संपादकीय- रावण मरणार निश्चित!
विजयादशमीचा संदेश:- अधर्म कितीही बलाढ्य असला तरी अंतिम विजय धर्माचाच!
हरि ॐ! श्रीराम!! अंबज्ञ!!!
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
ह्या ब्रह्मांडातील एक गोष्ट निश्चित आहे, रावण मरतोच! अंतिम लढाईमध्ये रावण कधीच जिंकत नाही. रावण असो, कंस असो किंवा सर्व राक्षसांपेक्षा बलाढ्य मानला गेलेला महिषासुर असो; त्यांच्या अंताची नियती ठरलेलीच असते. कारण त्यांच्या आचरणात अधर्म, क्रौर्य, अहंकार, अन्याय आणि विघातक प्रवृत्तीचा अतिरेक झालेला असतो. आज आपण विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. परंतु या सणामागील आध्यात्मिक संदेश आपण खरोखर समजून घेतो का?
विजयादशमी म्हणजे केवळ रावणाच्या पुतळ्याचे दहन नव्हे. आपल्या समाजात, संस्थांमध्ये आणि स्वतःच्या मनात निर्माण झालेल्या ‘रावणी प्रवृत्ती’चे दहन करण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. श्रीप्रभूरामचंद्रांनी लंकेच्या रावणाचा वध केला. पण तो रावण नेमका कोण होता?
रावण म्हणजे अहंकार!
रावण म्हणजे सत्तेचा आणि संपत्तीचा माज!
रावण म्हणजे सत्य, सदाचार आणि प्रामाणिकपणाचा छळ!
रावण म्हणजे दुसऱ्याच्या सुखाचा, आनंदाचा आणि भक्तीचा अपहरण करणारी प्रवृत्ती!
रावण म्हणजे आपल्या जन्मदात्याशीही क्रूरपणे वागण्याची वृत्ती!
रावण म्हणजे देवाशीही कपट करण्याचे धाडस!
रावण म्हणजे दुसऱ्याची संपत्ती लुबाडण्याची लालसा!
रावण म्हणजे ज्या संस्था-यंत्रणेने आपल्याला घडवले, तिलाच कपटकारस्थानाने ताब्यात घेण्याची मानसिकता!
रावण म्हणजे ज्या संस्थेत पद, प्रतिष्ठा आणि अधिकार उपभोगले, त्याच संस्थेच्या विरोधात काम करण्याची कृतघ्न प्रवृत्ती!
अशा रावणाचे किती वर्णन करावे? हे रावणाचे संकीर्तन नाही; ही रावणी प्रवृत्ती ओळखण्याची आणि तिच्या नाशाची जाणीव करून देणारी विजयादशमीची शिकवण आहे. कारण रावण कितीही मोठा असो, त्याच्याकडे कितीही सत्ता असो, संपत्ती असो, माणसे असोत किंवा प्रभाव असो; अधर्माचा विजय कायमस्वरूपी असू शकत नाही.
धर्म उशिरा का होईना, पण उभा राहतो. सदाचार उशिरा का होईना, पण आपले सामर्थ्य दाखवतो. प्रामाणिकपणा अनेकदा एकटा पडतो; त्याची परीक्षा होते; त्याला अपमान सहन करावा लागतो. परंतु त्याचा पराभव होत नाही. कारण सत्याला वेळ लागू शकतो; परंतु सत्याचा अंत होत नाही. आजच्या युगातही अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर, पदाचा अहंकार, आर्थिक स्वार्थ, कपटकारस्थान, अन्याय, संस्थांवर कब्जा मिळविण्याची मानसिकता आणि प्रामाणिकपणे प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न दिसतो. अशा प्रत्येक ठिकाणी विजयादशमीचा संदेश अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
रावण हा केवळ लंकेत नव्हता. रावणाची प्रवृत्ती आजही जिवंत आहे. ती व्यक्तीमध्ये असू शकते, व्यवस्थेमध्ये असू शकते, संस्थेमध्ये असू शकते किंवा सत्तेच्या गर्वामध्येही असू शकते. पण त्याचबरोबर एक गोष्ट तितकीच निश्चित आहे; रावणाचा अंतही निश्चित आहे! अधर्माला पराभूत करणारी शक्ती म्हणजे धर्म. अन्यायाला रोखणारी शक्ती म्हणजे सदाचार. कपटाला पराभूत करणारे शस्त्र म्हणजे प्रामाणिकपणा. अहंकाराला नमविणारी शक्ती म्हणजे सत्य.
परमात्मा कधीही वाईट, चुकीच्या आणि अभद्र प्रवृत्तीला शाश्वत विजय देत नाही. जे अन्यायाविरुद्ध उभे राहतात, जे चुकीच्या गोष्टींना विरोध करतात, जे सत्य आणि सदाचाराची बाजू घेतात आणि जे समाजहितासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात; त्यांना परमात्म्याचे बळ निश्चितच लाभते. कदाचित हा मार्ग सोपा नसेल. कदाचित संघर्ष मोठा असेल. कदाचित सत्य बोलणाऱ्याला काही काळ एकट्याने उभे राहावे लागेल. परंतु विजयादशमी आपल्याला एकच आश्वासन देते, “अधर्म कितीही बलाढ्य असला तरी त्याचा अंत होतो; धर्माचा विजय होतो!” म्हणूनच आज रावणाचे दहन करताना केवळ एका पुतळ्याला आग लावू नका. आपल्या मनातील अहंकाराला, स्वार्थाला, कपटाला, अन्यायाला आणि कृतघ्नतेला जाळण्याचा संकल्प करूया. आणि ज्यांनी सत्य, धर्म, सदाचार व प्रामाणिकपणाची वाट निवडली आहे त्यांनी निराश होऊ नये; कारण रावण कितीही मोठा असला तरी रावण मरणार निश्चित!
जय श्रीराम!
-नरेंद्र राजाराम हडकर










