शिवनेरी कबड्डी स्पर्धेला परवानगी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती!

शिवसेना नेते सचिन अहिर यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन शिवनेरी मंडळाचे विनंती पत्र सुपूर्द केले!

मुंबई:- मुंबईतील मानाची आणि प्रसिद्ध असणारी शिवनेरी कबड्डी स्पर्धेला परवानगी मिळावी; यासंदर्भातील शिवनेरी मंडळाचे विनंती पत्र शिवसेना नेते सचिन अहिर यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन सुपूर्द केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील कबड्डी खेळाडू आणि कबड्डी प्रेमी ज्या स्पर्धेची आतुरतेने प्रतिक्षा करीत असतात आणि ज्या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ ५२ वर्षापुर्वी सन्मानिय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते झाला; त्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन नवरात्रौत्सवात म्हणजे ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२१ ह्या कालावाधीत शिवनेरी सेवा मंडळ, मुंबई ह्या संस्थेच्यावतीने करण्याचे योजिले आहे. महाराष्ट्रात दरवर्षी शिवनेरी सेवा मंडळ, मुंबई ह्या संस्थेच्या माध्यमातून गेली ५२ वर्षे कबड्डी हंगामाचा शुभारंभ नवरात्रौत्सवात होत असतो आणि ह्या स्पर्धेत नामवंत प्रसिद्ध आजी-माजी खेळाडू, प्रशिक्षक, पंच, कबड्डी खेळावर प्रेम करणारे नागरीक जोडले जात असतात. अशा कबड्डी स्पर्धेस परवानगी द्यावी; अशी तमाम खेळाडू, क्रिडाप्रेमींच्यावतीने विनंती मुख्यमंत्र्यांकडे आणि क्रीडा मंत्र्यांकडे करण्यात आली आहे; जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा कबड्डीच्या सामान्यांना सुरुवात होईल.

यासंदर्भात शिवसेना नेते सचिन अहिर यांच्याशी कबड्डी स्पर्धेबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी शिवनेरी मंडळाचे कार्यवाह किरण मोरजकर, क्रीडा प्रमुख प्रकाश भोसले, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार-दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते राजेश पाडावे आणि मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत शिवनेरी मंडळाचे विनंती पत्र शिवसेना नेते सचिन अहिर यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन सुपूर्द केले आणि कबड्डी प्रेमींची मागणीस सकारात्मक प्रतिसाद द्यावा; अशी विनंती केली.

शिवनेरी कबड्डी स्पर्धेने महाराष्ट्रात कबड्डी स्पर्धा हंगामाचा शुभारंभ होतो. त्यामुळे शिवनेरी मंडळाच्या कबड्डी स्पर्धेला मुख्यमंत्र्यांनी – क्रीडामंत्र्यांनी परवानगी द्यावी, अशी तमाम कबड्डी प्रेमींची मागणी आहे.