१९३६ पासूनची परंपरा- १८ ऑक्टोबरला भवानी माता क्रीडांगणावर क्रीडारसिकांची मांदियाळी!

दादरच्या ऐतिहासिक शिवनेरी कबड्डी महोत्सवाचा आज दिमाखदार अंतिम सामना

१९३६ पासूनची परंपरा- १८ ऑक्टोबरला भवानी माता क्रीडांगणावर क्रीडारसिकांची मांदियाळी!

मुंबई (मोहन सावंत):-कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील क्रीडाप्रेमींना एकत्र आणणारा खेळ आहे. त्यामुळे ९० वर्षांच्या परंपरेचा वारसा जपणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऐतिहासिक परंपरा, कबड्डीचा थरार आणि क्रीडारसिकांचा उत्साह यामुळे शिवनेरी कबड्डी महोत्सवाचा आजचा अंतिम सामना अविस्मरणीय ठरणार आहे. दादरच्या भवानी माता क्रीडांगणावर १९३६ पासून सुरू असलेली कबड्डी स्पर्धेची ऐतिहासिक परंपरा आजही मोठ्या दिमाखात सुरू आहे. विकास क्रीडा मंडळ आणि शिवनेरी सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या कबड्डी महोत्सवाने महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

श्री भगवान पालव बंधूंनी लावलेल्या कबड्डीच्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. सन १९६८ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गेली ५८ वर्षे ही स्पर्धा अविरतपणे सुरू असून, कबड्डीप्रेमींसाठी ती एक महत्त्वाचा क्रीडा सोहळा ठरली आहे.

घटस्थापनेच्या दिवशी सुरू होऊन दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संपन्न होणाऱ्या या स्पर्धेला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील कबड्डी हंगामाचा नारळ ज्या स्पर्धेतून फुटतो, अशी या स्पर्धेची क्रीडा क्षेत्रात ओळख आहे.

आज अंतिम सामन्याचा थरार…

या ऐतिहासिक कबड्डी महोत्सवाचा अंतिम सामना रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता दादर येथील भवानी माता क्रीडांगणावर रंगणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी भवानी मातेचे दर्शन घेऊन या क्रीडा महोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!