प्रतिकूल परिस्थितीत पशुवैद्यक शास्त्राचे शिक्षण घेणारी स्वप्नाली सुतार वर्गात प्रथम!
कणकवली (संतोष नाईक):- प्रतिकूल परिस्थितीत पशुवैद्यक शास्त्राचे शिक्षण घेत असताना प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीच्या माध्यमातून अनेक समाजसेवक, राजकीय नेते यांनी कुमारी स्वप्नाली सुतार हिला आवश्यक ती मदत-सहकार्य केले. त्यातून प्रेरित होऊन तिने तिच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत वर्गात प्रथम क्रमांक पटकाविला.
गतवर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले आणि शैक्षणिक समस्या उभी राहिली. महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली; परंतु खेडेगावातील विद्यार्थ्यांना इंटरनेट मिळविण्यासाठी अक्षरशः जंगलात डोंगरावर राहावे लागले. कणकवली तालुक्यात असलेल्या दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार ह्या विद्यार्थिनीने केलेले प्रयास खरोखरच कौतुकास्पद होते. त्याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली आणि स्वप्नाली सुतार हिला आवश्यक असणारी मदत देण्यास समाजसेवक, राजकीय पुढारी पुढे आले. स्वप्नाली सुतार ह्या विद्यार्थिनीसह प्रसारमाध्यमांनी दिलेले सकारत्मक वृत्त आणि त्या वृत्ताची दखल घेत ज्यांनी ज्यांनी तिला मदत केली त्या सर्वांनी समाजापुढे आदर्श ठेवला.
जंगलात झोपडी बांधून ऑनलाइन पशुवैद्यक शास्त्राचे शिक्षण घेणारी कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावातील विद्यार्थीनी कुमारी स्वप्नाली सुतार हिला त्यावेळी माननीय आमदार नितेश राणे यांनी तिच्या हॉस्टेलचा खर्च म्हणून ५०,०००/- रुपये मदत केली होती. नुकत्याच झालेल्या परीक्षेत कुमारी स्वप्नाली ही ती शिकत असलेल्या कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिच्या निवासस्थानी जाऊन जेष्ठ पत्रकार श्री. अशोक करंबेळकर, श्री. विजय गावकर यांनी तिचे कौतुक केले व तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.