क्षा. म. समाजाचे नेतृत्व करण्याच्या मागणीला आमदार रविंद्र फाटक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद!

नि:स्वार्थीपणे समाजाचे कार्य करण्यास माझी तयारी असून समाज हितासाठी समाजाने संघटितपणे पुढे यायला हवे! -आमदार रविंद्र फाटक

क्षा. म. समाजाचे नेतृत्व करण्याच्या मागणीला आमदार रविंद्र फाटक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद!

ठाणे (विशेष प्रतिनिधी)- “क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे नेतृत्व आमदार रविंद्र फाटक यांनी स्वीकारावे व क्षा. म. समाजाला पुन्हा गतीशिल प्रगतीकडे घेऊन जावे! समाज संस्थेच्या हितासाठी समाजाला संघटित करून उचित दिशा द्यावी; अशी आर्तसाद घालत क्षा. म. समाज परिवर्तन समितीने क्षा. म. समाजाचे सुपुत्र आमदार रविंद्र फाटक यांच्याशी १८ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांच्या ठाणे येथील कार्यालयात जाऊन सविस्तर संवाद साधला. तेव्हा आमदार रविंद्र फाटक यांनी समाजाची आणि समाज संस्थेची सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती घेत क्षा. म. समाजाचे नेतृत्व करण्याचा समाज बांधव भगिनींच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला! यावेळी समाज संस्थेचे विश्वस्त होण्यासाठी विनंती करणारे पत्र त्यांना समाज बांधवांनी दिले.

“आपण समाजाचे नि:स्वार्थी वृत्तीने कार्य करण्यास तयार आहोत; पण समाजाने सुद्धा संघटित होऊन विधायक गोष्टींसाठी प्रामाणिकपणे पुढे यायला पाहिजे. सर्वांना घेऊन आपण समाजाला निश्चितपणे समर्थ करू!” असे प्रतिपादन आमदार रविंद्र फाटक यांनी त्यावेळी केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, क्षा. म. समाज संस्थेत २०१२ साली समाज बांधव भगिनींनी भोंगळ कारभार संपविण्यासाठी सत्तेचे परिवर्तन केले. मात्र गेली १४ वर्षे क्षा. म. समाज संस्थेच्या विश्वस्तांनी, सुकाणू समिती सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या हितासाठी ज्याप्रकारे कार्य करणे अपेक्षित होते ते केले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा स्वप्निक फाटकने समाज संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न ९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रयत्न केला आणि सगळ्यात संतापजनक बाब म्हणजे समाज संस्थेचे अध्यक्ष म्हणून आमदार प्रसाद लाड यांचा फलक लावला. त्यानंतर समाज बांधव भगिनींच्या भावना अतिशय तीव्र झाल्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणेसह मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यामधील समाज बांधव भगिनींनी स्वप्निक फाटक व आमदार प्रसाद लाड यांचा तीव्र शब्दात निषेध केला; परंतु समाज संस्थेच्या विश्वस्तांनी ज्या योग्य प्रकारे प्रशासकीय व न्यायालयीन प्रक्रिया करायला पाहिजे होती ती केली नाही. त्यामुळे दोन महिने होत आले तरी समाज संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे, सीसीटीव्हीची यंत्रणा लंपास करणे, कार्यालयाला टाळे लावणे; अशा गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या स्वप्निक फाटकवर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. तसेच भविष्यात संस्थेवर प्रशासक आणण्याचे मनसुबे आखण्यात येत आहेत. ह्या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर क्षा. म. समाज परिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, क्षा. म. समाज कार्यकारिणी सदस्यांनी व समाज बांधवांनी भेट घेत आमदार रविंद्र फाटक यांच्याशी संवाद साधला व क्षा. म. समाजाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करत समाज संस्थेच्या ९१ व्या वर्षात आमदार फाटक यांनी नेतृत्व केल्यास पुन्हा समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि समाज संस्थेला लागलेले ग्रहण सुटेल; असा आशावाद मांडला. शेवटी आमदार रविंद्र फाटक यांनी क्षा. म. समाज बांधवांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

आमदार रविंद्र फाटक यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये क्षा. म. समाज परिवर्तन समाजाचे अध्यक्ष सुनील जेठे, सरचिटणीस सुरेश डामरे, खजिनदार राकेश कांबळी, उपाध्यक्ष समीर हडकर, क्षा. म. समाज संस्थेचे कार्यकारणी सदस्य अनंत बांदिवडेकर व संदीप धोपटे तसेच विजय वाळके, अनिल साळगावकर, सचिन लोके, महेश गावकर, पांडुरंग वाळके, नरेंद्र हडकर (पत्रकार) आणि समाज बांधव मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

error: Content is protected !!