क्षा. म. समाज संस्थेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या स्वप्निक फाटक व आमदार प्रसाद लाड यांचा समाज बांधवांकडून तीव्र निषेध!

सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी व विश्वस्तांच्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा, क्षा. म. समाजाचा गर्भित इशारा!

मुंबई:- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न स्वप्निल फाटक यांने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी केला. त्यावेळी त्याने बेकायदेशीर कृत्य केले असून क्षा. म. समाज संस्थेचा अध्यक्ष म्हणून आमदार प्रसाद लाड यांचा फलक लावला. स्वप्निल फाटक व आमदार प्रसाद लाड ह्यांचा तीव्र निषेध क्षा. म. समाज संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष अंकुश डगरे, अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर, क्षा. म. समाज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष रामदास विखाळे, सरचिटणीस पत्रकार भगवान लोके व उपस्थित समाज बांधवांनी केला. तत्पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी व विश्वस्तांच्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाने ह्याबाबत गर्भित इशारा देत भविष्यात सडेतोड उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञाती बांधव यांनी आक्रमक भूमिका घेतली असून सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. शिरोडकर हायस्कुल, परळ, मुंबई येथे संस्था पदाधिकारी व सिंधुदुर्गातील ज्ञाती बांधवांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर समाजाचे आराध्य दैवत डॉ. रामचंद्र शिरोडकर यांच्या पुतळ्यासमोर समाज बांधवांनी बेकायदेशीर घटनेच्या व आमदार प्रसाद लाड आणि स्वप्निल फाटक यांचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. ह्या दोघांनाही समाजाची संस्था कदापी बळकावू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.

परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कुलच्या सभागृहात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई व क्षात्रकुलोत्पन्न मराठा (गावडे) समाज या दोन संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शनिवारी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडली. त्यावेळी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर, विश्वस्त अध्यक्ष अंकुश डगरे, उपाध्यक्ष रामचंद्र वाळके, सेक्रेटरी भाऊ डगरे, खजिनदार चंद्रशेखर फाटक, उपचिटणीस अनिल वराडकर, सदस्य अनंत बांदिवडेकर, कार्यकारिणी सदस्य श्रीपाद फाटक, विश्वस्त सदस्य उदय फणसेकर, प्रदिप लुडबे, जनार्दन कुवेसकर, सुकाणू समिती सदस्य रविंद्र कुवेसकर, विलास कोठारकर, धर्माजी गावकर, अशोक घारकर, ॲड. दिपक डगरे तर क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रामदास विखाळे, सरचिटणीस भगवान लोके, उपाध्यक्ष रविंद्र जोगल व गणेश गावकर, सहसचिव हनुमंत वाळके, भाई नरे, स्वप्नील चिंदरकर, आतिश जेठे, सचिन लोके, अनिल नरे, विजय चिंदरकर, श्यामसुंदर आचरेकर, विनय हडकर, नंदकिशोर गावडे, विजय वाळके, परेश आचरेकर, सुनील हरमलकर, सुनील रावले, विजय लोके, रामचंद्र ढोलम आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

संयुक्त बैठकीमध्ये एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यावेळी समाज संस्थेवर ताबा मिळवण्याच्या झालेल्या प्रयत्नांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. संस्थेच्या संरक्षणासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती बैठकीत देण्यात आली. यामध्ये न्यायालयीन लढाई, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे, तसेच विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन निवेदने सादर करण्याच्या माध्यमातून संस्थेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे पदाधिका-यांनी सांगितले. डॉ. शिरोडकर हायस्कूल येथे झालेल्या या बैठकीत समाज संस्थेचे अस्तित्व टिकवणे, समाज बांधवांना संघटित करणे, सभासद नोंदणी सुरू करणे आणि तातडीने विशेष सर्वसाधारण महिन्याभरात सभा घेणे; यासंदर्भात सकारात्मक चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक व गुजरात राज्यातील ज्ञाती बांधवांना संघटीत करुन ह्या संकटाविरोधात लढण्याचा निर्धार एकमुखी करण्यात आला.

यावेळी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचा विजय असो, हम सब एक है, हमसे जो टकरायेगा मिठीं मे मिल जाएगा, संस्थेवर ताबा घेण्याचा प्रयत्न करणा-यांचा निषेध असो, डाॅ. शिरोडकर यांचा विजय असो, एच.डी.गावकर साहेबांचा यांचा विजय असो; यासह विविध घोषणा समाज बांधवांनी दिल्या.

संस्थेवरील संकट एकजुटीने दूर करू! – विश्वस्त अध्यक्ष अंकुश डगरे
“आपल्या संस्थेत स्वप्निल फाटक यांनी बेकायदेशीर घुरखोरी करुन ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, या घटनेचा आम्ही निषेध करतो त्याला साथ देणारे आ. प्रसाद लाड यांच्या नावाचा अध्यक्ष म्हणून फलक लावला. त्यांच्या समवेत असलेल्या चौघांचाही निषेध करतो. ह्या पुढील काळात संस्था वाचविण्यासाठी न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरील लढाई आम्ही लढणार आहोत!” अशी प्रतिक्रिया क्षा. म. समाज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अंकुश डगरे यांनी दिली.

क्षा. म. समाजात तीव्र भावना! -अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर
“समाज संस्थेच्या परळ येथील इमारतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न स्वप्निल फाटक यांनी केला. या विरोधात समाजात तीव्र भावना आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग, गोवासह अन्य भागातून प्रमुख कार्यकर्ते आले होते. आम्ही स्वप्निल फाटक यांचा आम्ही निषेध करतो. संस्था वाचविण्यासाठी कुठेही दिरंगाई होणार नाही. तुमचे पाठबळ व आमची न्यायालयीन लढाई ही सुरु राहील! सर्व ज्ञाती बांधवानी ह्या लढयात सहभाग घ्यावा!” असे आवाहन क्षा. म. समाज अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर यांनी केले.

एकजुटीने लढा उभारणार! – सिंधुदुर्ग अध्यक्ष रामदास विखाळे
“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजातील प्रमुख बांधवांना घेऊन परळ बैठक झाली. ह्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झालेली आहे. आगामी काळात एकजुटीने लढा उभारण्याचे ठरले आहे. स्वप्निल फाटक व आमदार प्रसाद लाड यांचा आम्ही निषेध करीत आहोत!” अशी प्रतिक्रिया क्षा. म. समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रामदास विखाळे यांनी दिली.

अन्यथा…, समाज बांधव रस्त्यावर उतरणार!- पत्रकार भगवान लोके
“क्षा. म. समाज संस्था ताब्यात घेण्याच्या दृष्टीने स्वप्निल फाटक यांच्यामार्फत आमदार प्रसाद लाड यांनी ९ ऑक्टोबरला प्रयत्न केला. त्यामुळे समाजात तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. समाज म्हणून ह्या पुढील काळात संस्था वाचविण्यासाठी रस्त्यावरची लढाई असेल किंवा न्यायालयीन लढण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला. हजारोंच्या संख्येने समाज बांधव या विरोधात संघटीत होत आहेत. त्यामुळे संस्थेवर ताबा मिळविणाऱ्यांना हा गर्भित इशारा समजून समाज भावना जाणून घ्यावी; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु!” असा इशारा जिल्हा सरचिटणीस भगवान लोके यांनी दिला आहे.

error: Content is protected !!