मानसिक आणि शारीरिक आरोग्य श्वासक्रियेशी निगडित!

मानवी देहामध्ये अग्नि आहे आणि त्यात अन्नाची आहुती मानव देत असतो व म्हणूनच भोजनक्रियेस यज्ञ म्हटले आहे. त्याचप्रमाणे श्वासाची क्रिया हीदेखील अव्याहतपणे चालणारा यज्ञ आहे आणि श्वासप्रक्रियेवर नियन्त्रण मिळवल्यास मनावर नियन्त्रण मिळवता येते. मनाचे आणि शरीराचे आरोग्य या दोहोंशीही श्वासाच्या क्रियेचा जवळचा संबंध आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५  रोजीच्या प्रवचनात सांगितले.

धातू – सातही धातू शरीरधारणाचे काम करत असले तरी त्यातल्या रक्‍त, मांस, अस्थी व शुक्र या धातूंची संपन्नता जितकी चांगली तेवढी रोग होण्याची शक्‍यता कमी असते. यातील रक्‍त व शुक्र ही प्राणाची स्थाने असल्याने हे धातू अशक्‍त झाले की सरळ प्राणशक्‍ती, जीवनशक्‍ती कमी होऊन अनेक रोगांना आमंत्रण मिळते. तर मांस व अस्थी हे दोन धातू म्हणजे जणू शरीरशक्‍तीचे आधारस्तंभ असतात, तेच डगमगले तर शरीर क्षीण होते.

ओज – सातही धातूतील सार असणारे ओज हे शरीरातील खरे चैतन्य असते, जोवर ओज सुस्थितीत आहे तोवर शरीर सुस्थितीत असते आणि ओजाचा नाश झाला तर निश्‍चितच शरीराचा नाश होतो असे आयुर्वेदात अनेक ठिकाणी सांगितलेले आढळते. म्हणून आरोग्य उत्तम राहण्यासाठी ओज सुस्थितीत असणे अत्यावश्‍यक होय.

अग्नी – आहाराचे शक्‍तीत रूपांतर करणारा, आहारापासून संपन्न धातू निर्माण करण्याचे सामर्थ्य असणारा एकमेव घटक म्हणजे अग्नी होय. निरामय दीर्घायुष्य हवे असल्यास अग्नी उत्तम तऱ्हेने कार्यक्षम असावा लागतो.

सुयोग्य मलविसर्जन यंत्रणा – शरीरात अनावश्‍यक असणारे घटक शरीराबाहेर वेळच्या वेळी व विनासायास बाहेर जाणे आवश्‍यक असते. एकच नासका आंबा जसा आजूबाजूच्या सगळ्या आंब्यांना खराब करू शकतो, तसेच शरीरात तयार झालेली किंवा शरीरात बाहेरून प्रवेशित झालेली मलद्रव्ये, विषद्रव्ये वेळेवर शरीराबाहेर गेली नाही तर अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते. म्हणून रोगांना प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने मलविसर्जन योग्य प्रकारे होणे आवश्‍यक होय.

स्वस्थ मन – शरीर व मन या दोघांचाही खूप जवळचा संबंध असतो. मन अस्वस्थ असले की त्याचा परिणाम शरीरावर होतो तसेच शरीर रोगग्रस्त असले की मन थाऱ्यावर राहात नाही याचा अनुभव सर्वांना असतो. ‘विषादो रोगवर्धनानाम्‌’ म्हणजे मन खचले वा भीतीग्रस्त असले की सरळ ओजाचा ऱ्हास होतो, असेही आयुर्वेद म्हणतो. म्हणूनच आरोग्य सुस्थितीत राहण्यात मनाचे महत्त्वाचे स्थान असते.

आरोग्याचे स्वातंत्र्य हे काही अंशी जन्मजात मिळालेले असते, ज्याचे श्रेय आईवडिलांना, गर्भावस्थेत झालेल्या संस्कारांना जाते. जन्मजात आयते मिळालेले आरोग्य नंतर टिकविणे व वाढवणे हे मात्र सर्वस्वी प्रत्येक व्यक्‍तीवर अवलंबून असते. यासाठी आयुर्वेदाने मांडलेली आहारकल्पना महत्त्वाची होय. काय खावे, कधी खावे, किती प्रमाणात खावे, अन्न कसे शिजवावे, कोणत्या गोष्टी एकत्र करू नयेत, ऋतुनुसार आहारात काय बदल करावा वगैरे सर्व गोष्टी आयुर्वेदाने इतक्‍या काळजीपूर्वक व विस्तृतपणे सांगितलेल्या आहेत की त्या प्रत्यक्षात आणणाऱ्या मनुष्याचे आरोग्यरूपी स्वातंत्र्य कुणीही हिरावून शकणार नाही. दिनचर्येत समाविष्ट केलेला अभ्यंग हा आपणहून करता येईल असा अत्यंत साधा पण आरोग्याचे स्वातंत्र्य कायम ठेवणारा प्रभावी उपचार आहे. नियमित अभ्यंगाने वातदोष तर संतुलित होतोच, पण सतेज, निरोगी त्वचेचा लाभ होतो, धातू दृढ होतात, शरीरशक्‍ती वाढते, थकवा दूर होतो, डोळ्यांची ताकद वाढते, स्टॅमिना वाढतो, एकंदरीतच आरोग्याचा, तारुण्याचा, स्फूर्तीचा लाभ होतो. रोज करावयाचे असे हे अभ्यंग सकाळी स्नानाच्या अगोदर किमान दीड तास किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपले आपण स्वतंत्रपणे करता येते.

झोपेची आपल्या सर्वांनाच गरज असते. पण कधी झोपावे, किती वेळ झोपावे हे शास्त्रांनी सांगितलेले असते. झोपेच्या बाबतीत तीन गोष्टी सांभाळाव्या लागतात. एक म्हणजे झोप पुरेशी मिळायला हवी व दुसरी गोष्ट म्हणजे ती वेळेवर मिळायला हवी आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे झोप शांत लागायला हवी. आधुनिक काळामध्ये दिवसेंदिवस या गोष्टीकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढते आहे. अभ्यास, व्यवसाय, नोकरीमुळे उशिरा घरी येणे, रात्री उशिरापर्यंत टी.व्ही, सिनेमा पाहणे, इंटरनेट वर चॅट करणे अशी अनेक कारणे यामागे असतात. पण शांत झोपेच्या मोबदल्यात या सगळ्या गोष्टी केल्यास खरे सुख आणि आरोग्यास वंचित राहावे लागते हे खरे.

वेळेवर व पुरेशा प्रमाणात झोपल्याने पुढील फायदे होतात,
कालशयनात्‌ पुष्टिवर्णबलोत्साहाग्निदीप्ति
अतन्द्राधातुसात्म्यानि भवन्ति ।

शरीराचे पोषण हो, कांती उजळते, शरीरशक्‍ती वाढते, उत्साह प्रतीत होतो, अग्नी प्रदीप्त होतो, डोळ्यावर अवेळी झापड येत नाही आणि शरीरधातू संतुलित राहण्यास मदत होते.

रक्‍त, शुक्र हे धातू तसेच ओज सुस्थितीत राहण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या रसायनांचे नियमित सेवन करणे उत्तम असते.

मांसधातू व अस्थीधातू मजबूत होण्यासाठी योग्य आहाराबरोबरच व्यायामाचीही मोठी आवश्‍यकता असते, त्या दृष्टीनेही प्रकृतीनुरूप व्यायामाचा रोजच्या दिनक्रमात अंतर्भाव करणे गरजेचे होय.

थोडक्‍यात, भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार दिला तसाच निसर्गानेही आपल्याला आरोग्याचा अधिकार दिलेला आहे. हे आरोग्य जपणे, रोगरूपी पारतंत्र्यापासून स्वतःचे संरक्षण करणे हे आपल्या हातात आहे. थोडे अनुशासन सांभाळले आणि आपल्या या अधिकाराचे भान ठेवले तर आरोग्याचे स्वातंत्र्य नक्कीच अनुभवता येईल.

 

You cannot copy content of this page