचनालये आणि इतर कार्यक्रमानिमित्त मिळून 25 प्रदर्शने झाली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. यावेळी विविध मान्यवरांनी या संग्रहाचे कौतुक केले असून विविध ठिकाणी नामवंत व्यक्तींनी प्रदर्शनाला भेटही दिलेली आहे. सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश कब्रे, अभिनेते माधव अभ्यंकर, पद्मश्री परशुराम गंगावणे, प्रसिध्द कवी महेश केळुसकर, गायक नंदेश उमप, मल्लखांब खेळाडू हिमानी परब, फुटबॉल खेळाडू जयेश राणे, किट्टू म्याकल, कबड्डी खेळाडू – प्रशिक्षक मेघाली आणि सचिन म्हसकर, अभिनेते शेखर फडके, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, ढोलकी वादक विजय चव्हाण, आमदार बाळा नर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, बाल मुकुंद पत्की, पालकमंत्री तथा मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे रवींद्र मालुसरे, ज्येष्ठ लोककला अभ्यासक – नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, चित्रकार किशोर नादावडेकर, लेखक जोसेफ तुस्कानो, ज्येष्ठ शाहीर मधू खामकर, लेखक – अभिनेते निनाद शेट्ये, नाट्य समीक्षक अरुण घाडीगावकर, हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी, कवी सतीश मोघे, कोकणी महोत्सवाचे संयोजक संजय धुरत, सुलेखनकार श्रीकांत गवंडे, अभिनेते शशिकांत खानविलकर, संपादक प्रमोद कोनकर, संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर, प्रसिद्ध सतार वादक विदुर महाजन, लेखिका डॉ. अपर्णा महाजन, आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, कवी अजय कांडर आदी मान्यवरांनी या संग्रहाची पाहणी करून कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना संदेश पत्र संग्राहक म्हणाले की, हा संग्रह केवळ पाहण्याचा नाही, ऐकण्याचा नाही. तर तो प्रत्यक्ष वाचून अनुभवण्याचा संग्रह आहे. यातून शालेय मुलांच्या मनात जिद्द निर्माण करणारी ऊर्जा मिळते. हे ‘अक्षरांचे मोती’ आपल्या पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक आणि गुरूची भूमिका बजावत आहेत. मुलांनी या विचारांतून बोध घ्यावा आणि आपल्या यशस्वी आयुष्यासाठी नवी वाट चोखाळावी, हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे. अशा महान व्यक्तींचे विचार मुलांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. ही अक्षरे त्यांना केवळ परीक्षेसाठी नाही, तर आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी बळ देतील, असा विश्वास वाटतो.

मराठी भाषा गौरव दिनी एक संकल्प
आज जेव्हा आपण कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करत आहोत, तेव्हा ‘अक्षरोत्सव’ सारख्या चळवळींचे महत्त्व अधोरेखित होते. भाषेचा केवळ उदोउदो करण्यापेक्षा, तिला कृतीतून जपण्याचे काम हा संग्रह करत आहे. २० वर्षांचा हा अविरत प्रवास मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देतो.’अक्षरोत्सव’ हा उपक्रम महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ आहे. या चळवळीने जोपासलेला हा अक्षरांचा वारसा येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.अक्षरांचा हा उत्सव असाच अखंड सुरू राहो आणि यातून साहित्याची नवी पिढी घडत राहो.

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषेचा गौरव करतो. खरा गौरव हा केवळ घोषणांत नसून तो भाषेच्या संवर्धनात असतो. ‘अक्षरोत्सव’ ही चळवळ मराठी भाषेची मुळे घट्ट करण्याचे काम करत आहे. नवी पिढी जेव्हा मराठी साहित्याकडे आनंदाने वळते, तेव्हाच खऱ्या अर्थाने मराठी भाषा ‘अभिजात’ ठरते. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना, निकेत पावसकर यांच्यासारखे व्यक्तिमत्व प्रत्यक्षात भाषेसाठी काम करत असते. ‘अक्षरोत्सव’ ही चळवळ मराठी भाषेचा डोलारा नव्या पिढीच्या खांद्यावर समर्थपणे पेलण्यासाठी सज्ज करत आहे.

याबाबत संपर्कासाठी :
श्री निकेत नरहरी पावसकर,
प्रमुख अक्षरोत्सव परिवार, तळेरे
मु. पो. तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग. ४१६८०१
संपर्क क्रमांक : ९८६०९२७१९९ / ९४०३१२०१५६

error: Content is protected !!