असलदेवासियांनो सावधान! स्टोन क्रेशरचा राक्षस येतोय!
आमचा असलदे गाव हा निसर्गाने संपन्न! असलदे गावामध्ये रोजगाराच्या संधी कधी निर्माण झाल्या नाहीत. सुमारे २५ वर्षापूर्वी कोकण विकास महामंडळामार्फत ताडतेल प्रकल्प राबविण्यात आला. गुंठ्याला ९ रुपये वार्षिक भाडे घेऊन जमिनी दिल्या गेल्या. तेव्हा साधा हिशोब मांडला गेला नाही. मी स्वत: जोरदार विरोध केला. माझ्या वडिलांचे नाव सातबारा उताऱ्यावर नसल्याने कायदेशीर लढाई करता आली नाही. शेवटी काय झाले ते आपण पाहतोय. त्यात ठराविक लोकांचा आर्थिक फायदा झाला; पण गावाचा विकास खुंटला. कारण त्याच जमिनीवर काजूची लागवड झाली असती तर कितीतरी प्रचंड आर्थिक फायदा झाला असता; पण त्यावेळीही फालतू राजकारण केलं गेलं.
परत एकदा असलदे गावातील प्रत्येक व्यक्तीने (मग ती व्यक्ती नोकरी व्यवसायानिमित्त कुठेही दुसऱ्या ठिकाणी राहत असली तरी) सावधान स्थितीत राहिलं पाहीजे. कारण स्टोन क्रेशरचा राक्षस येतोय.
आर्थिक तडजोड (?) करून क्रेशर सुरु करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. एवढेच नव्हेतर सरपंचपदाच्या निवडणुकीत माझा पराभव होण्यामागील ते एक महत्वाचे कारण होते. माझा पराभव झाला त्याचे मला दु:ख नाही. पण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे नामवंत लोक माझ्या मागे ठामपणे उभे राहिले; ते मात्र नाराज झाले. गावाच्या सर्वांगिण विकासाची संकल्पना मी २५ वर्षे मांडतोय आणि यापुढेही मांडत राहीन. माझं ते कर्तव्यच आहे, असे मी मानतो. सुमारे २० वर्षापूर्वी गावाचा विरोध असताना नळपाणी योजना एका रात्रीत ग्रामपंचायतीने कशी ताब्यात घेतली? को. वि. म. च्या ताडतेल प्रकल्पात कामगारांनी ग्रामस्थांच्या गुरांना कसे ठार मारले? तावडेवाडीतील संतोष तावडे या युवकाचा खून कोणी केला? ह्याबद्दल मी सडेतोड लिखाण वर्तमानपत्रातून केले. मी घाबरलो नाही. आताही घाबरण्याचा प्रश्नच नाही. आता असलदे गावातील सर्व ग्रामस्थांनी एकजूठ केलीच पाहीजे. जर क्रेशररूपी राक्षसाला आम्ही रोखू शकलो नाही, तर तो राक्षस आम्हाला, आमच्या मुलाबाळांना, आमच्या आरोग्याला, आमच्या झाडांना, आमच्या शेतीला खाणार आहे. कारण ज्या गावात स्टोन क्रेशर येते त्या गावावर दीर्घकाळ कोणते दुष्परिणाम होतात त्याची चर्चा आपण करणार आहोत.. म्हणून सावधान…….
१) स्टोन क्रेशर सुरू करण्यासाठी सदर कंपनी ग्रामपंचायतीपासून- राज्यसरकारपर्यंत कार्यरत असणाऱ्या प्रशासनाला म्हणजेच अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनींधीना, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना-नेत्यांना भ्रष्ट मार्गाने विकत घेते आणि आपली यंत्रणा (सिस्टीम) राबविते. त्या सिस्टीमसमोर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचे काही चालत नाही. गावचे राजकारण त्या भ्रष्ट पैशावरच उभे राहते. त्यातून गावाचा विकास करण्यासाठी धडपडणारी सच्ची माणसं अनेक घाणेरडे-वाईट मार्ग वापरून संपवली जातात.
२) ज्या ज्या गावात स्टोन क्रेशर आहेत; तेथील घडामोडींचा विचार करण्याची गरज आहे. तेथील दुष्परिणाम विचारात घेतलेच पाहिजेत. एक स्टोन क्रेशर आली की दुसरी.. तिसरी… चौथी …. अशा अनेक स्टोन क्रेशर येतात. कारण भ्रष्ट आर्थिक संबंधातून ठराविक लोकांची ताकद वाढते. ते नेहमीच वरचढ ठरतात व त्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात कोणी पुढे येत नाही.
३) ग्रामपंचायतीचे जोपर्यंत सहकार्य मिळत नाही; तोपर्यंत स्टोन क्रेशर गावात येऊच शकत नाही. परंतु असलदे ग्रामपंचायतीची स्टोन क्रेशरबाबतची भूमिका संशयास्पद आहे; असा माझा आरोप आहे. म्हणूनच आताच्या सरपंचांनी आणि त्यांना निवडणुकीत साथ देणाऱ्यांनी स्टोन क्रेशरबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. गावच्या भल्यासाठी त्यांनी माझा आरोप खोटा ठरवावा, हीच सदिच्छा!
४) ग्रामस्थांनी तक्रार करूनही अन्यायकारक घरपट्टी वसूल करणारे; पण असलदे ग्रामपंचायतीजवळ अपघातातून लोकांचे जीव वाचविण्यासाठी (ग्रामस्थांनी आंदोलन करूनही) स्पीड ब्रेकर बसवू न शकणाऱ्या ग्रामपंचायतीतील सत्ताधाऱ्यांनी क्रेशरबाबत त्वरीत भूमिका जाहीर करावी; म्हणजे त्यांचे वास्तव सर्वांसमोर येईल.
५) स्टोन क्रेशर आली की अक्षरश: डोंगर पोखरला जातो. असंख्य झाडे तोडली जातात. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्याचे दुष्पपरिणाम मानवाच्या आरोग्यावर होतात. पाळीव जनावरे, जंगली जनावरे, पशुपक्षी यांच्यावरही घातक परिणाम जाणवतात. निसर्गाचा समतोल बिघडून जातो. परिसरातील झांडावर त्याचा भयंकर परिणाम होतो. हे सर्व भोग भोगण्यास आम्ही तयार आहोत का?
६)असलदे गावात आजच्या घडीला अजिबात प्रदूषण नाही. हे प्रदूषण स्टोन क्रेशरमुळे सुरु होणार आहे. आमचे बहुसंख्य बांधव नोकरी व्यवसायामुळे इतर ठिकाणी राहतात. पण सुट्टीमध्ये, सणांना, जत्रेला, गावच्या कार्यक्रमाला आर्वजून येतात. तर निवृत्त झाल्यावर कायम स्वरूपी निवास करायला गावात येतात. मग आपल्या गावात प्रदूषण करणारा स्टोन क्रेशर सुरु झाल्यावर पुढील कित्येक वर्षे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत; ह्याचा आजच विचार करणे महत्वाचे नाही का?
७) स्टोन क्रेशरमुळे धुळीचे साम्राज्य पसरते. त्याचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो?
अतिसुक्ष्म धुळीकण २.५ मायक्रोमीटर पेक्षा लहान आकारमानाचे असतात. ते श्वसनातून फुफ्फुसामध्ये खोलवर जाऊन राहतात व फुफ्फुसांच्या विशिष्ट रचनेमुळे आतमध्ये दिर्घकाळापर्यंत साठून राहतात. हे सुक्ष्म कण रक्तामध्ये मिसळून रक्त प्रदूषित करतात व आरोग्य घातक अवस्थेत पोहचते. मानवाचे आरोग्य एवढे बिघडते की ते जीवावरही बेतू शकते! ह्याचा परिणाम इतर सजीवांवरही होतो.
८) हे सूक्ष्म धुळी कण झाडांच्या पानांवर चिकटल्यानंतर पानांची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया थांबते व झाडे मरतात. असलदे गावामध्ये अनेकांनी काजूच्या-कलमांच्या बागा रक्ताचे पाणी करून-कष्टप्रद जीवन जगून उभ्या केल्या आहेत. त्यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. क्रेशर सुरू झाल्यानंतर हे उत्पन्न बंद होणार नाही का? काजूची आंब्याची गुणवत्ता घसरणार नाही का?
९) धुळीचे साम्राज्य पसरून हवेच्या प्रदूषणाबरोबर जल आणि ध्वनी प्रदूषणही होणार आहे. त्याचेही दुष्परिणाम जाणवणार आहेत.
गावामध्ये प्रदूषणकारी प्रकल्प आणून हातावर मोजता येतील एवढ्यांचे भले होईल. पण जो विनाश होईल त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतील.
संपूर्ण जग आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडलाय. मुंबई शहरात आपण ते भोगतोय. लोक प्रदूषण नसणाऱ्या ठिकाणी खेडेगावी राहायला जातात, तिथे घरे बांधतात आणि आमचा प्रदूषण मुक्त गाव प्रदूषित होणार आहे. हे रोखायला नको का?
आता ग्रामपंचायत निवडणूक नाही. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य-समर्थक नाही. माझी भूमिका स्पष्ट व पारदर्शक आहे. आता तुमची भूमिकाही महत्वाची आहे; अन्यथा
राक्षस खाणार…
सावधान……….
-नरेंद्र राजाराम हडकर
(आपल्या साधक-बाधक प्रतिक्रियेचं स्वागत आहे!)
स्टोन क्रेशरला जोरदार विरोध करून परवानगी नाकारणाऱ्या ग्रामास्थांनो त्रिवार धन्यवाद!
आता पुढची कायदेशीर लढाई जिंकण्यासाठी सज्ज व्हा आणि स्टोन क्रेशर रूपी राक्षसाला गाढा!
(२०/१२/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा!)
https://starvrutta.com/wp-content/uploads/2019/04/crusher-congrat-1.pdf