क्षा. म. समाजाच्या अभ्यासू नेतृत्वाचा अस्त!

मोहन लोकेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

आजचा दिवस अतिशय दुःखद बातमी घेऊन आला. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजबांधव, समाजाचे नेते, राजकीय नेते मोहन लोकेगावकर यांचे आज निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो; ही परमात्म्या चरणी प्रार्थना! लोकेगावकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

मोहन लोकेगावकर यांचे राजकीय कणखर आणि समर्थ नेतृत्व शिवसेना पक्षात बहरले. जनतेच्या प्रश्नांना थेट भिडण्याच्या वृत्तीने ते लोकप्रिय झाले. सामान्यांचे अनेक छोटे मोठे प्रश्न त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली सहजपणे सोडविले. त्यांची जनतेशी जोडलेली नाळ त्यांचं राजकीय सामर्थ्य वाढविणारी होती. शिवसेना पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि ते सांताक्रुज (प.), वार्ड क्रमांक ९७ चे नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (उपनगरे) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले. त्यांनतर त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात कार्य केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी काम करताना त्यांनी मोठ्या मेहनतीने पक्ष वाढविला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी कोकणात आणि मुंबईत राणे कुटुंबीयांचा निवडणुकीत जोरदार प्रचार केला. अशी त्यांची राजकीय वाटचाल आज अर्ध्यावरच थांबली.

राजकारणात काम करताना सामाजिक क्षेत्राशी बांधिलकी त्यांनी कायम जोपासली. दिवसरात्र जनतेचा कैवारी म्हणून त्यांनी केलेले काम अनेकांच्या स्मरणात राहील. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव म्हणून त्यांनी केलेले कार्य प्रचंड मोठे आहे. ते गावडे – गावडा समाज उत्कर्ष संस्था, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष होते. त्या माध्यमातून त्यांनी समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळवून दिले. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मिळविण्यासाठी प्रचंड मोठी आंदालने करीत आहे – न्यायालयीन लढाई करीत आहे. त्यासाठी काहींना हौतात्म्य पत्करावं लागलं. परंतु मोहन लोकेगावकर साहेबांनी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाला कोणतेही आंदोलन न करू देता आरक्षण मिळवून दिले. त्याचा लाभ समाजातील लाखो विद्यार्थी आज घेत आहेत आणि भविष्यातही घेतील. अशाप्रकारे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजासाठी अभूतपूर्व कार्य मोहन लोकेगावकर साहेबांनी करून ठेवले आहे. त्यामुळे मोहन लोकेगावकर साहेब देहाने जरी आमच्यामध्ये नसले तरी कर्तृत्वाने अमर झाले आहेत. ह्याची जाण समाजाच्या नेत्यांनी निश्चितपणे ठेवली पाहिजे.

“क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था, मुंबई” ह्या संस्थेच्या २५ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोहन लोकेगावकर यांनी सभेला अमूल्य मार्गदर्शन केले होते. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेने सर्वांगीण प्रगती करावी, ह्यासाठी त्यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली होती. अशाप्रकारे ते नेहमीच समाजाच्या भल्याचे विचार मांडायचे. त्यांच्या जाण्याने क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. पण `त्या’ काळाला प्रत्येकाला सामोरे जावेच लागते.

त्यांना पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवार, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव आणि `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ ह्या संकेतस्थळातर्फे पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली!

-नरेंद्र हडकर आणि सुरेश डामरे
पाक्षिक `स्टार वृत्त’
संकेतस्थळ- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *