ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना ‘कोकणरत्न सन्मान २०२६’ जाहीर
सिंधुदुर्ग- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना प्रतिष्ठेचा ‘कोकणरत्न सन्मान २०२६’ जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजाची लोककला जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या विश्राम ठाकर आदिवासी कला अंगण चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी यांच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते.
संतोष नाईक यांनी मानवाधिकार, सामाजिक न्याय, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या प्रामाणिक, निस्वार्थ आणि समर्पित कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता पिंगुळी, ता. कुडाळ येथील ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी समन्वयक प्रणय बंदिवडेकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, सहसचिव सुधीर पराडकर, सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी आणि सभासद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संतोष नाईक यांना जाहीर झालेल्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.











