कुलदेवी व कुलदेवाचे अविस्मरणीय अद्भुत दर्शन!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ

गेली २५ वर्षे परमपूज्य सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपाछत्राखाली वावरताना बापूंनी आपल्या प्रवचनातून अर्थात पितृवचनातून कुलदेवता, कुलदेवी, कुलदेव, गोत्र इत्यादीबाबत अनेकवेळा आध्यात्मिक माहिती दिली. आदिमातेची अनेक रूपांची आणि अवतारांची महती सांगण्यासाठी मातृवात्सल्यविन्दानम आणि मातृवात्सल्यउपनिषद हे दोन ग्रंथ श्रद्धावानांना प्रदान केले. त्यामुळे अनेक संकल्पना थोड्याफार का असेना मनात रुजल्या आहेत. परंतु जेव्हा सन्माननीय श्री. बी. डी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आध्यात्मिक कार्याचे अवलोकन करताना सावंत- पटेल घराण्याची कुलस्वामिनी श्री गढकालिका माता (धार-उज्जैन) आणि कुलदैवत महाकाल (उज्जैन) बाबत समजले तेव्हा प्रचंड कुतूहल निर्माण झाले, कुलस्वामिनी कुलदेवी असणाऱ्या आदिमातेच्या दर्शनाची इच्छा निर्माण झाली. आणि ती इच्छाही आदिमातेने पूर्ण केली. हा योगायोग नसतो. तर आदिमातेचं सुनियोजित `प्लॅन’ असतं असं आम्ही श्रद्धावान मानतो.

१८ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्व बांधव-भगिनींनी उज्जैन येथील श्रीगढकालिका मातेचे दर्शन, श्री कालभैरव दर्शन, श्री महाकाल दर्शन, श्री हरसिद्धी माता दर्शन घेतले व दिपआरतीमध्ये भाविक भक्तिभावाने सहभागी झाले. तर १९ नोव्हेंबर २०२३ रोजी उज्जैन येथून धार येथे प्रस्थान करून श्रीगढकालिका मातेचे दर्शन घेऊन सामुदायिक अभिषेक केला. ह्या दोन दिवसाच्या काळात जे आध्यात्मिक सुख लाभले ते शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाही. एवढे ते अद्भुत होते. विशेष म्हणजे ह्या १८ तारखेचा माझ्याशी खूपच जवळचा संबंध आहे. भारतीय वैदिक सनातन धर्मातही १८ अंकाचे माहात्म्य खूप मोठे आहे. म्हणूनच मातेचं दर्शन आम्हा उभयतांसाठीच नव्हेतर उपस्थित २३० सावंत-पटेल बांधव भगिनीनीसाठी अनमोल संस्मरणीय ठरले. त्यासाठी सन्माननीय श्री. बी. डी. सावंत यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद मानावे तेवढे थोडेच!

मध्यप्रदेशातील उज्जेनपासून सुमारे १०० किलोमीटरवर असलेल्या धार शहरात उंच टेकडीवर भारतीय मंदिर स्थापत्य कलेचे एक अद्वितीय उदाहरण असलेले श्री गढकालिका मातेचं प्राचीन मंदिर आहे आणि बाजूला देवी सागर तलाव आहे. ह्या मंदिराचा इतिहास श्रद्धावानांना अनेक गोष्टींचा खुलासा करणारा आहे. हे मंदिर धारच्या पवार घराण्याने स्थापन केले होते. तेच पवार `सावंत- पटेल’ पदवीने सन्मानित झाले.

सन १७७० मध्ये स्वर्गीय यशवंतराव पनवार (अपभ्रंश होऊन आताचे पवार) यांच्या पत्नी सकवारबाई यांनी त्यांच्या पतीच्या निधनानंतर बांधले होते. श्रीगढकालिका मंदिरासोबतच त्यांनी नौगाव गणेश मंदिर आणि मांडू राम मंदिरासह आणखी सात मंदिरे बांधली. ती आजही आपण पाहू शकतो. मंदिराचा शिखर परमार स्थापत्य शैलीचा असल्याचे सांगितले जाते. मंदिरासमोर काळ्या पाषाणातील सुंदर दिव्यांची मालिकाही आहे. काही उल्लेखनीय गोष्टींमध्ये असेंब्ली हॉल, डायनिंग हॉल, गढ कालिका मंदिराच्या आतील पायऱ्यांचा समावेश आहे. या मंदिराचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे येथील देवीची पूजा विवाहित स्त्री म्हणून केली जाते. श्रीगढकालिका देवी पवार घराण्याची कुलदेवता मानली जाते. देशभरातून भक्त श्रीगढकालिका देवीला भेट देतात आणि पूजा करतात. श्रीगढकालिका देवीची प्रेरणादायी मूर्ती महाराष्ट्रातील कोठे गावातून प्रत्यक्षात आणण्यात आली होती; अशी आख्यायिका आहे; जी माहुल गडावरील रेणुका मातेशी साधर्म्य दर्शविते.

जो काळाच्याही पलीकडे आहे, ज्याचं काळावरही नियंत्रण आहे अशा उजैनच्या महाकालेश्वराचे मंदिर भारतीय वेळेच्या गणनेसाठी मध्यवर्ती बिंदू असायचे. उजैनचे श्री महाकालेश्वर हे भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक असून महाकालेश्वर मंदिराचा महिमा विविध पुराणांमध्ये तपशीलवार वर्णन केलेला आढळतो. कालिदासासह अनेक संस्कृत कवींनी ह्या मंदिराचे वर्णन केलेले आहे. भारतीय वेळेच्या गणनेसाठी उज्जैन हे मध्यवर्ती बिंदू असायचे आणि महाकाल ही उज्जैनची विशिष्ट प्रमुख देवता मानली जाते. महाकालेश्वराच्या मंदिराचे शिखर आकाशात उंचावणारे आहे. महाकालेश्वराची मूर्ती दक्षिणामूर्ती मानली जाते कारण तिचे तोंड दक्षिणेकडे आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एकमेव वैशिष्ट्य महाकालेश्वरमध्ये आढळते. स्वयंनिर्मित, भव्य आणि दक्षिणाभिमुख असल्यामुळे महाकालेश्वर महादेवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मानले जाते की केवळ दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. ओंकारेश्वर शिवाची मूर्ती महाकाल मंदिराच्या वरच्या गर्भगृहात स्थापित आहे. गर्भगृहाच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेला गणेश, पार्वती आणि कार्तिकेयच्या प्रतिमा स्थापित केल्या आहेत. दक्षिणेला नंदीची मूर्ती आहे. तिसऱ्या मजल्यावर असलेली नागचंद्रेश्वराची मूर्ती नागपंचमीच्या दिवशीच दर्शनासाठी खुली असते. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराजवळ मोठी जत्रा भरते आणि रात्री पूजा होते.

इ.स. ११०७ ते १७२८ या काळात उज्जैनवर यवनांचे राज्य होते. हिंदूंच्या प्राचीन धार्मिक परंपरा जवळजवळ नष्ट झाल्या होत्या. परंतु १६९० मध्ये मराठ्यांनी माळवा प्रदेशावर हल्ला केला आणि २९ नोव्हेंबर १७२८ रोजी माळवा प्रदेशात मराठा राज्यकर्त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर उज्जैनचे हरवलेले वैभव परत आले आणि १७३१ ते १८०९ पर्यंत हे शहर माळव्याची राजधानी राहिले. मराठ्यांच्या कारकिर्दीत येथे महाकालेश्वर मंदिराची पुनर्बांधणी, ज्योतिर्लिंगाची पुनर्स्थापना आणि सिंहस्थ उत्सव स्नानाची स्थापना झाली. पुढे राजा भोजने या मंदिराचा विस्तार केला.

महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात दर सोमवारी या मंदिरात मोठी गर्दी असते. मंदिराला लागूनच एक छोटासा जलस्रोत आहे त्याला कोटीतीर्थ म्हणतात. महाकालेश्वर मंदिराच्या व्यवस्थेसाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील व्यवस्था सुरळीत सुरू आहे. अलीकडेच त्याच्या ११८ शिखरांवर १६ किलो सोन्याचा लेप करण्यात आला आहे. हाच भगवान महाकाल सावंत – पटेल घराण्याचा कुलदेव!

सन्मानिय बी. डी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुहास सावंत, श्याम सावंत आणि इतर स्वयंसेवक यांच्या सहकार्याने आम्ही आमच्या कुलदेवीचे कुलदेवाचे दर्शन घेऊन तृप्त झालो. प्रवासाचे, राहण्याचे व्यवस्थापन अतिशय सुनियोजित करण्यात आले होते. सहभागी झालेल्या सर्व बांधव भगिनींच्या चेहऱ्यावरून ते समाधान दिसले.

आज अनेक लोक आपल्या कुलदेवीचा आणि कुलदैवताचा शोध घेण्यासाठी आटापिटा करीत असतात. आपले पूर्वज कोण? हे जाणून घेण्यासाठी व खरी वंशावळ मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी फिरताना दिसतात. कुलदेवी, कुलदैवत आणि वंशावळ हे संशोधन बी. डी. सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कित्येक वर्षे अपार मेहनत व संशोधनपर अभ्यास करून सर्व सावंत-पटेल बंधू भगिनींसाठी खुले केले आहे. एवढेच नाहीतर मध्यप्रदेशमधील उज्जेन आणि तिथूनच सुमारे १०० किलोमीटरवर असलेल्या धार गावातील कुलस्वामिनी श्री गढकालिका माता आणि कुलदैवत महाकाल (उज्जेन) यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी आजपर्यंत अनेकदा आध्यात्मिक सहलीचे यशस्वीरीत्या आयोजन केलेले आहे.

२००७ पासून हे सर्व महत्वाचे कार्य बी. डी. सावंत आणि त्यांच्या सहकारी करीत असून २०१२ पासून सावंत- पटेल उत्कर्ष मंडळाच्यावतीने सर्व सावंत- पटेल भावकीला संघटित करण्याचे कार्य केले जात आहे. सावंत- पटेल उत्कर्ष मंडळाच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, शेती विकासासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत; अशी माहिती बी. डी. सावंत आम्हाला दिली. ह्याबाबत लवकरच सविस्तर लिखाण करण्याचा मानस आहे.

कुलस्वामिनी श्री गढकालिका माता आणि कुलदैवत भगवान महाकाल ह्यांच्या दर्शनाचा लाभ मिळवून दिल्याबाबद्दल आम्ही सावंत- पटेल उत्कर्ष मंडळाचे सदैव आभारी राहू! तसेच २३० सावंत-पटेल बांधव भगिनींनी आमची सोबत केली; त्यांचेही धन्यवाद!

-श्री. मोहन अनंत सावंत
(सहसंपादक- पाक्षिक स्टार वृत्त)
-सौ. मुग्धा मोहन सावंत (सेवानिवृत्त शिक्षिका)