तिमिरातून तेजाकडे… आता विधान परिषदेतही तेजस्वी विचारांची गरज!

लोकशाही केवळ निवडणुका जिंकण्यात मर्यादित नसते; ती समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासन व्यवस्थेत स्थान देण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून अधिक सक्षम बनते. भारतीय राज्यघटनेनेही याच विचारातून राज्यपालांना विधान परिषदेवर काही सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार दिला आहे. साहित्य, विज्ञान, कला, सहकार आणि समाजसेवा अशा क्षेत्रांत विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना या माध्यमातून विधिमंडळात प्रवेश मिळतो.

अशा पार्श्वभूमीवर कोकणातील युवा विचारवंत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते आणि शैक्षणिक चळवळीशी जोडलेले सत्यवान यशवंत रेडकर यांचे नाव पुढे येणे ही केवळ एका व्यक्तीची मागणी नसून कोकणातील सुजाण नागरिकांच्या अपेक्षांचे प्रतीक मानावे लागेल.

आज ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शिक्षण, रोजगार, प्रशासनातील पारदर्शकता आणि तरुणांचे मार्गदर्शन हे गंभीर प्रश्न बनले आहेत. कोकणासारख्या बुद्धिमान, परिश्रमी पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या प्रदेशात अशा व्यक्तींची आवश्यकता अधिक आहे, ज्या शासन आणि सामान्य जनता यांच्यातील दरी कमी करू शकतील. सत्यवान रेडकर यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना दिशा दिली, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक कार्य उभे केले असल्याचे दिसते.

महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, विधान परिषद ही केवळ राजकीय पुनर्वसनाची जागा बनावी का? अनेकदा निवडणुकीत पराभूत झालेल्या किंवा पक्षनिष्ठा जपणाऱ्या नेत्यांना अशा पदांवर संधी दिली जाते, अशी जनतेची भावना आहे. जर राज्यघटनेने दिलेल्या या जागांचा उद्देश तज्ञ तज्ञ, विचारवंत आणि समाजाभिमुख व्यक्तींना संधी देणे हा असेल, तर त्या उद्देशाचा प्रामाणिकपणे सन्मान व्हायला हवा.

कोकण हा केवळ नैसर्गिक सौंदर्याचा प्रदेश नाही; तो प्रतिभेची भूमी आहे. येथे अनेक विद्वान, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासू तरुण आहेत. त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळणे म्हणजे संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला नवी दिशा मिळणे होय.

सत्यवान रेडकर यांची नियुक्ती व्हावी किंवा न व्हावी, हा अंतिम निर्णय राज्यपाल आणि शासनाचा आहे. मात्र या निमित्ताने एक व्यापक चर्चा सुरू झाली पाहिजे! विधान परिषदेत खऱ्या अर्थाने गुणवंत, अनुभवी आणि समाजहित जपणाऱ्या व्यक्तींनाच स्थान मिळते का? लोकशाही मजबूत करण्यासाठी केवळ राजकीय समीकरणे पुरेशी नसतात; त्यासाठी विचारांची श्रीमंती, सामाजिक बांधिलकी आणि जनतेशी नाळ जोडलेली माणसे आवश्यक असतात.

तिमिरातून तेजाकडे जाण्याचा खरा मार्ग म्हणजे अशाच तेजस्वी व्यक्तींना निर्णय प्रक्रियेत स्थान देणे होय! सामाजिक सभानता जपणारे विद्वान, उच्चशिक्षित सत्यवान रेडकर यांना विधानपरिषदेवर नियुक्त करून महाराष्ट्र देशासमोर आदर्श ठेऊ शकतो!

-मोहन सावंत

error: Content is protected !!