देवगड-जामसंडेत वारंवार वीज खंडित; महावितरणविरोधी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा!

पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा बंद होत असल्याने व्यापारी, हॉटेल व पर्यटन व्यावसायिक त्रस्त; ॲड. प्रसाद करंदीकर यांच्या निषेध आंदोलनाला युवासेनेचा जाहीर पाठिंबा

देवगड:- देवगड-जामसंडे परिसरात महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांसह व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः व्यवसायाच्या महत्त्वाच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

महावितरणच्या या अनियोजित कारभाराविरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी निषेध आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. युवासेनेचे तालुका प्रमुख गणेश जगदीश गांवकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली. वीजपुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक आहे. देखभाल किंवा दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवणे आवश्यक असल्यास महावितरणने संबंधित ग्राहकांना आगाऊ सूचना देणे अपेक्षित आहे. मात्र, कोणतीही पूर्वकल्पना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक आणि व्यावसायिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार अन्यायकारक असल्याचे गांवकर यांनी नमूद केले.

देवगड तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत वीजपुरवठ्यातील अनियमिततेचा थेट परिणाम स्थानिक पर्यटन व्यवसायावर होत आहे. हॉटेल, दुकाने आणि अन्य व्यावसायिकांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत होऊन आर्थिक नुकसान होत असल्याने या समस्येची दखल घेणे आवश्यक आहे. महावितरणने देवगड-जामसंडे परिसरातील वीजपुरवठ्याची समस्या गांभीर्याने सोडवावी, वीजपुरवठा नियमित ठेवावा आणि नियोजित वीजबंदबाबत ग्राहकांना वेळेत पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ॲड. प्रसाद करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या निषेध आंदोलनातून महावितरण प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले जाणार असून, या आंदोलनाला युवासेनेचा पाठिंबा मिळाल्याने स्थानिक पातळीवर या प्रश्नाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.

error: Content is protected !!