सिंधुदुर्गात तरुणांच्या आत्महत्तेचे सत्र- कोरोनाच्या मृत्यूंपेक्षा भयावह

मानसिक आजाराबाबत कारणमीमांसाचा शोध घ्यावा! 

कोकणातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीमुळे कितीही संकटे आली तरी तो न डगमगता आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाही. मात्र कोरोनाचे सत्र सुरु झाल्यापासूनच्या कालावधीचा विचार केल्यास सिंधुदुर्गात कोरोनाच्या कैकपट्टीने तरुणाईने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे दिसते. जिल्ह्यातील मानसशास्त्र तज्ञ डॉक्टरांनी या आत्महत्येच्या कारणांची कारणमीमांसा शोधून काढणे आवश्यक आहे

गेल्या चार महिन्यातील जिल्ह्यातील दैनिकांतील बातम्यांकडे लक्ष टाकले असता तरुण-तरुणींच्या, विवाहित, तसेच प्रौढांच्या आत्महत्येत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. बातम्यांमध्ये बहुतेकवेळा या आत्महत्येच्या कारणांमागिल माहिती असते. मात्र बऱ्याचवेळा ती सामाजिक भावनेतून प्रसिद्ध केली जात नाही. त्यामुळेच वाचकांना ती ज्ञात होत नाही. सबब पालकांना आपल्या पाल्यांबद्दल काय दक्षता घ्यावी? याचा उलगडा होत नाही.
१) स्पर्धेच्या या युगात प्रत्येकजण पैशाच्या मागे धावताना दिसतो.
२) काही वेळा आई-वडील दोघेही नोकरीत असल्याने, विशेषतः शासकीय नोकरी असल्यास होत असलेल्या नियमित बदल्यामुळे पालकांना मुलांवर अपेक्षित संस्कार करता येत नाहीत.
३) तसेच मिनिटा-मिनिटात बदलणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपली मुले नेमके काय करतात? ते पालकांना समजत नाही.
४) दुरदर्शनवर अथवा मोबाईलवर काय पहातात? ह्यावर लक्ष देण्यासाठी पालकांना वेळ मिळत नाही.
५) काही वेळा कौटुंबिक वादविवादामुळे मुले भरकटली जातात.
६) अल्पवयीन तरुण-तरुणी सध्याच्या मुक्त वातावरणात एकमेकांच्या प्रेमात पडतात.
७) आताच्या तरुणाईंमध्ये रस्त्यावर चालत असतानासुध्दा त्याच्या कानावर अथवा हेडफोनवर तासन-तास बोलणे सुरु असते.
८) घरात दोन वेळचे जेवण शिजत नसले तरीही त्याच्या हातात महागडे मोबाईल कुठून येतात? हा प्रश्न पडतो.
९) तसेच काही राजकारण्यांनी कार्यकर्त्यांना पोसता-पोसता तरूणाईला गुटखा, दारूसारख्या व्यसनांची सवय लावलेली असते. निवडणुकीचा कार्यकाळ संपल्यावर ही पिढी नको त्या व्ययसायात पडते; असे निरीक्षणाअंती लक्षात येते.
१०) चांगल्या घराण्यातील मुलेही दोन पिढ्यांतील वैचारिक अंतरामुळेही जीवनाबाबत अवास्तव कल्पना बाळगतात. आपल्या मागच्या पिढीने कुटुंब उभे करताना काय काय सोसले? याबद्दल त्यांना सोयरसुतक नसते. त्यातून मग वाद निर्माण होतात.
११) सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकाची उपजिविकेची साधने दुरावली आहेत.
१२) मात्र अठराविश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबातील कोणी आत्महत्या करताना दिसत नाहीत. मात्र ऐषाआरामी जीवन जगण्याची सवय लागलेल्यांना मात्र जीवन संपवावे असे वाटते.
१३) विवाहित महिलांमध्ये तर शुल्लक कारणांमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.
१४) बऱ्याचवेळा पदरी सुंदर मुले असतानाही त्यांच्या भवितव्याचा विचार न करता रागाच्या भरात आत्महत्येचा मार्ग चोखळला जातो!

आत्महत्येमागची अशी अनेक कारणे सांगता येतील. समुपदेशनोपचार माध्यमातून अशा प्रकारच्या आत्महत्या रोखणे शक्य आहे. मात्र शासन स्तरावर म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. किंबहुना आज देशामध्ये मानसोपचार तज्ञ डॉक्टरांची संख्या तुलनेने खूप कमी आहेच. पण त्याचबरोबर समाजाचा मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन दूषित आहे. समाजाचे समुपदेशनोपचार करण्याची गरज आहे.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे केवळ सहा जणांचा आज अखेर निधन झाले आहे. मात्र गेल्या चार महिन्यांतील आत्महत्येची आकडेवारी भयावह आहे.

जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण
कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *