संपादकीय- `स्टार वृत्त चॅरिटेबल ट्रस्ट’- नव्या अध्यायाचा शुभारंभ!
आज गुढीपाडवा! नूतन वर्षाचा शुभारंभ! आजच्या पवित्र दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो हीच प्रार्थना; ही आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या चरणी प्रार्थना!
आजच्या मंगलदिनी आम्ही विशेष संपादकीय लेखाच्या माध्यमातून आपल्याशी सुसंवाद साधणार आहोत!
अन्यायाविरुद्ध चीड, चुकीला चूक म्हणण्याचे धाडस आणि माणुसकी जपली जावी म्हणून मनापासून असलेली तळमळ मला कळतपणे पत्रकारितेकडे घेऊन गेली. १९९४ पासून वार्ताहर ते कार्यकारी संपादक म्हणून अनेक वर्तमानपत्रात काम केल्यानंतर २००१ साली स्वतःच्या मालकीचे पाक्षिक `स्टार वृत्त’ हे वृत्तपत्र सुरु केले. पाक्षिक `स्टार वृत्त’चा पहिलाच अंक श्रीभगवद्गीतेवरील विशेषांक म्हणून प्रकाशित झाला व पाक्षिकाची वैचारिक दिशा स्पष्ट झाली.
गेल्या सलग २५ वर्षांमध्ये परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या वैज्ञानिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि विश्वकल्याणकारी प्रवचनांचे शब्दांकन पाक्षिक `स्टार वृत्त’ने सातत्याने वाचकांपर्यंत पोहोचविले. त्याचबरोबर विविध आध्यात्मिक लेख, सामाजिक प्रश्नांवरील विचारमंथन आणि समकालीन राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे लेख यामुळे पाक्षिक `स्टार वृत्त’ एक विचारमंच बनले.
हा प्रवास सोपा नव्हता. अनेक आव्हाने, बदलती माध्यमव्यवस्था आणि आर्थिक-सामाजिक अडचणी यांचा सामना करत `स्टार वृत्त’ ने आपले अस्तित्व टिकवले. या वाटचालीत श्रद्धावान वाचकांचे प्रेम आणि विश्वास हीच आमची खरी शक्ती ठरली. माझ्या कुटुंबियांनी आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींनी पाक्षिक `स्टार वृत्त’ सुरु ठेवण्यासाठी जो `त्याग’ केला तो कधीच विसरता येणार नाही. त्यागावर उभ्या असलेल्या गोष्टी कधीच काळाच्या ओघात नष्ट होत नसतात; तर त्या अधिकाधिक तेजाने तळपत राहतात. त्यामुळेच आज `स्टार वृत्त’ हे नाव असंख्य वाचकांच्या मनात आदराने कोरले गेले आहे.
कोरोना महामारीनंतर काळाच्या गरजेनुसार `स्टार वृत्त’ ने डिजिटल माध्यम स्वीकारत ऑनलाइन स्वरूपात प्रवेश केला. विचारांचा प्रवाह थांबू नये, हीच या परिवर्तनामागची प्रेरणा होती आणि यापुढेही ही वाटचाल अखंड सुरू राहणार आहे. पाक्षिक `स्टार वृत्त’चा प्रवास हा केवळ एका वर्तमानपत्राचा इतिहास नसून तो श्रद्धा, विचार आणि समाजभान यांचा अखंड प्रवाह आहे. ह्या वैचारिक कार्याबरोबरच प्रत्यक्ष समाजसेवा घडवून आणण्याचा संकल्प आता आम्ही करत आहोत. समाजहिताच्या लिखाणासोबत समाजकार्याची कृतीशील जोड मिळावी; ह्या उद्देशाने `स्टार वृत्त चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली आहे.
`स्टार वृत्त चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, आध्यात्मिक व मूल्याधिष्ठित समाजनिर्मिती अशा विविध क्षेत्रांत प्रत्यक्ष कार्य सुरू करण्याचा मानस आहे. हे कार्य कोणत्याही व्यक्ती किंवा गटापुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला जोडून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल! `स्टार वृत्त’ चा हा नवा अध्याय समाजहितासाठी समर्पित राहील, याची आम्ही आमच्या मित्रांना- वाचकांना खात्री देतो. सकारात्मतेची परंपरा पुढे नेत, सेवा आणि सजगतेचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत!
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’
संस्थापक सचिव- `स्टार वृत्त चॅरिटेबल ट्रस्ट’











