सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचा सावळा गोंधळ!
फक्त कणकवली रेल्वे स्टेशनवरच ठराविक वेळेत उतरणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट का?
कणकवली (प्रतिनिधी):- फक्त कणकवली रेल्वे स्टेशनवर सकाळी साडेसहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उतरणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येते आणि रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर मात्र कुठलीही टेस्ट केली जात नाही. आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट सुद्धा चार पाच दिवसांनी येतो. त्यामुळे सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा अद्यापही गोंधळलेल्या अवस्थेत काम करताना दिसते आहे. त्याचा त्रास सामान्य प्रवाशांना होत असून त्यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यानी आरोग्य यंत्रणेला समज दिली पाहिजे; अशी मागणी जनतेतून होत आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, फक्त कणकवली रेल्वे स्टेशनवर सकाळी साडेसहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उतरणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येते आणि रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर तसेच रेल्वे क्रॉसिंगला थांबल्यानंतर उतरणाऱ्या प्रवाशांची मात्र कुठलीही टेस्ट केली जात नाही. ज्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाते त्यांचा रिपोर्ट सुद्धा चार पाच दिवसांनी येतो. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने दिली पाहिजेत.
कणकवली रेल्वे स्टेशनवरच सकाळी साडेसहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उतरणाऱ्या प्रवाशांचीच आरटीपीसीआर टेस्ट का करण्यात येते? कणकवली रेल्वे स्टेशनवरच सकाळी साडेसहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उतरणारे प्रवाशीच कोरोनाबाधित असू शकतात; असं आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे का? असे प्रश्न प्रवासी विचारात असून आरोग्य यंत्रणेतील गोंधळ अजूनही सुरु असल्याचे स्पष्ट होते.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जर आरोग्य यंत्रणा आर.टी.पी.सी.आर, ट्रुनॅट टेस्ट आणि अँटीजन टेस्ट करीत असतील तर ती एकाच स्टेशनवर आणि काही तासांकरिताच का? इतर मार्गांनी जिल्ह्याबाहेरून किंवा दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांची टेस्ट का केली जात नाही? ह्यामागची कारणमीमांसा आरोग्य यंत्रणेने जनतेला समजून सांगितली पाहिजे. केरळमध्ये कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढली आहे, त्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची सुद्धा कोणतीही टेस्ट केली जात नाही. एक तर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची सर्वांची दिवसाचे २४ तास टेस्ट करा अन्यथा फक्त कणकवली स्टेशनवर सुरु असलेली टेस्टची नाटकं बंद करा! अशी संतप्त प्रतिक्रिया कणकवली रेल्वे स्टेशनवर उतरणारे प्रवासी देत आहेत.
फक्त कणकवली रेल्वे स्टेशनवर सकाळी साडेसहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उतरणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येते; त्यामुळे अनेक प्रवासी कणकवली रेल्वे स्टेशनवर न उतरता अगोदरच्या किंवा नंतरच्या स्टेशनवर उतरतात. ज्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येते त्या टेस्टचा रिपोर्ट सुद्धा चार पाच दिवसांनी येतो. तोपर्यंत सदर प्रवासी मुक्तपणे फिरत असतो. मग त्या टेस्टचा उपयोग काय? ह्या टेस्टवर किती खर्च होतो? हे आरोग्य यंत्रणेने जाहीर करावे म्हणजे त्यातील खरी गोम समजून येईल. असे सुद्धा अनेक तज्ञ स्पष्ट करीत आहेत.