संपादकीय… सत्यासाठी प्रवाहाविरुद्ध उभे राहा!
स्वार्थासाठी स्वत्व गहाण ठेवण्यापेक्षा सत्य, स्वाभिमान आणि समाजहितासाठी प्रवाहाविरुद्ध उभे राहणे कधीही श्रेष्ठ!
स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, जीवनात कोणाशीही (चुकीच्या, दुष्ट व्यक्तींशी सुद्धा) संबंध बिघडू नयेत आणि मोठ्या कळपात राहून सुरक्षित राहता येतं ह्या कल्पनेतून व गैरसमजातून नेहमी प्रवाहाबरोबर वाहत जाण्याचा कल बहुतांशी लोकांचा असतो; आणि तसा सल्ला अनेकजण देत असतात. मलाही अनेकांनी असा सल्ला अनेकदा दिला! मात्र तो सल्ला मी स्वीकारला नाही; कारण मला स्वाभिमानाने जगायचे आहे, स्वत्व गहाण ठेवून किंवा विकून तात्पुरत्या स्वार्थासाठी जगायचे नाही.
प्रवाहाबरोबर वाहत जायचे म्हणजे काय? नदीला पूर आलाय; तुम्ही प्रवाहात उडी मारा आणि नदी ज्या दिशेला जाते त्या दिशेला जाण्याचं ध्येय ठेवा. तुमचं ध्येय अगदी सोपं होऊन जाईल; कारण प्रवाहाबरोबर तुम्ही आपोआप वाहत जाल. तुमची शक्ती वाया जाणार नाही. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अगदी सहजपणे विनासायास पोहोचाल!
समजा एका समूहामध्ये शंभर माणस आहेत. त्यातील ७०-८० माणसं आपल्या लाभासाठी किंवा आपल्या नेत्याने केलेल्या उपकारावर प्रभावित होऊन किंवा बहुमत जिकडे आहे त्यात सहभागी होऊन इतरांचा रोष पत्करू लागू नये म्हणून किंवा आपले हितसंबंध जपता यावेत म्हणून किंवा आपल्याला काय? इतरांचे होईल ते आपले होईल म्हणून किंवा कशाला वेळ वाया घालवायचा म्हणून प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या समूहात दाखल होतात. अगदी तो समूह चुकीच्या बेकायदेशीर अयोग्य मार्गाने जात असला तरी! त्याला म्हणतात प्रवाहाबरोबर जाणे, आपले ध्येय साध्य करणे! असा मतप्रवाह वर्षानुवर्षे मानवी समूहामध्ये तयार झालेला आपण पाहतो. त्यामुळे सत्तेवरती नको त्या व्यक्ती आरूढ होतात आणि पुढे अशा व्यक्ती पैशाच्या जोरावर -दहशतीच्या जोरावर सत्ता काबीज करतात. ते आपल्याकडे बहुमत आहे हे सांगून भ्रष्ट कारभार करतात. अशा समूहाच्या विरोधात संभाव्य धोके वैचारिक पातळीवर एका- दोघा व्यक्तींकडून मांडले जातात; तेव्हा त्यांना प्रखर विरोध होतो. कालांतराने तो संपूर्ण समूह धोक्यात येतो. त्या समूहातील प्रत्येकावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे दुष्परिणाम होतात, अन्याय होतो! स्वाभिमानाने जगणाऱ्या व्यक्ती अनुभवाच्या व ज्ञानाच्या आधारे हे अगोदरच समजत असल्याने ते खऱ्या अर्थाने विरोध करतात. ते प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न करतात; नव्हे पोहतात. त्यांना वेडं ठरविलं जातं! त्यांची खूप मोठी शक्ती वाया जाते. वेळ वाया जातो. ते हतबल ठरतात. मात्र त्यांचं म्हणणं काळाच्या ओघात वास्तवात उतरतं! तोपर्यंत प्रवासाबरोबर वाहणाऱ्यांच्या हातून वेळ निघून गेलेला असतो.
स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्यविरांनी जर लढा दिला नसता, आपले प्राण स्वातंत्र्याच्या यज्ञात अर्पण केले नसते; तर भारत स्वतंत्र झाला असता का? श्रीज्ञानेश्वर माऊलींपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत अगदी गाडगे महाराजांपर्यंत… अशी अनेक नावे घेता येतील; सर्वांनी प्रवाहाच्या विरोधात सत्याला झळाळी दिली. छत्रपती शिवाजी महाराज – छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा प्रवाहाच्या विरोधात जात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महात्मा ज्योतिबा फुलेपासून अगदी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत प्रबोधनात्मक वैचारिकता समाजाला बहाल केली. अशी शेकडो उदाहरणे देता येतील.
समाजासाठी – समाजातील प्रत्येक घटकासाठी जे अहितकारक आहे, गैर आहे, चुकीचे आहे, प्रगतीला अडसर आणणारे आहे; अशा प्रवाहाचा प्रभाव किती मोठा असला तरी आमच्या थोर आदर्श व्यक्तिमत्त्वांनी विरोध केला. तो विरोध वैचारिक पातळीवर होता. वैचारिक पातळीवर लढा यशस्वी होत नाही म्हटल्यावर त्यांनी आपली आक्रमकता दाखवून दिली! यामधूनच खऱ्या अर्थाने सामाजिक व्यवस्थेत क्रांतिकारक उचित बदल झालेत. जर ते प्रवाहाबरोबर गेले असते तर तेही श्रीमंतांच्या थाटात जगले असते, आपल्या पुढच्या शेकडो पिढ्यांसाठी संपत्ती जमा करून ठेवली असती. असा त्यांनी विचार केला नाही म्हणून आमच्या भारताला अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि वैज्ञानिक संस्कारक्षम वारसा लाभला! म्हणूनच भारत सामर्थ्याने उभा आहे!
आज प्रत्येकजण आपापल्या संसारात व्यस्त आहेत. कुटुंबात मुलांच्या शिक्षणावरती व वैद्यकीय खर्च, घराच्या कर्जाच्या हप्ते, महागाई आणि बदलती लाईफस्टाईल यामध्ये आर्थिक सक्षमता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहेच; परंतु अशावेळेस जीवनामध्ये दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होता होता सामाजिक जीवनात क्रियाशील राहणे अनेकजण नाकारतात, अलिप्त राहणे योग्य समजतात. `चुकीचे आहे’ हे माहित असूनही प्रवाहाबरोबर वाहत जाणे पसंत करतात. त्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती होईल; पण जे सच्चाईने व प्रामाणिकपणे गैर – भ्रष्ट व्यवस्थेला विरोध करतात त्यांना साहाय्य मिळत नाही. प्रवाहाबरोबर जाणारे निश्चितपणे स्वार्थ साधत असतात; मात्र दुसऱ्या बाजूला समाज विकासात अडचण निर्माण करीत असतात. प्रत्येक क्षेत्रात प्रवाहाबरोबर जाऊन आपली आर्थिक सक्षमता निश्चित वाढेल; पण नियती आणि इतिहास अशा लोकांना कधी माफ करणार नाही! आणि त्यांना व त्यांच्या पुढील पिढ्यांना त्याचे भोग भोगावेच लागतात; हे निश्चित!
-नरेंद्र हडकर









